या फेकूपणाचे नाव काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:50 AM2018-05-14T02:50:18+5:302018-05-14T02:50:18+5:30

प्रेम, युद्ध, राजकारण आणि निवडणुका यात सारे काही क्षम्य असते. सामान्यजनांना त्यातही सभ्यता जपावी असे वाटत असते. मात्र त्यातल्या खेळाडूंना या अपेक्षांचे भान नसते.

What is the name of this patch? | या फेकूपणाचे नाव काय ?

या फेकूपणाचे नाव काय ?

googlenewsNext

प्रेम, युद्ध, राजकारण आणि निवडणुका यात सारे काही क्षम्य असते. सामान्यजनांना त्यातही सभ्यता जपावी असे वाटत असते. मात्र त्यातल्या खेळाडूंना या अपेक्षांचे भान नसते. नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करताना ‘त्या पक्षाने कुत्र्यापासून देशभक्ती शिकावी’ असा उपदेश केला. कुत्र्याला स्वामिभक्ती कळते हे आपण आजवर समजत होतो. मात्र त्याला देशभक्तीही समजते हे मोदींनी आपल्याला शिकविले हे त्यांचे आपल्यावरील उपकारच होत. डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, ‘पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही.’ मोदींना या पातळीवर येऊन जसे बोलता येते तसे खोटेही बोलता येते. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या व्यक्तिगत बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची जाहीर प्रतिज्ञा त्यांनी निवडणूक काळात केली. प्रत्यक्षात तो पैसा आला नाही आणि लोकांची खातीही रिकामीच राहिली. नंतर देशातला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी त्यांनी नोटाबंदी केली. प्रत्यक्षात तीत त्यांच्या सरकारलाच शेकडो कोटींचा फटका बसला. २ जी घोटाळ्यातील आरोपींना कडक शिक्षा सुनावण्याची भाषा त्यांनी केली. प्रत्यक्षात तो घोटाळा झालाच नव्हता हे न्यायालयात सिद्ध झाले. आताची त्यांची वाणी आणखी आश्चर्यजनक आहे. भगतसिंंग आणि राजगुरु तुरुंगात असताना काँग्रेसचे लोक त्यांना भेटायला गेले नाही, राहुल गांधी मात्र ‘भ्रष्ट’ लालूप्रसादांना तुरुंगात जाऊन भेटले असे ते म्हणाले आहेत. खोटा आरोप करायलाही काही सीमा असावी की नाही? गांधीजींचे लुई फिअर वा अन्य कोणी लिहिलेले चरित्र वा प्रत्यक्ष सरदार पटेलांचे बलवीर पुंज यांनी लिहिलेले चरित्र मोदींनी वाचल्याचे दिसत नाही. त्या चरित्रात गांधीजींनी भगतसिंगांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांची यादीच दिली गेली आहे. प्रत्यक्ष भगतसिंगांच्या चरित्रकारांनीही त्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. १२ जून १९२९ या दिवशी भगतसिंगांना त्यांच्या सहकाऱ्यांसह, पार्लमेंटमध्ये बॉम्ब फेकल्याबद्दल जन्मठेप सुनावली गेली. ती लाहोरच्या तुरुंगात भोगत असताना ‘लाहोर कटासाठी त्यांना फाशीची सजा सुनावण्यात आली.’ यानंतरच्या त्यांच्या भेटीवर सरकारने बंदी घातली. मात्र त्याआधी दि. ९ आॅगस्ट १९२९ या दिवशी काँग्रेसचे महासचिव असलेले पं. नेहरूच त्यांना तुरुंगात जाऊन भेटले. १० आॅगस्टच्या दै. ट्रिब्युनमध्ये या भेटीचा वृत्तांत प्रकाशित झाला. पुढे १९३६ मध्ये प्रकाशित झालेल्या नेहरूंच्या आत्मचरित्रात या भेटीचे सविस्तर वर्णनही आले. भगतसिंगांचा चेहरा आकर्षक व त्यांचे बुद्धीवैभव सांगणारा होता. त्यांचे डोळे बोलके आणि मन स्थिर होते. स्वर गंभीर आणि विनयशील होता असे नेहरूंनी या आत्मचरित्रात लिहिले आहे. ही भेट माझ्यासाठी अतिशय दु:खद होती असेही त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी संघ हा जनसंघांचा म्हणजे आजच्या भाजपाचा जन्मदाता आहे. संघाचे कितीजण भगतसिंगांना भेटले वा त्यांनी भगतसिंगांच्या सुटकेचे कोणते प्रयत्न केले हे कुणी सांगत नाहीत. कारण तसे सांगण्याजोगे त्यांच्याजवळ वा संघाजवळही काही नाही. अलीकडे संघाने राजगुरुंना त्याची वस्त्रे परिधान करायला सुरुवात केली आहे. मात्र भगतसिंग हे डाव्या विचारांचे, कम्युनिस्ट मताचे व क्रोपोट्किनच्या विचारांचे होते. हा संघाला मान्य होणारा विचार तर नाहीच, शिवाय तो संघाला उद्ध्वस्त करणारा आहे. तरीही संघाचे स्वयंसेवक म्हणविणारे मोदी भगतसिंगांना आपल्यात ओढत असतील तर तो प्रकार त्यांच्या अंगलट येणारा आहे. त्यांच्या सुदैवाने संघात नेत्यांना प्रश्न विचारण्याची पद्धत नाही. त्यामुळे भगतसिंगांसाठी संघाने काय केले वा संघाचे लोक त्यांना कधी भेटले की नाही हे मोदींना कुणी विचारणार नाही. मात्र देशाचा पंतप्रधान अशी विधाने करीत असेल तर तो कुणाची दिशाभूल करीत असतो ? तो स्वत:चे अज्ञान प्रकट करतो की देशाला अडाणी समजतो. काही काळापूर्वी राहुल गांधींची टवाळी करताना भाजपाचे लोक त्यांना ‘पप्पू’ म्हणत असत. नंतरच्या काळात लोक मोदींना ‘फेकू’ म्हणू लागले. मोदींची आताची वक्तव्ये त्यांच्या या फेकूपणाचा पुरावा ठरावी अशी आहेत. सबब त्यापासून सावध राहणे इष्ट.

Web Title: What is the name of this patch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.