‘या’ बावळटांचे करायचे काय?

By किरण अग्रवाल | Published: August 17, 2017 07:56 AM2017-08-17T07:56:46+5:302017-09-07T20:18:35+5:30

तांत्रिक विकास हा सुविधा उपलब्ध करून देणारा असतो हे खरे, परंतु तंत्राच्या वापरासोबत जबाबदारीचे भान अगर सावधगिरी बाळगली गेली नाही तर अनर्थ टाळता येत नाही; हेदेखील तितकेच खरे.

What do you want to do? | ‘या’ बावळटांचे करायचे काय?

‘या’ बावळटांचे करायचे काय?

googlenewsNext

तांत्रिक विकास हा सुविधा उपलब्ध करून देणारा असतो हे खरे, परंतु तंत्राच्या वापरासोबत जबाबदारीचे भान अगर सावधगिरी बाळगली गेली नाही तर अनर्थ टाळता येत नाही; हेदेखील तितकेच खरे. यात स्वत:च्याच चुकांमुळे गंडविले गेलेल्यांकडे बावळट म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे इंटरनेट फसवणुकीला व त्यातल्या त्यात बँकेच्या एटीएम कार्डचे क्रमांक मिळवूनन केल्या गेलेल्या लुबाडणुकीला बळी पडलेल्या बावळटांचे करायचे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक ठरावे.

काळ बदलतो आहे तशी काळाशी सुसंगत साधने व तंत्रही बदलणे ओघाने आले. यात भ्रमणध्वनी म्हणजे मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जग जवळ आले आहे. ही जवळकी नाते-संबंधात वाढली तशी व्यवहारातही उतरणे क्रमप्राप्तच म्हणायला हवे. एक काळ असा होता, जेव्हा पोस्टमन तार घेऊन आला की कसली तरी वाईट वार्ताच आल्याचे समजून रड-बोंबल सुरू व्हायची. आता त्या ‘तारे’च्या किती तरी पुढे जग निघून आले आहे. माणूस ‘वर’ पोहोचण्याच्या आधी त्याचा मेसेज संबंधिताना पोहोचवणे सुलभ झाले आहे, असे गमतीने म्हणता यावे इतकी संदेशवहन यंत्रणा व तंत्र प्रगत आहे. मोबाइलवर बसल्याजागी जेवणापासून ते खरेदीपर्यंतची ऑर्डर देता येते, तशी बँकिंगपासूनचे अन्य सारे व्यवहारही सहजपणे करता येतात. नव्हे, असे व्यवहार अधिकाधिक ऑनलाइन व्हावेत व त्यातून पारदर्शकता साकारावी, असाच शासनाचाही प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॅशलेस इंडिया’चा नारा त्याचसाठी दिला आहे. यातून होणारी वेळेची बचत व कामातील सुलभतेमुळे ‘ऑनलाइन बॅँकिंग’ला स्वीकारार्हता लाभताना व दिवसेंदिवस ती वाढतानाही दिसत आहे. परंतु ज्ञानाखेरीज विज्ञानाचा वापर घातक ठरतो म्हणतात, त्याप्रमाणे आॅनलाइनचे तंत्र वापरणाऱ्यांच्याच चुका त्यांच्या फसवणुकीला निमंत्रण देणाऱ्या ठरू लागल्याने अनेकांवर मूर्खात निघण्याची वेळ येते. अधिकार व सुविधांसाठी जागरूक असलेले भारतीय मन जबाबदारीच्या बाबतीत कधी जागरूक होणार, असा प्रश्न त्यामुळेच अप्रस्तुत ठरू नये.

विशेषत: ‘ई-मेल’ अ‍ॅड्रेस मागितला गेल्यावर पासवर्ड नंबरसह तो देणाऱ्यांची कीव कराविशी वाटते, तसे बॅँकेतून बोलतोय म्हटल्यावर त्याला आपल्या एटीएम कार्डचा पिन नंबर व ‘सीव्हीव्ही’ देण्याऱ्यांबद्दल आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही. ‘आ बैल मुझे मार’ याप्रमाणे स्वत:हून संकटाला अगगर फसवणुकीला निमंत्रण यातून दिले जाते, याची काळजीच बाळगली जात नाही. अज्ञानातून प्रकटणाऱ्या या गोष्टी आहेत हे खरे, परंतु जेव्हा एखादी नवीन बाब आपण स्वीकारतो तेव्हा त्यासंबंधी पुरेपूर माहिती करून घेण्यात का कुचराई केली जाते, हा यातील मूळ प्रश्न आहे. वाढत्या ‘सायबर क्राईम’मध्ये असाच एटीएमचा पिन व ‘सीव्हीव्ही’ विचारून लाखो रुपये काढले गेल्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. ज्या बॅँकांनी सदर कार्ड प्रदान केलेले असते, त्या बॅँकादेखील अशी माहिती विचारीत नसतात आणि तितकेच नव्हे तर, बॅँकेच्या नावाने कुणीही फोन केल्यास ती देऊ नका म्हणून अधून-मधून सर्वच बँका आपापल्या ग्राहकांना कळवित असतानाही असे प्रकार घडतात म्हटल्यावर त्यास बळी पडणारे ‘बावळटां’च्या गणतीत नाही मोडावेत तर काय!

काल बुधवारीच नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एका शेतकºयाची ४७ हजारास, तर दोन दिवसांपूर्वी नाशकात एकाची ४५ हजारांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली. या वर्षातील अशा गुन्ह्यांच्या नोंदी पाहता आतापर्यंत म्हणजे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत एकट्या नाशकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २५ तक्रारी दाखल झाल्या असून, या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सायबर पोलीस ठाण्यात एक लाख रुपयांवरील फसवणुकीचे दोन गुन्हे नोंदविले गेले आहेत. राजज्यात मुंबईनंतर नाशकात गेल्या महाराष्ट्रदिनी १ मे रोजी दुसरे सायबर पोलीस ठाणे सुरू केले गेले आहे. यावरून यासंबंधीचे वाढते प्रकार व त्यातील गांभीर्य लक्षात घेता यावे. आश्चर्य म्हणजे नाशिकचे जाऊ द्या, बंगळुरू ‘आयटी हब’ म्हणून ओळखले जाते. तेथील तंत्रविकास तर सर्वांना चक्रावून टाकणारा आहे. त्यामुळे तेथील जनता तंत्रसज्ञान समजली जाते. परंतु गेल्या जुलै महिन्यातील एका वार्तेनुसार अशाच प्रकारातून तेथे एका आठवड्यात दोनशेपेक्षा अधिक नागरिकांच्या बँक खात्यातून दहा लाखांपेक्षा जास्त रकमेची लुबाडणूक केली गेल्याचे आढळून आले आहे. तात्पर्य इतकेच की, सायबर फसवणुकीचे प्रकार सर्वत्रच घडून येत आहेत आणि त्यामागे संबंधितांचे अज्ञान व जबाबदारीची जाणीव नसल्याचे कारण प्रामुख्याने राहिल्याचे दिसून येणारे आहे. तेव्हा, बावळटांच्या यादीत यायचे नसेल तर आॅनलाइन व्यवहार करताना दक्षता बाळगणे गरजेचे आहे. मुख्यत्वे, एटीएम अगर कोणत्याही कार्डाच्या मागील बाजूस असलेल्या काळ्या पट्टीत ग्राहकाची संबंधित माहिती साठविलेली असते. कार्डाचा पिन नंबर व ‘सीव्हीव्ही’ कुणालाही न देण्याबरोबरच आपल्या कार्डाचा पेट्रोलपंप अगर अन्यत्र कुठेही वापर करताना ते कार्ड दुसºया कुठल्या यंत्रात टाकून सदरची माहिती चोरली तर जात नाही ना, याबद्दल सजग असणे गरजेचे आहे. अशी माहिती ‘स्कीमर्स’कडून चोरली जाऊन डुप्लिकेट कार्ड बनवून त्याद्वारे फसवणूक केली जात असल्याचेही अनेक प्रकरणांत आढळून आले आहे. तेव्हा, सावधान; बावळट राहू नका आणि बावळट बनूही नका!

Web Title: What do you want to do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.