हिंसाचारी : डावे आणि उजवे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:03 AM2018-08-30T06:03:13+5:302018-08-30T06:03:49+5:30

Violent: Left and Right | हिंसाचारी : डावे आणि उजवे

हिंसाचारी : डावे आणि उजवे

Next

कोणत्याही वादाने कडवे वळण घेतले की तो हिंस्र होतो. तसे होणाऱ्यात माओवादी असतात आणि हिंदुत्ववादीही असतात. मुंबई, पुणे व देशातील अनेक शहरात माओवादाचे जे ‘विचारवंत’ आणि हिंदुत्ववादाचे ‘शस्त्रवंत’ पकडले गेले त्यांची नावे व त्यांच्याजवळचे साहित्य व शस्त्रास्त्रे पाहिली की या देशाला एकाच वेळी डाव्या व उजव्या अशा दोन्ही दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कळून चुकले. डाव्या दहशतीचे हस्तक अरण्यात व आदिवासींच्या क्षेत्रात असतात तर त्यांचे विचारवंत शहरातील सभ्य वस्त्यात किंवा चांगल्या आलिशान हॉटेलात वास्तव्याला असतात. उजव्या दहशतवाद्यांना तसे दडून राहण्याचे कारण नसते कारण त्यांचे आश्रयदाते त्यांना समाजात सर्वत्रच सापडतात. माओवाद्यांचे जसे सौम्य व कडवे असे दोन गट आहेत तसेच ते उजव्या दहशतवाद्यांचेही आहेत. कडव्यांनी शस्त्राचार करायचा आणि सौम्यांनी त्यांचे वैचारिक समर्थन करायचे अशी त्या दोहोंचीही कार्यपद्धती आहे. त्यामुळे डावे दहशती पकडले गेले की डावे विचारवंत व स्वत:ला मानवतावादी म्हणविणारे अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पत्रके काढतात, लेख लिहितात किंवा न्यायासनाकडे धाव घेतात. उजव्या दहशतवाद्यांना त्याची तेवढीशी गरज नसते. त्यांचे समर्थन करणारे पक्ष व पुढारी देशात आहेत त्यांच्या ‘राष्ट्रीय’ म्हणविणाºया संघटना आहेत आणि सरकारातही त्यांचे चाहते व सहकारी आहेत. त्याचमुळे गेल्या चार वर्षात सामूहिक हत्याकांडात अडकलेले सगळे हिंदुत्ववादी कडवे न्यायालयातूनही निर्दोष सुटले. (बॉम्बचे स्फोट घडविणाºयात साधू वा साध्व्या कशा असतात हा प्रश्न देशातील एकाही राजकारणी माणसाला वा माध्यमाला पडू नये या चमत्काराला कोणते नाव द्यायचे असते) असे सुटून आलेल्या एका साध्वीने ‘पक्ष सोपवील ती जबाबदारी घेण्याचे’ जाहीर केले तर दुसºया एकाने ‘अकारण अटक केली म्हणून’ पोलिसांविरुद्धच न्यायालयात धाव घेण्याचे जाहीर केले. डाव्यांना समर्थक असले तरी त्यांचा सरकारात पायरव नाही आणि त्यांना माध्यमांचा पाठिंबाही नाही.

हेमंत करकरे हे कार्यक्षम पोलीस अधिकारी चंद्रपुरात असताना त्यांनी नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले होते. पुढे मुंबईला असताना मालेगाव बॉम्बस्फोटापासून समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटापर्यंतचे सगळे उजवे हिंसाचारी शस्त्रांसह त्यांनी जेरबंद केले होते. पण करकरे यांच्यासारखीच सगळीच तटस्थ माणसे आपल्या तपास यंत्रणात नसतात. त्यांनाही उजवे वा डावे कळते, त्यातही सत्तेला कोण हवे आणि कोण नको याचाही त्यांना अंदाज असतो. दाभोलकरांचे किंवा पानसºयांचे खुनी, (त्यांचे खून अगोदर झाले असतानाही) कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या खुन्यांच्या तपासानंतरच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती कसे लागले, हा प्रश्न अद्याप कुणी विचारला नसला तरी तो आता विचारला पाहिजे. भारत हा मध्यममार्गी देश आहे. भारतीय माणूसही मध्यममार्गीच आहे. त्याला डावे व उजवे असे दोन्ही कळते. त्याला हे दोन्ही संप्रदाय मान्य नाहीत, त्यातून त्यांचा हिंसाचार काय करू शकतो हे समाजाने अनुभवले आहे. डाव्या किंवा नक्षलवादी म्हणविणाºया लोकांनी एकट्या गडचिरोली जिल्ह्यात सातशेवर आदिवासींचे आणि दीडशेवर पोलिसांचे बळी घेतले आहेत तर हिंदुत्ववादी म्हणविणाºया उजव्यांनी राष्ट्रपिता म. गांधीपासून देशातील अनेक थोरामोठ्यांचे जीव घेतले आहेत. गुजरातेतील हिंसाचार, बिहार व ओरिसातील पूजास्थानांचा बाबरीसारखा केलेला विध्वंस आणि काश्मीरपासून कर्नाटकापर्यंतचे निरपराधांचे बळी त्यांच्याही नावावर आहेत. तात्पर्य हिंसाचार वा कडवेपणा हा डावा असो वा उजवा तो देश व समाज या दोहोंनाही घातक आहे. त्याचा सरकारने कठोरपणे बंदोबस्त केला पाहिजे व समाजानेही त्यापासून स्वत:ला सावध राखले पाहिजे.
 

Web Title: Violent: Left and Right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.