टिक टॉक झाले गायब!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:31 PM2019-04-20T16:31:14+5:302019-04-20T16:31:45+5:30

व्यक्त कसे व्हायचे हे सोशल मिडियाने सर्वांना शिकवले़ सरकारवरचा राग, प्रशासनाविरूद्धचा रोष, अथवा एका व्यक्तिवर करायची असलेली टीका अगदी मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सोशन मिडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Tic tok disappeared! | टिक टॉक झाले गायब!

टिक टॉक झाले गायब!

Next

- विनायक पात्रुडकर

व्यक्त कसे व्हायचे हे सोशल मिडियाने सर्वांना शिकवले़ सरकारवरचा राग, प्रशासनाविरूद्धचा रोष, अथवा एका व्यक्तिवर करायची असलेली टीका अगदी मनमोकळेपणाने मांडण्यासाठी सोशन मिडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. टिष्ट्वटर, फेसबुक, इंस्टाग्राम, अशा विविध ठिकाणी आपले मत नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे़ याला कायद्याचे बंधन नाही. त्यामुळे कोणत्याही शब्दात व्यक्त होता येते़ या व्यक्त होण्याला अश्लीलपणाची जोड असणारच हे स्वतंत्र सांगायला नको़ अश्लीलपणाचे जसे चाहते आहेत, तसे विरोधक पण आहेत.  त्याला निर्बंध घालण्याची मागणी होणे हेही आलेच. सध्या अशाच एका अ‍ॅप बंदीची चर्चा सुरू आहे़ हा अ‍ॅप विशेष करून तरूणांमध्ये अधिक प्रिय आहे. टीक टॉक असे या अ‍ॅपचे नाव आहे. 

हा अ‍ॅप चायनाने बनवला आहे. या अ‍ॅपद्वारे नक्कल करत, लाजत, मुरडत, विशिष्ट आवाजात व्यक्त होऊ शकता येते.  हे अ‍ॅप हाताळताना टाईमपासही चांगला होतो. मज्जा येते. मनोरंजन होते. आवडता चित्रपट नट, नटी अथवा सेलिब्रटीची नक्कल करता येते. अल्पावधीतच हा अ‍ॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल झाला. हळूहळू या नक्कलमध्ये अश्लीलपणा सुरू झाला. तोपर्यंत सरकार व कायदा हाकणारे सुस्त बसले होते. नेहमीप्रमाणे एका सुजाण नागरिकाने याविरोधात आवाज उठवला. मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करताना केंद्र सरकारने या अ‍ॅपवर बंदी घालणार असल्याचे न्यायालयाला सांगितले व त्याची अंमलबजावणीही केली़ अ‍ॅपविरोधात याचिका दाखल झाली नसती तर त्याचा वापर सर्रास सुरू राहिला असता. सरकार आणि प्रशासन यांचे लक्ष याकडे गेले नसते. त्यावरचा अश्लीलपणाही वाढला असता.  मुळात अशी परिस्थिती का उद्भवते, याचे मंथन व्हायला हवे़ कोणतीही नवीन वस्तू बाजारात येण्याआधी त्याला कायद्याचे निर्बंध घातले जातात. तसा कायदाच आपल्याकडे आहे, असे असताना एखाद्या अ‍ॅपचा गैरवापर होणार नाही किंवा तेथे अश्लीलपणा फोफावणार नाही, याची काळजी सरकार व प्रशासनाने घ्यायला हवी. प्रत्यक्षात तसे होत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेली की सर्वजण जागे होतात आणि कामाला लागतात. 

एका अतिरेक्याने हत्याकांडाचा फेसबुक लाईव्ह केला. १५ ते २० मिनिटे सर्व हत्याकांड लाईव्ह सुरू होता. त्याला थांबवण्याचे तंत्र फेसबुककडेही नव्हते. अख्खा जगाने मृत्यू तांडव लाईव्ह बघितला. या घटनेनंतर जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञ चिंतेत पडले. अशा प्रकारांवर निर्बंध घालण्यावर सर्वांचे एकमत झाले़ त्यानुसार आखणी सुरू झाली़ सोशल मिडियाचा गैरवापर प्रत्येक स्तरावर सुरू असतो़ त्यावर निर्बंध घालण्यास आता कोठे सुरूवात झाली आहे. या निर्बंधाची गती संथ व्हायला नको.  कारण आपल्याकडे जेवढ्या वेगाने कारवाई सुरू होते, तेवढ्याच वेगाने ती थांबते देखील़ टीक टॉकप्रमाणे अनेक असे अ‍ॅप आहेत, जेथे अश्लीलपणा सुरू असतो़ त्याकडेही सरकारने व प्रशासनाने लक्ष द्यायला हवे़ कोणी न्यायालयात जाईल अथवा तक्रार करले या प्रतीक्षेत राहू नये. तसेच एखादा अ‍ॅप बाजारात येण्याआधी त्यावर अश्लीलपणा होणार नाही, अशीच तरतुद करावी. वाहन नियंत्रणासाठी वेग मर्यादा ठरवली जाते. त्याप्रमाणे अश्लीलपणाची पोस्ट अपलोडच होणार नाही, अशी व्यवस्था करावी़ सध्या तसे तंत्रज्ञान काही अ‍ॅपला लागू आहे. ते तंत्रज्ञान सर्वच अ‍ॅपला लागू करायला हवे. तरच सोशल मिडियाचा गैरवापर टळू शकेल अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते उद्योग सुरू राहतील.

 

 

Web Title: Tic tok disappeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.