विश्वासाच्या नात्याला तडा

By admin | Published: April 26, 2017 11:19 PM2017-04-26T23:19:05+5:302017-04-26T23:19:05+5:30

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते हे विश्वासाचे आहे. डॉक्टर करत असलेल्या उपचारांवर रुग्णाचा व त्याच्या नातलगांचा विश्वास नसेल

Strengthens the relationship of faith | विश्वासाच्या नात्याला तडा

विश्वासाच्या नात्याला तडा

Next

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते हे विश्वासाचे आहे. डॉक्टर करत असलेल्या उपचारांवर रुग्णाचा व त्याच्या नातलगांचा विश्वास नसेल, तर त्या उपचारांचा रुग्णावर सकारात्मक परिणाम तरी कसा होणार आणि आपले सर्व कौशल्य पणाला लावून उपचार करणाऱ्या डॉक्टरांना समाधान तरी कसे लाभणार? सध्या या नात्यामध्ये मिठाचा खडा पडल्याने किरकोळ कारणास्तव डॉक्टरांवर हात उचलण्यापर्यंत काही माथेफिरूंची मजल गेली आहे. अशाच माथेफिरू वृत्तीचा नवा व वेगळा आविष्कार अनुभवास आला आहे. जगात सर्वाधिक वजन असलेली इजिप्तमधील महिला इमान ही अंथरुणाला खिळली होती. मरणयातना भोगत होती. तिच्या बहिणीने ख्यातनाम बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांना गतवर्षी पत्र लिहून इमानवर उपचार करण्याची विनंती केली होती. बहिणीने पाठवलेला व्हिडीओ पाहून डॉक्टरांना दया आली आणि त्यांनी इमानवर उपचार करण्याची तयारी दाखवली. ५०० किलो वजनाच्या इमानचे वजन आता १७१ किलो झाले आहे. जी इमान बिछान्यात हलूदेखील शकत नव्हती, ती कोणताही आधार न घेता अर्धा तास बसू लागली. ज्या इमानला श्वास घेण्याकरिता आॅक्सिजन सिलिंडरची गरज लागत होती, ती मोकळा श्वास घेऊ लागली. ज्या इमानला औषधे व इंजेक्शन घेतल्याखेरीज जगता येणार नाही, असे वाटत होते, तिची इंजेक्शन बंद झाली आहेत. ही सर्व तिच्यावर केलेल्या उपचारांची किमया असल्याने डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी तिची बहीण शायमाने डॉक्टरांवर भलतेसलते आरोप केले, हे कृतघ्नतेचे लक्षण आहे. शायमाच्या आरोपाने दुखावलेल्या बेरिएट्रिक विभागप्रमुख डॉ. अपर्णा भास्कर यांनी इमानवर उपचार करणाऱ्या टीमचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिक्रिया देईल. इमानवर वर्षभर उपचार होणार असताना तिला केवळ तीन महिन्यांत घरी पाठवण्यामुळे शायमाने अद्वातद्वा आरोप केले. १५ दिवसांपूर्वी इमानचे कुटुंबीय तिला येथे सोडून इजिप्तला जाण्याच्या तयारीत होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर जर त्यांचा विश्वास नाही, तर कुणाच्या भरवशावर ते इमानला सोडून जाणार होते, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. त्यामुळे आता उपचाराच्या खर्चाचा भार उचलावा लागेल, या कल्पनेनं शायमाचा पोटशूळ उठला आहे की, इमान बरी होऊन पुन्हा घरी येणार नाही, अशी सुप्त इच्छा असलेल्या शायमाचा भ्रमनिरास झाल्याने ती बरळू लागली आहे, हे डॉक्टरांनाच तिचे डोके तपासून पाहावे लागेल. आम्ही इमानसाठी खूप काही प्रेमाने केले आहे. आता देवाचा इमानवर आशीर्वाद राहू दे, हे डॉक्टर लकडावाला यांचे उद्गार त्यांच्यातील सुसंस्कृत माणसाचे यथार्थ दर्शन घडवतात. डॉ. लकडावाला यांची प्रार्थना फळास येवो, हीच अपेक्षा.

Web Title: Strengthens the relationship of faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.