अध्यात्म -हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:24 AM2017-12-11T00:24:25+5:302017-12-11T00:58:18+5:30

जगात दिशाहीन माणसं किती आहेत? भरपूर. प्रत्येकाला वाटतं माझी दिशा बरोबर. अगदी लहानपणापासून हे दिशाप्रकरण प्रत्येकाची डोकेदुखीच असते. सध्या तर चांगली दिशा मिळणं म्हणजे शिक्षणाची हवी ती शाखा मिळणं हेच आहे.

 Spirituality-Hateh | अध्यात्म -हिशेब

अध्यात्म -हिशेब

Next

- किशोर पाठक

जगात दिशाहीन माणसं किती आहेत? भरपूर. प्रत्येकाला वाटतं माझी दिशा बरोबर. अगदी लहानपणापासून हे दिशाप्रकरण प्रत्येकाची डोकेदुखीच असते. सध्या तर चांगली दिशा मिळणं म्हणजे शिक्षणाची हवी ती शाखा मिळणं हेच आहे. माझ्या मुलाला इंजिनिअर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय पण त्याला हवी ती ब्रँच मिळालीच नाही किंवा मिळाली ह्यातच आपलं सुख-दु:ख सामावलं आहे. त्याहीपेक्षा एखाद्याचं पूर्वायुष्य खूपच सरळ, संथ, नेमाने चालू असतं. पुढे असा एखादा धक्का बसतो, वळण येतं की, जगण्याची दिशाच बदलते.
एखादी शाळेत जाणारी मुलगी प्रचंड उलथापालथ होऊन शरीरविक्रय करू लागते. एखादा चांगला नोकरी असलेला माणूस धंद्याचे डोहाळे लागून रस्त्यावर येतो. भोंगळा होतो. एखादा घरदार साºयांपासून वंचित होतो. एखाद्याला नवीन आईबाबा भेटून तो परदेशात मजा मारतो.
एखाद्याला आईच्या रूपात बाई भेटते, एखाद्याला असलेली आई गमवावी लागते. हे गमवणं फार वाईट. माणसाला मिळालेल्यापेक्षा गमवणं फार लागतं. म्हणूनच आयुष्यात किती माणसं जोडली ह्यापेक्षा किती गमावली हा हिशेब महत्त्वाचा असतो.
संपूर्ण आयुष्यात किमान दोन चार वेळा हा हिशेब करावाच लागतो. प्रथम शिक्षण मग नोकरी व्यवसाय मग लग्न, मुलं, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळं बघता बघता सांभाळतांनाच म्हातारपण येतं आणि कळतं की आत्ता काय कमावलं आणि काय गमावलं. काहींना हा हिशेब करणं आवडत नाही. मिळालं ते आपलं, गेलं ते गेलं ह्या वृत्तीने माणसं राहतात. त्यांना देण्याघेण्याचे प्रश्न पडत नाहीत. पण पडतात तेव्हा ते मुळातून उखडतात किंवा ताठ उभे राहतात. माणसांच्या ह्या विविध रूपांना पाहताना मन थक्क होतं.
अगदी एकाच वेळेस जन्माला आलेल्या मुलांची कुंडली, भविष्य वेगळंच असतं. ते कसं काय? आपण प्रश्न विचारायचे, उत्तरे शोधायची आणि ह्या जाळ्यात भिरभिरत राहायचं. कारण माणूस एक भुईचक्र आहे, ते जमिनीवरच घिरट्या घालत राहतं. ते विमानही आहे जे वर जाऊन राख होऊन खाली पडतं. हा हिशेब कठीण आहे. म्हणूनच नकळत केलेला आणि झालेला हिशेब फलदायी!

Web Title:  Spirituality-Hateh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.