सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून 'आदित्य'चे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:40 AM2024-01-09T07:40:25+5:302024-01-09T07:42:35+5:30

पृथ्वीपासून १५ लाख, तर सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून आदित्य L-1 ने आपले काम सुरू केले आहे. या सौरमोहिमेच्या महत्त्वाविषयी!

Special Article on Aditya L1 launching ISRO working style and much more | सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून 'आदित्य'चे काम सुरू

सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून 'आदित्य'चे काम सुरू

डॉ. नंदकुमार कामत, वैज्ञानिक, गोवा

गेल्या शनिवारी, ६ जानेवारीला आदित्य L-1 अंतराळयान  L1 बिंदूवर त्याच्या नियुक्त हॅलो कक्षेमध्ये म्हणजे जवळजवळ लंबवर्तुळाकार, पण सुस्थिर कक्षेत पोहोचले आणि आधुनिक भारताची वैज्ञानिक सूर्योपासना सुरू झाली. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावरून, तर सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून आदित्यने आपले काम सुरू केले आहे.

लॅग्रेंज पॉइंट 1 वर अंतराळयानाला स्थानापन्न करण्यासाठी पृथ्वीवरील कक्षीय आणि सुदूर नियंत्रण आदेशांची काळजीपूर्वक मांडणी केलेली सूचनामालिका आवश्यक होती. या प्रक्रियेमध्ये प्रणोदन, प्रक्षेपण नियोजन आणि अचूक समायोजन यांचा समावेश होता. अंतराळयान सुरुवातीला ट्रान्स्फर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित केले गेले, मग ते पृथ्वीपासून L1 बिंदूच्या परिसरात  पोहोचले.

इस्रोचे संचालक सोमनाथ शनिवारी म्हणाले की, कक्षेत नेमके स्थानापन्न करण्यासाठी आदित्य यानाचा वेग सेकंदाला ३२ मीटरवर आणणे आवश्यक होते. त्यानंतर अंतराळ यानाला L1 बिंदूभोवती प्रभामंडल कक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या कक्षेमध्ये नेले गेले. इस्रोने हे सर्व किचकट टप्पे अनेक सुदूर आदेशांनुसार यशस्वीपणे  पार पाडले.

३ सप्टेंबर २०२३ रोजी पहिला टप्पा ऑर्बिट-रेझिंग बर्न आयोजित केला गेला, ज्याने यानाची कक्षा २४५ किमी गुणिले  २२,४५९ किमीच्या कक्षेत वाढवली. ५ सप्टेंबर रोजी  यानाची कक्षा कमाल ४०,२२५ किमी, १० सप्टेंबर रोजी  कमाल ६१,६६७ किमी, १५ सप्टेंबर रोजी १,२१,९७३ किमीच्या कक्षेत आणली गेली.  १९ सप्टेंबर  रोजी, पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी शेवटचा आदेश देण्यात  आला  आणि आदित्य L1 अंतराळयान नंतर लॅग्रेंज 1 बिंदूकडे निघाले.  ३० सप्टेंबरला ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून सुटले आणि लॅग्रेंज 1 बिंदूकडे गेले. शेवटचा टप्पा होता हॅलो ऑर्बिट इन्सर्शन व तो  ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अगदी अचूकपणे पार पडला.

अंतराळयान एकदा प्रभामंडल कक्षेत  गेल्यावर सुस्थिर होण्याचा प्रयत्न करते. ६ जानेवारीनंतर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान इस्रो  अंतराळयानाच्या टेलिमेट्रीचे सतत निरीक्षण करीत आहे आणि त्याचा मार्ग समायोजित करण्यासाठी, स्टेशन-किपिंग मॅन्युव्हर्स करण्यासाठी आणि त्याचे आरोग्य आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आदेश पाठवीत आहे..  आता त्यावरील  उपकरणे सक्रिय करण्याचा टप्पा सुरू झाला आहे.  L1 पॉइंट  हा बिंदू आदित्य-1 ला पृथ्वीच्या सावलीमुळे किंवा इतर परिभ्रमण घटकांमुळे होणारे व्यत्यय न येता सूर्याचे सतत निरीक्षण करू देतो. या बिंदूवरून यानाला कक्षेत सुनिश्चित सातत्य राखून सौरप्रकाशमंडलाचे आणि सूर्याच्या सर्वांत बाहेरील थराचे सतत निरीक्षण करणे शक्य होते.  पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असल्याने, L1 बिंदूवर आदित्य-1 वातावरणातील हस्तक्षेप टाळतो, ज्यामुळे स्पष्ट आणि अधिक अचूक सौरमंडल निरीक्षणे करता येतात.

आदित्य-1 चा उद्देश आहे सौरमंडलाचे उच्चस्तरीय, अचूक आणि सूक्ष्म  निरीक्षण. सौर वारे, सौर ज्वाला आणि भयावह असे ‘कोरोनल मास इजेक्शन’ म्हणजे बाहेर फेकले जाणारे सौरद्रव्य यासह विविध सौर घटना समजून घेण्यासाठी या बाह्य स्तराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ही निरीक्षणे मूलभूत हेलिओफिजिक्स संशोधनात योगदान देतात. सौरमंडलीय मिशनचे ध्येय शास्त्रज्ञांना अवकाशातील हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्याचे आहे. फ्लेअर्स  म्हणजे दीप्तीमान सौरशलाका आणि कोरोनल मास इजेक्शन यासारख्या सौरक्रियाकलापांमुळे अवकाशातील हवामानावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. शेकडो उपग्रहांच्या कक्षेवर, ऑपरेशन्स, दळणवळण प्रणाली आणि पृथ्वीवरील पॉवर ग्रीडवरही परिणाम होतो.

आदित्य-1 ची निरीक्षणे अंतराळ हवामानाचा अंदाज लावणे आणि सौरविषयक संदिग्धता कमी करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावतील. सौर चुंबकत्व आणि सौर क्रियाकलाप यांच्यातील संबंध तपासणे हे आदित्य मिशनचे उद्दिष्ट आहे.  शास्त्रज्ञांना सौर तापमानातील फरक, चुंबकीय क्षेत्र आणि सौर वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या इतर घटनांचे रहस्य उलगडण्यास हे यान मदत करील. सौरमंडल आणि संबंधित सौरघटनांच्या निरीक्षणांद्वारे हे यान सूर्याचे  वर्तन, अवकाशीय हवामान, स्पेस वेदर आणि सौरप्रभावक्षेत्रावरील बदलासंबंधी आपले ज्ञान वाढवण्यासाठी आवश्यक माहिती पाठवत राहील. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरवर चाललेली ही आधुनिक भारतीय वैज्ञानिक सूर्योपासना आहे!

Web Title: Special Article on Aditya L1 launching ISRO working style and much more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.