श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:11 AM2022-03-29T06:11:11+5:302022-03-29T06:11:51+5:30

संपूर्ण देशात रसायनमुक्त शेती करण्याचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला, या संकटात कोरोना काळातल्या घटत्या पर्यटनाने आणखी भर घातली!

Rs 500 per kg of rice, Rs 100 per cup of tea in Sri Lanka! | श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये !

श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये !

googlenewsNext

राही भिडे

आपला शेजारी श्रीलंका सध्या महागाईने हैराण झाला आहे.  गेल्या दोन वर्षांपासून आशिया खंडातील देशांना महागाईने त्रस्त केले आहे. पाकिस्तानमध्ये टोमॅटो दोनशे रुपये किलो, साखर दीडशे रुपये किलो झाली होती. बाजारात गहू मिळत नव्हता. आता श्रीलंकेतील महागाई चर्चेत आली आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे विशेषतः कच्चे तेल आणि अन्य वस्तूंच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने महागाईचा भस्मासूर उभा ठाकला आहे, सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. याचे कारण तिथल्या सरकारने गेल्या वर्षी घेतलेला संपूर्ण देशात रसायनमुक्त शेती करण्याचा निर्णय ! जगातील पहिला ऑरगॅनिक शेती करणारा देश म्हणून सरकारने घोषणा केली खरी पण, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर न केल्याने शेतीचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले. त्यामुळे देशाला अन्नधान्यासह भाजीपाला टंचाईला सामोरे जावे लागले. 
१९४८ च्या स्वातंत्र्यानंतर श्रीलंका प्रथमच सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे.

चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेला हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेला तेल, अन्न, कागद, साखर, डाळी, औषधे यांची आयात करावी लागते. श्रीलंकेकडे या अत्यावश्यक वस्तूंची आयात करण्यासाठी फक्त १५ दिवस पुरेल एवढाच परकीय चलनाचा साठा शिल्लक आहे.  परीक्षेचे पेपर छापण्यासाठी सरकारकडे कागद आणि शाईही नाही. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि पेट्रोल, डिझेल, गॅसच्या खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा आणि तिथे होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी श्रीलंका सरकारने सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तेल खरेदीसाठी हजारो लोक तासन् तास रांगेत उभे आहेत. यात काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. तेथील वीस टक्के कुटुंब अजूनही स्वयंपाकासाठी रॉकेलवर अवलंबून आहेत. आता लोकांना रॉकेलही मिळत नाही. श्रीलंकेत रॉकेलचा पुरवठाही पंपाद्वारे केला जातो. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, कच्च्या तेलाचा साठा नसल्यामुळे सरकारला एकमेव तेल शुद्धीकरण प्रकल्प बंद करावा लागला आहे. श्रीलंकेत अन्नधान्य चलनवाढ २५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे दूध, भाकरीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलो साखर २९० रुपये, एक किलो तांदूळ ५०० रुपये, ४०० ग्रॅम दूध पावडर ७९० रुपये, चहाच्या कपाची किंमत शंभर रुपयांवर गेली आहे. पेट्रोल प्रती लीटर २५४, डिझेल १७६, घरगुती सिलिंडरमध्ये १३५९ रुपयांची वाढ! 

श्रीलंकेने चीनकडून पाच अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे.  भारत आणि जपानकडूनही कर्ज घेतले आहे. याशिवाय श्रीलंकेने २०२१ मध्ये चीनकडून एक अब्ज डॉलरचे अतिरिक्त कर्जही घेतले होते. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबया राजपक्षे यांनी अलीकडेच चीनला कर्जाच्या अटी शिथिल करण्यास सांगितले, तेव्हा चीनने नकार दिला. चीनचे कर्ज फेडू न शकल्याने हंबनटोटा बंदर चीनच्या घशात घालण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली. भारतीय कंपन्यांना दिलेली कामे काढून चीनी कंपन्यांना दिल्याची किंमत आता श्रीलंका मोजतो आहे.

श्रीलंकेची लोकसंख्या सुमारे २१ कोटी ९० लाख आहे आणि सुमारे २५ टक्के लोकसंख्या पर्यटनावर जगते. २०१९ मधील साखळी बॉम्बस्फोट आणि कोरोना काळातील निर्बंधांमुळे श्रीलंकेचे पर्यटन क्षेत्र प्रभावित झाले आहे. श्रीलंकेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचा वाटा आता १५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे. त्याचबरोबर परकीय चलनाच्या कमतरतेमुळे कॅनडासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना श्रीलंकेत न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. याचा आयातीवरही परिणाम झाला आहे. हे संकट वाढण्याचे एक कारण म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीत झालेली घट. श्रीलंकेत २०१९ मध्ये १.६ अब्ज डॉलर असलेली थेट गुंतवणूक ७९ लाख ३० हजार डॉलरवर आली.  २०१९ मध्ये गोतबया सत्तेवर आले, तेव्हा श्रीलंकेचा परकीय चलन साठा ७.५ अब्ज डॉलर होता तर, जुलै २०२१ मध्ये तो २.८ अब्ज डॉलर इतका कमी झाला.  यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सरकारकडे पैसा नाही. त्यातून पेट्रोल, डिझेल, खाद्यपदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याने महागाईत अभूतपूर्व वाढ झाली आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत)

rahibhide@gmail.com

Web Title: Rs 500 per kg of rice, Rs 100 per cup of tea in Sri Lanka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.