संकल्प खूप, पण अर्थ कुठे आहे?

By admin | Published: March 8, 2015 11:45 PM2015-03-08T23:45:47+5:302015-03-08T23:45:47+5:30

देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून सुरू होत असताना, नवख्यांचा भरणा असलेले सरकार विरुद्ध दीर्घ अनुभव असलेले विरोधी पक्ष असा

Resolution too, but where is the meaning? | संकल्प खूप, पण अर्थ कुठे आहे?

संकल्प खूप, पण अर्थ कुठे आहे?

Next

यदु जोशी -

देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून सुरू होत असताना, नवख्यांचा भरणा असलेले सरकार विरुद्ध दीर्घ अनुभव असलेले विरोधी पक्ष असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आक्रमक नेत्यांचा भरणा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीमध्ये आहे. पण चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले चेहरेही त्यांच्याचकडे असल्याने ते सरकारविरुद्ध किती ताणून धरतील, याबाबत शंका आहे. अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने पक्षामध्ये चैतन्य आले आहे. आदर्श, पेड न्यूज प्रकरणाचे सावट त्यांच्यावर कायम असले, तरी मरगळ आलेल्या पक्षात जान आणण्याची ताकद त्यांच्यातच आहे, हे काँग्रेसचे बहुतेक नेते जाणतात. स्वच्छ प्रतिमेच्या पृथ्वीराज चव्हाणांनी पक्ष कुठे नेऊन ठेवला, त्यापेक्षा अशोक चव्हाण कधीही परवडले अशी काँग्रेसजनांची भावना आहे. चारित्र्यवान गाय केवळ शेण देऊ शकते; दूध द्यायला गेली तर तिचे चारित्र्य भंग होते. पृथ्वीराजबाबांविषयी तेच घडले. पक्षातील नेते, आमदार, कार्यकर्त्यांची ‘व्यवस्था’ पाहणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे बघितले जाते. सत्तेत असताना ही व्यवस्था करणे सोपे होते. आता सत्ता नसल्याने त्यांना पदरमोड करावी लागेल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चव्हाण आणि मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांची नियुक्ती करताना आपल्याला विचारात घेतले नाही म्हणून आदळआपट केली. आधीही त्यांनी काही प्रसंगांमध्ये आकांडतांडव केले होते. पण प्रहार करण्याचे त्यांचे टायमिंग दरवेळी चुकते. यावेळीही तसेच झाले आहे.
या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देशभरातून त्यासाठी सूचना मागविल्या आहेत. खूप संकल्प करण्याचे त्यांच्या मनात आहे, पण त्यांच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असलेला पैसा सरकारकडे नाही. कर्जाचा बोजा, नैसर्गिक संकटांची मालिका, निधीची चणचण यामुळे हे सरकार पुरते बेजार झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानस भगिनी असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ तयार केली पण वित्त विभागाने त्यांना ठेंगा दाखविला आहे. मुंडेंची ही स्थिती असेल तर इतरांचे काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात आत्महत्त्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या पिंपरी गावात एका शेतकऱ्याकडे मुक्कामी राहिले. त्याबद्दल सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. तो शेतकरी भाजपाचा कार्यकर्ता होता. त्याच्या घरी म्हणे मुख्यमंत्र्यांसाठी गालिचा टाकण्यात आला होता अन् तसे फोटोही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरले. तो गालिचा वगैरे नव्हता ती लाल रंगाची जाड सतरंजी होती. विदर्भाच्या भाषेत तढव म्हणा हवं तर. ‘ठाण्या’ आणि ‘ढाण्या’ पलीकडे न गेलेल्या शिवसेनेशी संबंधित काही व्यक्तींनीही फडणवीस यांच्या मुक्कामाची खिल्ली उडविली. गेल्या अनेक वर्षांत मुख्यमंत्री एखाद्या शेतकऱ्याकडे मुक्कामी राहिलेले नव्हते. फडणवीस यांनी ते करून दाखविले. ज्या गावात मुख्यमंत्री गेले त्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणाऱ्या होत्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मुक्कामाबाबत शंका उपस्थित केल्या. तटकरे यांना हल्ली काही चांगले दिसणे बंद झालेले दिसते. आघाडीचे सरकार असताना त्यांच्या पक्षाचे धुरीण एखाद्या मॉडेलऐवजी शेतकऱ्याकडे मुक्कामी राहिले असते तर कदाचित आजची वेळ आली नसती.
मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्याकडील मुक्काम मात्र केवळ सोपस्कार ठरू नये.
सोशल मीडियात फारच उथळपणा दिसतोय, पण समजूतदारपणाची अपेक्षा असलेल्यांनी त्याच्या किती आहारी जावे हे ठरविले पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कुर्त्यावर तिरंग्याचा बिल्ला उलटा असल्याचा फोटो दाखवून व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्या बदनामीचा झालेला प्रकारही तेवढाच निषेधार्ह म्हटला पाहिजे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारींपासून मुंडेंपर्यंत अनेकांच्या देशाभिमानावर शंका उपस्थित करण्याचा हा उथळपणा थांबला पाहिजे.
जाता जाता - विधानसभेतील बुलंद आवाज, सत्तापक्षाची अक्षरश: पिसे काढण्याची क्षमता असलेला नेता, हजरजबाबी आणि आक्रमक वक्ते आर. आर. पाटील आता सभागृहात नसतील. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या नेत्याशिवाय सभागृह सुनेसुने भासेल. काळ कोणासाठी थांबत नसतो. काळ जाईल तसे नवेनवे नेते समोर येतीलही; पण आबांची आठवण सभागृहाच्या भिंतींना अनेक वर्षे येत राहील.

Web Title: Resolution too, but where is the meaning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.