तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:20 AM2024-03-06T11:20:48+5:302024-03-06T11:21:19+5:30

तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे. ते आपल्या अस्तित्वावरच घाला घालू शकेल. 

Reckless over-reliance on technology is leading us into a new trap; Is this the road to liberation or a new trap? | तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा?

तंत्रज्ञानावरचे अविचारी अति अवलंबन आपल्याला नव्या सापळ्यात अडकवत आहे; हा रस्ता मुक्तीचा की नव्या सापळ्याचा?

कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ -

माणूसच जणू माणसाचा शत्रू झालाय. आपले जगणे अधिकाधिक आरामदायक करण्याचा नाद आपल्याला जडलाय. त्यासाठी आपण शोधत असलेली समाधानाची साधनेच आपल्या असमाधानाची बीजे पेरत आहेत. स्वतःला करता येणारी कामे दुसऱ्यावर सोपवण्याचे नवनवे मार्ग शोधत जाणे हीच आज आपल्या प्रगतीची निशाणी ठरत आहे. श्रमिक कष्टपूर्वक प्राप्त करतात ती कौशल्ये निर्जीव यंत्रे आता आपल्या मालकासाठी वापरू लागली आहेत.

कुशल कामगारांना ज्यासाठी तासनतास राबावे लागे ती सगळी कामे यंत्रे आता काही मिनिटांत पार पाडत आहेत. येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आपण किती प्रमाणात करू शकतो हेच औद्योगिकोत्तर जगातील तथाकथित प्रगतीचे मोजमाप बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे गमक हेच आहे. आपण यंत्रांनाच आपल्यासाठी विचारही करू देतो आणि कामही पार पाडू देतो. यंत्रे आपल्याला आराम देतात. तरीही प्रगतीच्या मागे धावण्याच्या नावे आत्मविनाशाच्या दरीकडे सरकत असलेल्या आम्हा मानवांना वसुंधरेच्या वैपुल्याचा आस्वाद घ्यायला मोकळा वेळ नसतोच. भोवतालावर विजय मिळवण्याचा हा आपला अव्याहत ध्यासच शेवटी आपला घास घेईल.

आपण मुक्तीकडे नव्हे तर सापळ्याकडे नेणाऱ्या सुधारणांच्या दिशेने चाललो आहोत. वाफेच्या इंजिनाचा शोध ही एक नवी वाट होती. आर्थिक विकासाचे स्वरूप त्यामुळे आमूलाग्र पालटले. विशेषत: कृषी उत्पादनाच्या परंपरागत पद्धतींची जागा नव्या अधिक कार्यक्षम साधनांनी घेतली. कृषी अर्थव्यवस्था बदलल्या. त्यातून औद्योगिक युगाची बीजे रोवली गेली. औद्योगिक क्रांती घडली आणि कृषी अर्थव्यवस्थांचे रूपांतर उद्योगप्रधान अर्थव्यवस्थांमध्ये झाले. मालाची वाहतूक करण्यासाठी, घरे उबदार किंवा शीतल बनविण्यासाठी, कारखाने उभारण्यासाठी, निसर्गाच्या कोपापासून तात्पुरते रक्षण करणारा परिसर घडवण्यासाठी आपण विविध नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो. औद्योगिक क्रांतीमुळेच साम्राज्ये आकाराला आली. औद्योगिक अर्थव्यवस्थांच्या भरभराटीसाठी वसाहतींचे शोषण करण्यात आले. आधुनिक जगात आज दिसणारी अघोरी विषमता त्यातून जन्माला आली. पुढे राष्ट्रीय आंदोलनांमुळे वसाहती कोसळल्या. परंतु औद्योगिकीकरणातील काही निःसंदिग्ध गुणांमुळे बाजार अर्थव्यवस्था बहरली. उत्पादनक्षमतेवरून प्रगती मोजली जाऊ लागली. परिणामी व्यापारवृद्धी करून राष्ट्रे आपले प्रभुत्व वाढविण्याचा प्रयत्न करू लागली.

निसर्गाचा बेजबाबदार वापर सतत करत राहिल्यामुळे या औद्योगिकोत्तर जगात आपण पर्यावरणीय संकटात सापडलो आहोत. आपले अस्तित्वच पणाला लागले आहे. तथाकथित सुखकर जीवन लाभायला कारणीभूत ठरलेली ती औद्योगिक क्रांतीच आपले पर्यावरण अधिकाधिक प्रदूषित करू पाहत आहे. औद्योगिक क्रांतीद्वारे होणाऱ्या प्रगतीतून सामान्य स्त्री-पुरुषांच्या जीवनाचा स्तर उंचावणारी समृद्धी साकारेल अशी आशा होती. त्याऐवजी त्यातून पराकोटीची विषमता निर्माण होऊन आहे रे आणि नाही रे यांच्यातील दरी अधिकच रुंदावलेली दिसते. कोट्यवधी लोक दारिद्र्यात आणि मूठभरांची भरभराट अशीच परिस्थिती भोवती दिसते. औद्योगिक क्रांतीचे फायदे समाजाच्या तळागाळात मुळीच झिरपलेले नाहीत. औद्योगिक क्रांतीचा हा परिपाक पाहता प्रगती या संकल्पनेच्याच फेरतपासणीची आवश्यकता वाटते. अशाश्वत असला तरीही आर्थिक आणि तांत्रिक विकास हाच प्रगतीचा मापदंड मानावा काय? की मानवी कल्याण, पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक सुसंवाद यांचाही अंतर्भाव प्रगतीच्या मापनात असला पाहिजे? औद्योगिकीकरणाच्या युगातून आता आपण यांत्रिकीकरणाच्या युगाकडे निघालो आहोत. आरामदायी मुक्तीचे अभिवचन सोबतीला आहे. जिथे यंत्रेच आपल्या सगळ्या समस्या सोडवतील, योग्य तो निर्णय घ्यायला आधारभूत ठरणारा सगळा डाटा संगणकीय साधनेच आपल्याला पुरवतील अशा स्वर्गीय जगाचे स्वप्न यांत्रिकीकरणाच्या उदयाने आपल्याला दाखवले. आता रोबोटिक्स आल्याने मनुष्यबळाची गरज आणखीनच कमी कमी होत आहे. यंत्रेच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बनलीत. बटन दाबले की जगभरातल्या प्रतिमा आपल्यासमोर येतात, माहितीचा निरंतर प्रवाह क्षणार्धात वाहू लागतो. पण इथला अवास्तव प्रचार द्वेषभावना भडकवत आहे. माहितीचा भडिमार माणसांची मने आणि जीवने काबीज करत आहे. तरीही एका काल्पनिक सुखदायी दुनियेच्या ओढीने आपण पुढेपुढेच निघालो आहोत.

तंत्रज्ञानावरचे हे अविचारी अवलंबन आपल्या मनाला मुक्त तर करत नाहीच, उलट ते त्याला सापळ्यात अडकवत आहे. सावधान ! तंत्रज्ञानावरचे अति अवलंबन आपल्या अस्तित्वावरच घाला घालू शकेल. तंत्रज्ञान नावाच्या या पशूला माणसाळण्याची गरज आहे. आज आपण पर्यावरणीय सर्वनाशाच्या काठावर उभे आहोत. त्यातून मानवावर महाअरिष्ट कोसळू शकेल. यंत्राचा अवाजवी वापर करतच राहिलो तर कदाचित या जगात उपजीविकेची साधनेच शिल्लक राहणार नाहीत. मग आपण काय करायला हवे? आता घड्याळाचे काटे उलटे फिरवून औद्योगिक क्रांतिपूर्व युगात काही आपल्याला जाता येणार नाही. आजवर विचारू न शकलेला एक प्रश्न आपण आता स्वतःला विचारायला हवा. आपण येथे कशासाठी आलो आहोत? आपल्याला लाभलेल्या या जीवनयात्रेचा अर्थ तरी काय? आपण यंत्रयुगाच्या आधीन झालो तर राज्ययंत्रणा अत्यंत शक्तिशाली बनेल. तिच्या आदेशांमुळे आपण स्वतःच्याच घरात बंदिवान होऊन जाऊ. आपले विचारस्वातंत्र्य पूर्णतः गमावून बसू. एखाद्या दुःस्वप्नासारखे हे नरकसदृश जग काहीकाळापुरतेच उरेल की ते कायमचेच आपल्या मानगुटीवर बसेल हा जीवनमरणाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. त्याच्याविरुद्ध लढायचे कसे हेच एकविसाव्या शतकासमोरचे मुख्य आव्हान असेल.

Web Title: Reckless over-reliance on technology is leading us into a new trap; Is this the road to liberation or a new trap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.