नव्या राष्ट्रपतींचे स्वागत व शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 02:49 AM2017-07-26T02:49:31+5:302017-07-26T02:50:29+5:30

भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी संसदेच्या संयुक्त सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात शपथ घेतली.

ramnath-kovind-will-be-sworn-president | नव्या राष्ट्रपतींचे स्वागत व शुभेच्छा

नव्या राष्ट्रपतींचे स्वागत व शुभेच्छा

googlenewsNext

भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी संसदेच्या संयुक्त सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात शपथ घेतली. ७१ वर्षे वयाचे कोविंद हे राष्टÑपतिपदावर येणारे भाजपाचे पहिले नेते आहेत. राष्टÑपतिपद हे पक्षनिरपेक्ष असल्याने यापुढे ते कोणत्याही पक्षाचे न राहता साºया देशाचे प्रमुख व प्रवक्ते म्हणून काम करतील. याआधीचे राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पदाची सूत्रे घेताना कोविंद यांनी जे भाषण केले ते त्यांच्या पदाला शोभणारे व त्यांचा आदर वाढविणारे होते. भारताची सांस्कृतिक बहुलता व त्याचे वैविध्य हीच त्याची खरी ओळख आहे आणि तेच या देशाचे सामर्थ्यही आहे. हा देश धर्म, भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक वेगळेपणाने नटला आहे. मात्र इतिहासाने व स्वातंत्र्याच्या अनुभवाने त्याला ऐक्याचे बळही दिले आहे. आपण वेगळे दिसत असलो तरी राष्टÑ म्हणून एक आहोत याची जाणीवही त्यांनी आपल्या भाषणात साºयांना करून दिली. येत्या २०२२ मध्ये भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करील, असे सांगताना ते म्हणाले देशाने आजवर सर्व क्षेत्रात फार मोठी प्रगती केली आहे. मात्र आपल्या ध्येयाची खरी उंची अजून आपल्याला गाठायची आहे. त्यासाठी सरकार, प्रशासन व जनता या साºयांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. देशातील गरीब व दलित जनतेचा विशेष उल्लेख करताना ते म्हणाले या वर्गांना न्याय मिळवून दिल्याखेरीज देशाला आर्थिक व नैतिक क्षेत्रात जगात नेतृत्वाचे स्थान मिळविता येणार नाही. त्यासाठी देशातील प्रत्येकच व्यक्तीला व विशेषत: स्त्रियांना विकासाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भारत ही भगवान बुद्धाची भूमी आहे आणि शांतता, स्वस्थता आणि पर्यावरणाची समृद्धी यातील संशोधनात जगाचे नेतृत्व करणे ही त्यामुळेच आपली जबाबदारी आहे. हा देश अर्थकारणात, शिक्षणात आणि सामाजिक स्वास्थ्यासह नैतिक उंचीवर नेणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपल्यावर महात्मा गांधी आणि दीनदयाल उपाध्यायांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सोपविली आहे. मानवता आणि मनुष्यधर्म हे भारताचे प्राणतत्त्व आहे आणि ते उत्तरोत्तर बळकट व प्रस्थापित करीत जाणे हे यापुढचे आपले काम आहे. हा देश मोठा करण्यात आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्य करणाºया आदर्श स्त्रियांचा ऋणी असल्याचे सांगून ते म्हणाले केवळ सरकारांमुळे देश मोठा होत नाही. त्याचा विकास त्याच्या नागरिकांच्या परिश्रमावर व सहभागावर अवलंबून असतो. आपल्या भाषणात भरउन्हात राबणाºया आपल्या शेतकºयांचा उल्लेख करून ते म्हणाले तेच खरे या देशाचे निर्माते आहेत. देशाचे सैन्य त्याच्या सीमांचे रक्षण करते, पोलीस व राखीव दलाचे लोक त्यात शांतता राखण्याचे काम करतात तर शेतकरी देश जगविण्याचे कार्य करतो ही बाब आपण कृतज्ञतेने लक्षात घेतली पाहिजे. आपल्या भाषणात डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी या पूर्व राष्टÑाध्यक्षांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत ते म्हणाले देशाचे स्वातंत्र्य हे आपल्या देशभक्तांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वात दिलेल्या लढ्याचे फळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना त्यांनी या देशातील नागरिकांना प्रतिष्ठा प्राप्त करून देताना त्यांना गणराज्याची नैतिकता प्राप्त करून दिली, असे ते म्हणाले. आपण आपल्या आयुष्याची सुरुवात एका लहान खेड्यात व मातीच्या घरात जन्म घेऊन केली. नंतरचे आयुष्य आपल्या परिश्रमाच्या व निष्ठेच्या बळावर काढून आपण आज इथपर्यंत येऊन पोहोचलो याविषयीची संवेदनाही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. राष्टÑपतींचे अभिभाषण हे सरकारनेच संमत केले असल्याने ते सरकारचे धोरण म्हणूनही देशात ओळखले जाते. त्याचमुळे या भाषणाने मोदी सरकारच्या जबाबदाºयांमध्ये फार मोठी भर घातली आहे हे लक्षात घ्यावे लागते. देशाची विविधता राखायची तर त्या विविधतेत साºयांना जोडणारे सामंजस्य व आत्मियता राखावी लागते. ही स्थिती दुर्दैवाने आज देशात दुबळी झाल्याचे दिसू लागले आहे. जाती, धर्म, भाषा व प्रदेश यांच्यात सलोख्याऐवजी अस्मितांचे प्राबल्य वाढलेले आढळत आहे. धार्मिक दंगली, जातीय तेढ आणि भाषिक अहंता या गोष्टीही बळावलेल्या दिसत आहे. याहून दु:खाची बाब ही की, या वाढीला देशातीलच काही पक्ष व संघटना खतपाणी घालताना दिसू लागल्या आहेत. नव्या राष्टÑपतींनी या गोष्टींकडे देशाचे लक्ष स्पष्टपणे वेधले नसले तरी त्यांच्या भाषणातील विधायकता या दुर्दैवी बाबींवर प्रकाश टाकायला पुरेशी आहे. देश एका मोठ्या संरक्षणविषयक आव्हानातून आज जात आहे. त्याचवेळी त्याच्या नागरिकांच्या सरकारविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देशाची आर्थिक क्षेत्रात झालेली प्रगती मोठी असली तरी ती समाजाला आर्थिक न्याय मात्र अजून देऊ शकली नाही. राष्टÑपती रामनाथ कोविंद हे त्यांच्या नव्या पदावर येण्याआधी बिहार या एकेकाळच्या गरीब व बिमारू राज्याचे राज्यपाल राहिले आहेत. त्याआधी त्यांनी राज्यसभेत दोन कारकिर्दी अनुभवल्या आहेत. देशातील एकूणच सर्व प्रश्नांची व विशेषत: दारिद्र्य रेषेच्या जवळ जगणाºयांच्या अडचणींची त्यांना जाणीव आहे. ती येत्या काळात सक्रिय होईल व ती देशाला पुढे नेईल, अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊ या.

Web Title: ramnath-kovind-will-be-sworn-president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.