राष्ट्रीयकृत बँका घेताहेत ‘राजाचा बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:38 AM2018-07-06T02:38:13+5:302018-07-06T02:38:22+5:30

मृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते.

 'Raja's victim' taking Nationalized banks | राष्ट्रीयकृत बँका घेताहेत ‘राजाचा बळी’

राष्ट्रीयकृत बँका घेताहेत ‘राजाचा बळी’

Next

- कमलेश वानखेडे

मृगाचा पहिला थेंब पृथ्वीवर पडताच काळ्या मातीसह पशु, पक्षी सारेच सुखावतात. पण याच वेळी चिंतातुर होतो तो शेतकरी. त्याला चिंता लागते ती पेरणीची. खरे तर एप्रिल महिन्यातच शेतीची मशागत सुरू होते. मे मध्ये नांगरणी, बियाणे खरेदीसाठी त्याला पैशाची गरज असते. त्याला आशा असते की यंदा तरी कर्जाचा का होईना पण पैसा हाती येईल. पण जून संपायला येतो तरी बँकांची दारे त्यांच्यासाठी उघडलेली नसतात. यंदाच्या हंगामातही असेच वेदनादायी चित्र आहे.
राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जेमतेम ४ ते २० टक्के कर्जपुरवठा केला आहे. खरे तर सरकारच्या कोट्यवधींच्या ठेवींनी उपकृत झालेल्या या बँका आपली ‘राष्ट्रीय’ जबाबदारीच विसरल्या आहेत. याच बँका उद्योगपती, बड्या व्यावसायिकांचे कर्ज झटक्यात मंजूर करतात. यांचे मॅनेजर रात्री ‘परमिट रूम’मध्ये टक्क्यांमध्ये कमिशन घेऊन सेठजींच्या कर्जाला झटक्यात परमिशन देतात. तेव्हा त्यांना न होणाºया कर्जवसुलीची चिंता सतावत नाही. स्वत:च्या गंगाजळीत होत असलेली वाढ त्यांना खुणावत असते. आपला शेतकरी कर्ज बुडवून विदेशात पसार व्हायला काही विजय मल्ल्या, नीरव मोदी नाही. तो तर पाहुणा म्हणून नातलगाकडेही चार दिवस मुक्कामाला जात नाही. मग कर्जाच्या ओझ्याची नामुष्की घेऊन तो कुठे पळून जाणार? कुठे लपून बसणार? पण कर्जबुडव्या बड्या डाकूंसाठी तिजोरीचा बळी द्यायचा अन् मातीत राबणाºया या राजाचा बळी घ्यायचा, असे पक्के ‘मालपाणी’ धोरणच बँकांच्या दिवाणजींनी आखून ठेवले आहे. वाईट याचं वाटतं की सरकार वेळीच या दिवाणजींचे ‘आॅडिट’ करीत नाही. शेतकºयांनी आवाज उठवला किंवा गळफास घेऊन स्वत:चा आवाज बंद केला की, सरकारकडून बँकांवर इशाºयांचे फवारे सोडले जातात. त्याने वरवर बसलेली काहीशी धूळ उडते, पण यांची पाळेमुळे आणखी घट्ट होतात.
बुलडाणा जिल्ह्यातील दाताळाच्या सेंट्रल बँकेतील शाखाधिकाºयाने पीककर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात शेतकºयाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. संतापाची तीव्र लाट उसळल्यानंतर त्या राक्षसाला अटकही झाली. पोलिसांकडून चार फटके लावून त्याच्या हिशेबही चुकता होईल. पण शेतकºयाची, त्याच्या पत्नीची, कुटुंबीयांची अशी अवहेलना करू पाहणाºया, लचके तोडण्यासाठी घात लावून बसलेल्या या रानटी मनोवृत्तीचे काय, असा प्रश्न अजूनही कायम आहे. भीक नको पण पण कुत्रा आवर, अशी म्हण आहे. आता कर्ज नको पण बळीराजाची ही अवहेलना थांबवा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. बँका कर्ज देत नाही म्हणून शेतकरी मजबुरीने सावकाराकडे जातो. सावकारी पाशात अडकलेला शेतकरी दिसला की आर. आर. आबांच्या कोपरापासून ते ढोपरापर्यंत सोलून काढण्याच्या इशाºयाची आठवण येते. आबा आज नाहीत. पण परिस्थिती तीच आहे. आधी सावकार कर्ज देऊन छळत होता. आता बँका कर्ज देण्यासाठीच छळत आहेत. यांना बँकेच्या दारात उभा असलेला जगाचा पोशिंदा लाचार वाटू लागला असून मदमस्त झालेले हे लांडगे या मजबुरीचा फायदा घेत आपले आचारही बदलू लागले आहेत. यांची चमडी गेंड्यापेक्षाही जाडी झाली आहे. त्यामुळे आज खºया अर्थाने सरकारने सावकारांच्या आधी या बँकांच्या गब्बरसिंग दिवाणजींना सोलून काढण्याची गरज आहे.
 

Web Title:  'Raja's victim' taking Nationalized banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी