राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

By विजय दर्डा | Published: January 28, 2019 04:00 AM2019-01-28T04:00:00+5:302019-01-28T04:02:27+5:30

सध्याच्या परिस्थितीत प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी हुकमाचा एक्का आहे, यात जराही संशय नाही. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता.

rahul and priyanka gandhi will make history | राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

Next

- विजय दर्डा

प्रियंका गांधी यांच्याविषयी केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच नव्हे, तर सामान्य लोकांमध्येही मोठ्या सकारात्मक भावना दिसतात. सर्वांनाच प्रियंका गांधी यांच्यात मोठी उमेद जाणवते. अनेकांना त्यांच्यात स्वर्गीय इंदिरा गांधी यांचाही भास होतो. खास करून अमेठी आणि रायबरेलीच्या लोकांशी त्यांचे घनिष्ट नाते आहे. तेथील लोक असे सांगतात की, प्रियंका सर्वसामान्य लोकांमध्ये एवढ्या मिसळून जातात की, अनेक वेळा त्यांच्या सुरक्षा रक्षकांचीही मोठी पंचाईत होते. त्यांचा सरळपणा, सहजता व शालीनता सर्वांनाच लोभस वाटते. मी प्रियंका गांधी यांना फार वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यातील दूरदृष्टी मला जाणवली आहे. त्यांच्यात देशाविषयी पोटतिडक आहे व सर्वसामान्यांचे जीवन सुखाचे कसे होईल, याची त्यांना चिंता लागलेली असते.

प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्याचे सर्वदूर स्वागत झाले ते यामुळेच. गेल्या वर्षी जुलैमध्ये काँग्रेस पक्षातील विविध विभागांचे काम पाहणाऱ्या नेत्यांशी प्रियंका यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली होती. तुमच्याकडे पुढील १०० दिवसांसाठी काय अ‍ॅजेंडा आहे, हा एकच प्रश्न त्यांनी या सर्व नेत्यांना विचारला होता. त्यांचा हा प्रश्नच मुळात महत्त्वाचा आहे. आपल्या सहकाऱ्यांचे विचार आणि दृष्टिकोन जाणून घेणे, हे नेतृत्वगुणाचे एक चांगले लक्षण आहे. या भेटी-गाठी व चर्चांनंतर प्रियंका आता राजकारणाच्या मैदानात उतरायला तयार झाल्याचे वाटू लागले होते. त्याआधी त्या मैदानात नव्हत्या असे नाही. अमेठी व रायबरेली मतदारसंघांतील निवडणुकांच्या वेळी त्या नेहमीच तळागळातील लोकांपर्यंत जनसंपर्क करत आल्या आहेत. लोकसेवा त्यांच्या रक्तातच आहे व राजकारणाचे कौशल्य त्या वेगाने आत्मसात करत गेल्या.

सध्याच्या परिस्थितीत प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी हुकमाचा एक्का आहे, यात जराही संशय नाही. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये विजयाचे ध्वज फडकवले. आता राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांकाही आल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला यशाचा नवा अध्याय लिहिता येईल, अशी काँग्रेसला खात्री आहे.

देशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा उत्तर प्रदेशात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका यांना पक्षाचे सरचिटणीस नेमून त्यांच्याकडे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मतदारसंघ याच पूर्व उत्तर प्रदेशात येतात. प्रियंका गांधी यांनी फार मोठे आव्हान स्वीकारले आहे. प्रियंका मैदानात उतरल्याने सपा-बसपाचा फटका बसेल, असे भाजपाला वाटते, तर काँग्रेसला याने भाजपाचे नुकसान होईल, याची खात्री वाटते. मोदी हे सर्वांचे सामायिक लक्ष्य असेल तर काँग्रेसने एकट्याने सर्व ८० जागा लढवू नयेत, त्याने सर्वांचेच नुकसान होईल, असे सपा-बसपाचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात जातीची समीकरणे फार महत्त्वाची असतात. पूर्व उत्तर प्रदेशात दलित, मुस्लीम व ब्राम्हणांची लोकसंख्या मोठी असून राजकारणाची दिशा ठरविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. २०१४ च्या निवडणुकीत तर या भागातील एकूण ३३ पैकी २२ मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांना डिपॉझिटही वाचविता आले नव्हते. यावरून प्रियंका गांधी यांचा मार्ग सोपा नाही, हे स्पष्ट होते; परंतु प्रियंका यांच्या येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे, हेही विसरून चालणार नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी उत्तर प्रदेशात त्यांचा दबदबा राहिलेला नाही, हेही खरे; पण हातावर हात ठेवून गप्प न बसता काँग्रेसला कधीतरी नव्याने सुरुवात करावी लागणाच होती. तशी प्रियंका यांना आणून आता केली आहे, त्याचे फलित दिसेलच.

काँग्रेस आता ‘बॅकफूट’वर नव्हे तर ‘फ्रंटफूट’वर खेळेल, असे सांगून राहुल गांधी यांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष कसा जोमाने कामाला लागला आहे, याचेच संकेत दिले आहेत. असे ‘फ्रंटफूट’वर खेळण्याची क्षमता प्रियंका गांधी यांच्यात नक्कीच आहे. स्वत: राहुल गांधी तर ‘फ्रंटफूट’वर आधीपासूनच आक्रमकपणे खेळत आहेत.

प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीस केल्यानंतर लगेच विरोधी पक्षांनी घराणेशाहीची जुनीच घासून-पुसून बोथट झालेली टीका सुरू केली आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना त्यांच्या योग्यतेमुळेच लोकांचे प्रेम मिळत गेले आहे. त्यांना सत्तेचा लोभ असता तर त्यांनी चालून आलेले पंतप्रधानपद का सोडले असते? प्रियंका गांधी याही त्यांच्या योग्यतेवरच यशस्वी होतील. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही राजकारणात अशी घराणेशाही पाहायला मिळते. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे रॉबर्ट व टेड हे दोन भाऊ सिनेटर होते. केनेडी कुटुंबातील इतरही अनेक जण राजकारणात होते. बुश पिता-पुत्र दोघेही राष्ट्राध्यक्ष झाले ते काय घराणेशाही म्हणून? बिल आणि हिलरी क्लिंटन यांचा अमेरिकेच्या राजकारणातील दबदबा हा काय वंशवाद म्हणायचा? अशा आरोपांना हलक्या दर्जाच्या राजकारणाशिवाय दुसरे काय म्हणावे?

(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत)

Web Title: rahul and priyanka gandhi will make history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.