पुन्हा उडता पंजाब

By admin | Published: June 22, 2016 11:41 PM2016-06-22T23:41:08+5:302016-06-22T23:41:38+5:30

हा फरक आहे लोकशाहीत आणि ठोकशाहीत. अनुराग कश्यप यांच्या उडता पंजाब या सिनेमावर पहलाज निहलानी यांनी सपासप कातरी चालविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातून होत

Punjab flies again | पुन्हा उडता पंजाब

पुन्हा उडता पंजाब

Next

हा फरक आहे लोकशाहीत आणि ठोकशाहीत. अनुराग कश्यप यांच्या उडता पंजाब या सिनेमावर पहलाज निहलानी यांनी सपासप कातरी चालविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातून होत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीच्या विरुद्ध भारतातील असंख्य लोक अनुराग यांच्या बाजूने उभे राहिले आणि न्यायालयानेदेखील या स्वातंत्र्याचे रक्षण करणारा निवाडा जाहीर केला. ज्या लोकानी आणि संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरला ते सारे अनुराग यांचे चाहते वा निहलानी यांचे वैरी होते असे नव्हे. मुद्दा तात्त्विक होता आणि अंती तो विजयी झाला. परंतु यातील अत्यंत विचित्र योगायोग म्हणजे हाच चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी जेव्हां तिकडे पाठविण्यात आला तेव्हां तिथल्या सेन्सॉर बोर्डाने याच सिनेमात तब्बल शंभर ‘कट’ सुचविले. मुबाशीर हसन यांच्या अध्यक्षतेखालील मंडळातल्या सर्व दहा सदस्यांनी उडता पंजाब पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी शंभर जागी कापाकापी करण्याचा एकमुखी निर्णय जाहीर केला. सिनेमातील बहुतेक संवाद आक्षेपार्ह असल्याचे सांगून हसन यांनी म्हटले आहे की पाकच्या विरोधातील संवादांच्या जागी ‘बीप’ करण्याचे आदेश सिनेमाच्या वितरकाला दिले आहेत. त्याआधी पाच सदस्यीय मंडळाने उडता पंजाबचा पाकमधील प्रवेशच नाकारण्याची भूमिका घेतली होती. पण वितरकाच्या विनंतीवरून मंडळाच्या सर्व सदस्यांनी चित्रपट पाहून १०० जागी कापाकापी करण्यास सांगण्याचा निर्णय घेतला. आमचे मंडळ कधीही इस्लामविरोधी, पाकविरोधी आणि समाजविरोधी दृष्यांबाबत तडजोड करीत नाही असेही हसन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधित वितरकाने पाकी मंडळाचा आदेश शिरोधार्थ मानला आहे व मंडळाच्या शिफारसीनुसार दुबईत जाऊन उडता पंजाबवर नव्याने संस्करण करून मगच तो सिनेमा पाकिस्तानमध्ये झळकविण्याचे ठरविले आहे. भारतातील चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या निर्णयाला ज्या चित्रपटाच्या बाबतीत आव्हान दिले जाऊ शकते त्याच चित्रपटाबाबत पाकिस्तानातील मंडळापुढे मान तुकविणे भाग पडते हा लोकशाहीतील मोठा फरक येथे दिसून येतो. पण मग जो बाणेदारपणा याच चित्रपटाशी संबंधित निर्माता-दिग्दर्शकाने भारतात दाखविला तोच तिथेही दाखवून एकही दृष्य कापणार नाही, भले पाकिस्तानात सिनेमा नाही दाखविला गेला तरी बेहत्तर अशी भूमिका काही घेतली नाही. यावर पाकिस्तानातील वितरकाशी आम्हाला काही घेणे देणे नाही असे उत्तर येईल. तरीही धंदा महत्वाचा हेच खरे. तत्त्व वगैरे नंतर!

Web Title: Punjab flies again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.