वेध भाजपाच्या द्राविडी राजकारणाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:27 AM2019-03-07T04:27:15+5:302019-03-07T04:28:03+5:30

भारतात सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यावर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीविषयी चर्चा सुरू होतात.

Perversion of BJP's Dravidian Politics | वेध भाजपाच्या द्राविडी राजकारणाचा

वेध भाजपाच्या द्राविडी राजकारणाचा

Next

- केतन भोसले

भारतात सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्यावर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीविषयी चर्चा सुरू होतात. २0१४ साली बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या भाजपाने सत्तेच्या चार वर्षांच्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांकडे दुर्लक्ष केले. मात्र नुकत्याच झालेल्या हिंदी भाषिक राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपाला वास्तवाची तीव्र जाणीव झाली. त्यामुळेच भाजपाने १८ फेब्रुवारी २0१९ रोजी आपल्या जुन्या मित्रपक्षाशी शिवसेनेशी युती केली आणि दुसऱ्या दिवशी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील सध्या सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुक पक्षाशी युती केली. या युतीला प्रत्युत्तरादाखल म्हणून लगेचच दुसऱ्या दिवशी काँग्रेसने तामिळनाडूतील दुसºया प्रमुख पक्षाशी, द्रमुकशी युती केली. या दोन प्रमुख आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमधील राजकारण समजून घेण्याचा हा प्रयत्न.
तामिळनाडूतील ३९ जागांपैकी अण्णा द्रमुकने भाजपासाठी ५ जागा, पीएमकेसाठी ७ जागा सोडल्या आहेत. त्या बदल्यात भाजपाने अण्णा द्रमुकला विधानसभेच्या २१ जागांसाठी पाठिंबा देण्याचे कबूल केले आहे. द्रमुकने काँग्रेससाठी ९ जागा सोडल्या असून, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लीम लीग त्यांच्यासोबत आहेत. या आघाड्यांमुळे दोन्ही प्रमुख द्राविडी पक्षांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार हे स्पष्ट झाले असून दिनकरन आणि कमल हासन यांच्या पक्षाला स्वतंत्रपणे लढावे लागेल.
तामिळनाडूच्या राजकारणातील जयललिता आणि करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांच्या निधनानंतरची ही पहिली लोकसभेची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी भूतकाळातील निवडणुकांपेक्षा निश्चितपणे वेगळी असणार आहे. मागील वर्षात घडलेल्या काही घटनांमुळे द्रमुकचे पारडे भारी असेल असे मानले जात होते. परंतु भाजपा आणि पट्टली मक्कल कटची (पीएमके) या दोन पक्षांसोबत केलेल्या युतीमुळे अण्णा द्रमुक या सत्तास्पर्धेत जोरकसपणे परतली आहे.
२0१६ साली जयललिता यांचे निधन झाल्यानंतर आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. ओ. पनीर सेल्वम आणि पलानिस्वामी यांच्यातील सततच्या संघर्षामुळे पक्षाचे आधारभूत घटक पक्षापासून दूर जाऊ लागले आहेत. त्यातच शशिकला यांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांनी त्यांची स्वतंत्रपणे चूल मांडल्याने पक्षापुढील आव्हाने आणखी तीव्र झाली आहेत. पलानिस्वामी यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकार अत्यंत अकार्यक्षम ठरले असून जनसामान्यांमध्ये त्याविरुद्धचा रोष आढळून येतो.
या युतीमागील राजकीय समीकरणे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू या. २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुक पक्षाला ४४.९ टक्के मते मिळाली होती तर द्रमुकला २३.९0 टक्के मते मिळाली होती. याच निवडणुकीत अंबुमणी रामदास यांच्या पीएमके पक्षाला ४.५ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच या आकडेवारीनुसार अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५४ टक्के मते २0१४ साली मिळू शकली असती. ही आघाडी झाल्यानंतर तामिळनाडूमधील भाजपाचे प्रवक्ते तिरुपती नारायण यांचे असे म्हणणे आहे की करु णानिधी यांच्या निधनानंतर द्रमुक खूप दुबळा झाला आहे. तसेच मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे जनतेने पाहिलेली आहेत. त्यामुळे तामिळी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील असे त्यांना वाटते.
मदुराई भागात वर्चस्व असलेल्या थेवर जातीची भूमिका या सगळ्यामध्ये महत्त्वाची ठरू शकते. पारंपरिकरीत्या अण्णा द्रमुकच्या बाजूने असलेला हा समाज सध्या दिनकरन यांच्या बाजूला झुकला असल्याचे स्पष्ट होते. तसेच पीएमकेचे वर्चस्व असलेल्या वानियार समाजाशी राजकीय वर्चस्वासाठी त्यांची स्पर्धा आहे. थेवर ही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची जात असून तामिळनाडूच्या एकूण लोकसंख्येपैकी ८ - १0 टक्के लोकसंख्या या जातीची आहे. दोन्ही आघाड्यांची घोषणा झाल्यावर या थेवर समाजात घडलेल्या एका घटनेची नोंद घेणे येथे महत्त्वाचे ठरते. आघाडीची घोषणा झाल्यावर दुसºयाच दिवशी थेवर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसला. त्यांनी आंदोलन करून, मदुराई विभागात बंद पुकारून यशस्वी करून दाखवला. मदुराई विमानतळाला थेवर समाजाचे आदरणीय नेते मुथूरामलिंगम थेवर यांचे नाव देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. अण्णा द्रमुकची महाआघाडी आणि द्रमुकची काँग्रेससोबतची आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये मुख्य लढत होईल. दिनकरन यांचा राजकीय वकूब लक्षात घेता ते अम्मांच्या नावाने भावनिक राजकारण करतील. शिवाय द्रमुकच्या आघाडीत इंडिअन युनियन मुस्लीम लीग ही असल्याने मुस्लीम मतपेढीचा फायदा त्यांना होऊ शकतो.
तामिळनाडूसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. दीर्घकालीन राजकीय प्रभाव असणाºया दोन दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थित या राज्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देते यावरून भविष्यातील तामिळनाडूमधील राजकरण कोणते वळण घेईल हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असेल हे मात्र निश्चित.
(साहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले, मुंबई)

Web Title: Perversion of BJP's Dravidian Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.