तंटे सोडविण्याचा ‘मध्यस्थी’ हा सर्वोत्तम मार्ग - अर्जन कुमार सिक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 05:40 AM2017-12-15T05:40:30+5:302017-12-15T05:40:48+5:30

'Mediation' is the best way to solve problems - Arjan Kumar Sikri | तंटे सोडविण्याचा ‘मध्यस्थी’ हा सर्वोत्तम मार्ग - अर्जन कुमार सिक्री

तंटे सोडविण्याचा ‘मध्यस्थी’ हा सर्वोत्तम मार्ग - अर्जन कुमार सिक्री

Next

‘लिगली स्पीकिंग’ या सदरात ‘न्यूजएक्स’च्या सहकार्याने ‘लोकमत’ सादर करीत आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अर्जन कुमार सिक्री यांची मुलाखत. सर्वोच्च न्यायालयाच्या कुणाही न्यायाधीशाने दिलेली ही पहिलीच जाहीर मुलाखत घेतली आहे ‘न्यूजएक्स’चे सहयोगी संपादक (विशेष उपक्रम) तरुण नांगिया यांनी.

प्रश्न : देशभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे २.८० कोटी तर विविध उच्च न्यायालयांमध्ये ४० लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. तंटा निवारणाच्या पर्यायी मार्गांचा (आॅल्टरनेट डिस्प्युट रेसोल्युशन मेकॅनिझम-एडीआरएम) न्यायालयांवरील हा भार कमी करण्यासाठी कसा उपयोग करता येईल?
न्या. सिक्री: प्रलंबित प्रकरणे निकाली काढून न्यायालयांवरील भार हलका करण्यासाठी ‘मध्यस्थी’ (मेडिएशन) या पर्यायी मार्गाचा खूप उपयोग होऊ शकेल. हल्ली अमेरिकेत ९५ टक्के प्रकरणे मध्यस्थीच्या मार्गानेच सोडविली जातात. त्यामुळे न्यायालयांवर अजिबात भार पडत नाही.

प्रश्न: ‘मध्यस्थी’च्या यशाचे भारतातील प्रमाण किती व त्याला भारतात कितपत वाव आहे?
न्या. सिक्री: मध्यस्थी या पर्यायाला खूपच वाव आहे. यात वादातील दोन्ही पक्ष आपसात चर्चा करून तोडगा काय निघू शकतो हे ठरवितात. ‘मध्यस्थ’ दोघांमध्ये चर्चा घडवून आणण्याचे काम करतो. न्यायालयात जेव्हा न्यायनिवाडा केला जातो तेव्हा तो कोणत्या तरी एका पक्षाच्या बाजूने होतो. पण ‘मध्यस्थी’मध्ये दोन्ही पक्ष आपसात ठरवून वाद मिटवत असल्याने त्यात दोघांचाही लाभ होतो.

प्रश्न: चेक न वटण्याच्या प्रकरणांमध्ये ‘मध्यस्थी’ने मार्ग निघू शकतो का?
न्या. सिक्री: चेक न वटण्याच्या प्रकरणांसाठी ‘मध्यस्थी’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. व्यापारी वाद ‘मध्यस्थी’नेच चांगल्या प्रकारे सोडविता येऊ शकतात. व्यापारात व एकूणच समाजात वाद निर्माण होणे स्वाभाविक आहे. हे वाद ‘मध्यस्थी’च्या मार्गाने सुटले नाहीत तर न्यायालयात येण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.

प्रश्न:‘मध्यस्थी’च्या मार्गाने तडजोड कशी होते याचे एखादे उदाहरण द्याल का?
न्या. सिक्री: पंजाबमधील एका प्रकरणात बहिणीचा तिच्या भावांशी वाद होता. एका सिनेमा हॉलच्या मालकीमध्ये त्या बहिणीचे वडील व भाऊ भागीदार होते व वडिलांनी आपल्या मुलीलाही त्या फर्ममध्ये सामील करून घेतले. वडिलांच्या निधनानंतर भावांनी या बहिणीला मालमत्तेमध्ये वाटा देण्यास नकार दिला. बहीण विवाहित होती व अमेरिकेत स्थायिक झालेली होती. यावरून न्यायालयात दाखल झालेल्या केससाठी ही बहीण मुद्दाम अमेरिकेहून यायची. मी ते प्रकरण ‘मध्यस्थी’साठी पाठविले व त्यात एका दिवसात तडजोड झाली. सकाळी ११ वाजता चर्चा सुरू झाली व रात्री ११ पर्यंत उभयपक्षांत समेटही झाला. एका दिवसातही वाद मिटू शकतो याचे भारतीय न्यायव्यवस्थेतील हे उत्तम उदाहरण आहे.

प्रश्न: विवाहविषयक प्रकरणांचे काय?
न्या. सिक्री: विवाहविषयक तंट्यांमध्ये मध्यस्थीने समेट होण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे. हुंड्यासाठी छळाच्या कलम ४९८अ खालील खटल्यांचेही तसेच आहे. मध्यस्थीने दोन पक्षांमधील केवळ एकच प्रकरण मिटते असे नाही. घटस्फोट, वैवाहिक संबंधांचे पुनर्प्रस्थापन, पोटगी व संपत्तीचा वाद अशी एकमेकाशी निगडित अनेक प्रकरणे असू शकतात. मध्यस्थी हा न्याय करण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे माणसातील चांगुलपणाला बळ मिळते. याने वितुष्ट आलेल्यांमध्ये पुन्हा संबंध प्रस्थापित होतात. अनोळखी व्यक्ती जेव्हा मध्यस्थीने समेट करतात तेव्हा त्यांच्यात नवे नाते जोडले जाते. वकील जेव्हा मध्यस्थ म्हणून काम करतात तेव्हा न्यायालयात केस चालवितानाही त्यांचा दृष्टिकोन बदलतो. मध्यस्थीचा अनुभव घेतल्याने न्यायाधीशही चांगले न्यायाधीश होतात. एकूणच सर्व समाजाचाच यामुळे फायदा होतो.

प्रश्न: व्यापार-उद्योगातील आपसातील, व्यापारी व सरकार यांच्यातील असे किती तरी विविध प्रकारचे तंटे व वाद असतात. उदा. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि कंत्राटदार, खासगी उद्योगांमधील, व्यापार-उद्योग जेव्हा तंट्यात अडकतो तेव्हा त्यांना घेतलेली कर्जेही वेळेवर फेडता येत नाहीत. त्यातून बुडीत कर्जे तयार होतात व एकूणच अर्थव्यवस्थेला फटका बसतो.
न्या. सिक्री: अशा सर्वांसाठी मध्यस्थी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. वाद न्यायालयात दीर्घकाळ पडून राहणे कोणत्याही व्यापाºयाला नको असते. व्यापार म्हटला की वाद आणि तंटे होतच राहतात, पण व्यापारीवर्गाला ते लवकर सुटायला हवे असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, समजा दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने मध्यस्थी अपयशी ठरली तरी त्यात गोपनीयता असते. मध्यस्थीमध्ये जे काही होते ते विश्वासाने गोपनीय ठेवायचे असते. न्यायालयेही त्याबद्दल विचारू शकत नाहीत. व्यापारीवर्गासाठी मध्यस्थीचे हे आणखी एक आकर्षण आहे.

प्रश्न: अशी गोपनीयता राखण्याचे कायद्याने बंधनकारक आहे?
न्या. सिक्री: होय. मध्यस्थीचे ते एक मूलभूत तत्त्व आहे.

प्रश्न: केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने किंवा अन्य कारणांवरून कंत्राटदारांनी सरकारविरुद्ध दाखल केलेल्या दाव्यांमध्ये मध्यस्थी कितपत परिणामकारक ठरू शकते?
न्या. सिक्री: सरकारविरुद्धची प्रकरणेही मध्यस्थीने सुटू शकतात. मध्यस्थीचे दोन प्रकार आहेत. एक न्यायालयाशी निगडित मध्यस्थी ज्यात न्यायालयात आधीपासून असलेले प्रकरण न्यायालय मध्यस्थीसाठी पाठविते. दुसरा प्रकार आहे, न्यायालयात जाण्याआधी वाद मध्यस्थीने सोडविण्याचा. दुसºया प्रकारची मध्यस्थी भारतात लोकप्रिय होत आहे. ज्यात सरकार पक्षकार आहे अशी प्रकरणेही न्यायालये मध्यस्थीसाठी पाठवितात. अडचण एवढीच आहे की, एकीकडे मध्यस्थीला प्रोत्साहन देण्यात सरकार उत्साह दाखविते. पण जेव्हा समेट करायची वेळ येते तेव्हा सरकारी खाती कांकू करताना दिसतात. शेवटी काही झाले तरी मध्यस्थीमध्ये तडजोड करायची असते. आपण पुढाकार घेऊन ती केली तर उद्या कदाचित दक्षता आयोगाचा ससेमिरा मागे लागेल, अशी सरकारी अधिकाºयांच्या मनात भावना असते.

प्रश्न: सरकारी कर्मचाºयांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी मध्यस्थीच्या प्रकरणात त्यांना काही प्रकारे सुरक्षितता देण्याची गरज आहे, असे वाटते का?
न्या. सिक्री: नक्कीच. मी दिल्ली उच्च न्यायालयात होतो तेव्हा आम्ही मध्यस्थीसंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांच्या सीईओंना, त्यांच्या विधी सल्लागारांना व त्यावेळच्या मुख्य दक्षता आयुक्तांनाही बोलावले होते. त्यावेळी सीव्हीसींनी या अधिकाºयांना आश्वासनही दिले. पण तरी मध्यस्थीच्या प्रकरणात सहभागी होणाºया सरकारी अधिकाºयांच्या मनात ही भीती असते हे मात्र खरे.

प्रश्न: कौटुंबिक तंट्यांमध्ये मध्यस्थीचा कितपत उपयोग होतो?
न्या. सिक्री: मी तुम्हाला एक मजेशीर उदाहरण देतो. घटस्फोट झालेल्या दाम्पत्याचे एक प्रकरण होते व पोटगीचा वाद सुरू होता. त्या टप्प्याला ते प्रकरण मध्यस्थीसाठी पाठविले गेले. त्यातून काय निष्पन्न झाले याची तुम्ही कल्पना करू शकता: २० हजार, ५० हजार किंवा एक लाख रुपये पोटगीवर समेट झाला? नाही. मध्यस्थीमध्ये दोघांनाही घटस्फोट घेण्यातील चूक समजली व त्यांनी पुन्हा लग्न केले. म्हणून मी म्हणतो की मध्यस्थीने चमत्कार घडू शकतो!

प्रश्न: कोणत्या प्रकारची प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठवावी याविषयी तुम्ही काय सांगाल?
न्या. सिक्री: चेक न वटणे, पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद, कुटुंबाच्या मालमत्तेवरून भावांमधील वाद, भाऊ व बहिणीतील वाद, मुला-मुलींचे पालकाशी असलेले वाद, व्यापारी तंटे, बौद्धिक संपदेच्या हक्काचे वाद शिवाय अगदी प्राप्तिकरासंबंधीचे वादही मध्यस्थीने सोडविले जाऊ शकतात. थोडक्यात सर्वच प्रकारच्या वादांत मध्यस्थीला वाव आहे.

Web Title: 'Mediation' is the best way to solve problems - Arjan Kumar Sikri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.