Maratha Reservation: सीने में जलन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 03:04 AM2018-08-05T03:04:41+5:302018-08-05T03:05:16+5:30

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने अशांतता पसरली आहे.

Maratha Reservation: Chest Burning ... | Maratha Reservation: सीने में जलन...

Maratha Reservation: सीने में जलन...

Next

- निलेश धोपेश्वरकर
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने अशांतता पसरली आहे. कुठेना कुठे हिंसक घटना घडत आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने मनातील भावनांना आंदोलनाच्या माध्यमातून वाट मोकळी करू दिली जात आहे. हा भावनांचा भडका उडाल्याचे ठाणे, नवी मुंबई व चाकणमध्ये दिसले. जेव्हा जमाव हिंसक बनतो, तेव्हा त्याची मानसिकता काय असते, त्याचा घेतलेला वेध...
शां त असलेल्या महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर भगवा दहशतवाद, हिंदुत्ववादी संघटनांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. विचारांची लढाई विचारांनी व्हायला हवी, अशी मांडणी समाजातील बुद्धिजीवी करू लागले. त्यानंतर, महाराष्ट्रात मागील काही महिन्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांनी उद्रेकाच्या घटना घडल्या. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रक्षोभाकडे तर होत नाही ना, अशी शंका येथील नागरिकांच्या मनात येऊ लागली.
मराठा आरक्षणावरून राज्य ज्वालामुखीच्या तोंडावरच उभे राहिले, असे वाटू लागले. मागील वर्षी मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राज्यात ५८ मोर्चे काढले. तेही अत्यंत शांततेत, शिस्तीत. प्रत्येकाने समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत त्यांना कौतुकाची थाप दिली. मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्त्यांची फौज मोर्चासाठी रस्त्यावर उतरूनही कुठेही गडबड, गोंधळ झाला नाही. एक प्रकारे सामान्यांची मने सकल मराठा समाजाने जिंकली होती. त्यावेळी सरकारने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेतले होते.
मात्र, सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार हाती घेतले. शांतता मार्गाने जाणारे आंदोलन ‘ठोक मोर्चा’च्या मार्गाने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देत पुन्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला. पण, या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. जेमतेम १६ ते १८ वयोगटांतील मुले पोलिसांना न जुमानता आक्रमक झाली. शिवीगाळ करून आणि दगडफेक करून त्यांनी रक्त सांडवले. आमच्या समाजाने कायदा हातात घेतला नाही, असा दावा केला. याचाच अर्थ समाजकंटकांनी या आंदोलनाचा ताबा घेतला. बाहेरील व्यक्ती सहभागी झाल्याचे पोलिसांचेही म्हणणे आहे. त्यांनीच वाहनांची जाळपोळ केली, पोलिसांवर हल्ले केले. सरकारी वाहनांचे नुकसान करून आपल्या खिशांतूनच ही भरपाई घेतली जाणार आहे. ठाण्याबरोबरच राज्याच्या अनेक भागांत झालेल्या हिंसेत पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत आंदोलकांनी दाखवली. ठाण्यात तर आंदोलक हिंदी भाषेत बोलत असल्याचे उघड झाले. मिसरूडही फुटले नाही, अशा मुलांनी ठाण्यात भडका उडवून दिला. आंदोलनाचा उडालेला भडका पाहता रास्ता रोको आंदोलनात समाजकंटक शिरल्याचे पोलीस वारंवार सांगत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीशी हिंदी भाषिक तरुणांचा संबंध काय? त्यांच्यातील संतापही या आंदोलनाच्या निमित्ताने उफाळून आला आहे. कमी होत चाललेली शेती, बेरोजगारी, नागरी सुविधांचा अभाव यामुळे समाजातील तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घर चालवणे कठीण होत असल्याने रागाच्या भरात तरुणांना नाइलाजास्तव हाती दगड घ्यावे लागले. मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा समाजकंटक प्रवृत्तींमुळे आंदोलनाला तर गालबोट लागतेच, मात्र समाज सहानुभूतीही गमावून बसण्याचीही भीती नाकारता येत नाही. कळंबोली, चाकणमध्ये पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. मराठा समाजाच्या आंदोलनात जर समाजकंटक शिरले असतील, तर त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे. ते कुणाच्या इशाºयाने आंदोलन हिंसक करत आहेत, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. एका बाजूला महाराष्ट्र पेटत असताना दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत. आपल्याकडील प्रत्येक राजकीय पक्षामध्ये या समाजाचे कार्यकर्ते आहेत. काही पक्षांचा स्वभावच आक्रमक असल्याने त्या पक्षाच्या स्टाइलनुसार हे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले असणार, हे निश्चित. त्यामुळेच आंदोलन शमण्याचे नाव न घेता त्याची धग सतत सुरू आहे. समाजाचा सरकारवर विश्वास नाही, हे ठीक आहे. पण, या समाजातील नेते, विचारवंत, लेखकांनी अशा काळात पुढे येऊन आंदोलन न करण्याचे आवाहन करायला हवे होते. आरक्षणाला होणाºया विलंबाबाबत कुठल्या तांत्रिक अडचणी आहेत, हे समजावून सांगायला हवे होते. पण, असे न झाल्याने शेतकºयांचे आत्महत्या सत्र सुरू आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही तरुणांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे. आत्महत्या करून हा प्रश्न निकाली निघणार नाही. यात तुमचा जीव जाईल, मात्र घरच्या मंडळींनी कुणाकडे पाहायचे, त्यांचे कसे होणार, याचाही विचार त्या तरुणांनी आत्महत्येपूर्वी करायला हवा, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी व समाजातील काही लेखक, पत्रकारांनी सांगितले. मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण का लागले, याबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, ज्यावेळेस माणसाला नैराश्य येते, तेव्हा तो अस्वस्थ असतो. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याची संधी तो शोधत असतो. अशावेळी आंदोलनासारखे हत्यार त्याच्या हातात आल्यास तो हिंसक होतो. अशातूनच समाजविघातक कृतींना खतपाणी घातले जाते. मुळात तुमची संगत कुणाशी आहे, यावरही बरेच काही अवलंबून असते. सध्याची तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली असून तेही महत्त्वाचे कारण असल्याचे पाध्ये यांचे म्हणणे आहे.
एकदा का भावनांचा घोडा चौफेर उधळू लागला की, त्याला लगाम घालणे खूप कठीण असते. कारण, ती व्यक्ती ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसते, असे पाध्ये सांगतात. आपल्याकडील तरुणांपुढे अनेक प्रश्न आहेत. त्यात प्रामुख्याने बेरोजगारी हा आहे. बºयाचवेळा जीवनात आलेले अपयश, घरातील अडचणी, व्यसनाच्या आहारी गेल्याने नोकरी जाणे, यातून नैराश्य येते. आपल्याकडे परप्रांतीय घर सोडून येथे राहण्यासाठी आलेले आहेत. हे परप्रांतीय एकेका खोलीत १० ते १२ जण राहतात. दिवसभरात १५ तास काम करतात. अत्यंत विपन्नावस्थेत राहणारी व मोलमजुरी करून पोट भरणारी ही माणसे आजूबाजूची श्रीमंती, ऐश्वर्य पाहत असतात. त्यांच्या मनात असूया निर्माण होते. आपल्याच नशिबी हे काबाडकष्ट का, या भावनेतून ते त्रस्त असतात. मग, अशावेळी आंदोलनात सहभागी होत ते आपल्यातील असंतोष बाहेर काढतात. ते बेभान झालेले असल्याने त्यांना रोखणे अवघड असते, असे पाध्ये यांना वाटते.
मुळात या मंडळींना आंदोलनात का सहभागी झालो आहोत, हेच माहीत नसते. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते हातात दगड घेतात. कदाचित, यातून चार पैसे मिळणार, हाही उद्देश असू शकतो. या पैशांचा व्यसनासाठी वापर केला जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने एक गोष्ट समोर आली आहे की, १८ वयोगटाच्या आतील कोवळी मुले आंदोलन हिंसक करत आहेत. यापूर्वीही झालेली आंदोलने मूळ उद्देशापासून भरकटत गेली असल्याचा आपल्याकडे इतिहास आहे, याकडेही पाध्ये यांनी लक्ष वेधले.
>नवनवीन क्षेत्रे
शोधणे हाच पर्याय
पूर्वीसारख्या आज सरकारी नोकºया उपलब्ध नाहीत. त्यामुळे समाजातील तरुणाईने हातात दगड घेऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याऐवजी व गुन्हेगारीचा शिक्का माथ्यावर लावून घेण्यापेक्षा नवनवीन क्षेत्रांमधील तांत्रिक गोष्टींचा अभ्यासक्रम शिकला पाहिजे.
सध्या सेवाक्षेत्राला महत्त्व आले असून दररोजच्या किरकोळ वाटणाºया सेवांची मागणी प्रचंड वाढली आहे. असा एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास नोकरी नक्कीच मिळू शकते. मला सरकारी नोकरी व सहावा वेतन आयोगच हवा, असा दुराग्रह धरणे अयोग्य आहे.
कदाचित, कष्ट अधिक व त्या तुलनेत पोटापुरते वेतन मिळेल. मात्र, दगडफेक करून किंवा आत्महत्या करून जीव देण्यापेक्षा ते नक्कीच हितावह ठरेल, असे करिअर काउन्सिलिंगच्या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
>राजकारणाचे
बळी ठरू नका
पुरोगामी महाराष्ट्राला हिंसाचारामुळे दृष्ट लागली, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे म्हणणे आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने वेगवेगळ्या संवेदनशील विषयांवर लोकांच्या भावना भडकावण्याचे प्रयत्न वेगवेगळे राजकीय पक्ष अथवा नेते करतील.
हिंसाचार करून ते त्यांचा राजकीय हेतू साध्य करतील. मात्र, त्यांच्या राजकारणापायी हिंसाचार करणाºया तरुणांवर गुन्हे दाखल झाले, तर वर्षानुवर्षे चालणाºया खटल्यांना त्यांना सामोरे जावे लागेलच.
शिवाय, गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने नोकरी व पासपोर्ट मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे कुणी कितीही भडकावले तरी स्वहिताची तिलांजली देऊ नका, असे वरिष्ठ पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Maratha Reservation: Chest Burning ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.