नगारे जपून ठेवा, उंदीर फार झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:14 AM2018-03-27T04:14:43+5:302018-03-27T04:14:43+5:30

कवी हिंमाशु कुलकर्णी यांच्या ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’ या मूळ कवितेचे हे विडंबन.मंत्रालयातील उंदीरकांडावर!

Keep the city safe, the rats are very much | नगारे जपून ठेवा, उंदीर फार झाले

नगारे जपून ठेवा, उंदीर फार झाले

Next

(कवी हिंमाशु कुलकर्णी यांच्या ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’ या मूळ कवितेचे हे विडंबन.मंत्रालयातील उंदीरकांडावर! )

आले चहुदिशांनी, वादळ आसंमानी
फायली जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

आपुलेचि ओठ वैरी, जिव्हारी लागलेले
शब्द जपून ठेवा, उंदीर फार झाले।

शोधात फायलींच्या, आहेत पारधी हे
ंआकडे जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

वैशाखी वणव्यात या, तापले रान सारे
मुंडके जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

आगीत वास्तवाच्या, होईल बेचिराख सारे
इमले जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

वेशात चिंतकांच्या, गारदी टपून बसलेले
ऐवज जपून ठेवा, उंदीर फार झाले।

नसतेच आपुले, अन् परके असे काही
झाकून सत्य ठेवा, उंदीर फार झाले।

सत्ता शहामृगी, खुपते जिराफांना
फांदी उंच ठेवा, उंदीर फार झाले।

वाडा जरी चिरेबंदी, झरोका तरी उघडा
मोरीस तोंड बुजवा, उंदीर फार झाले ।

पंखा जरी टांगलेला, कुरतडतील दोर ते
डोके जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

जातीय शहाण्यांचा, धर्म असे बुडालेला
पंचा जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

स्वप्ने समृद्धीची, जागेपणी पाहावी
उजेड पेरून ठेवा, उंदीर फार झाले।

धरण बांधले उशाशी, तरी कोरड घशाला
कालवे जपून ठेवा, उंदीर फार झाले।

जगण्यापरी माणसांना, मरण स्वस्त आहे
विष जपून ठेवा, उंदीर फार झाले।
ना झरे अमृताचे, ना कल्पवृक्ष कोठे
मृगजळ जपून ठेवा, उंदीर फार झाले।

गोशाळी दुधाचे, पान्हे आटलेले
तान्हे सांभाळून ठेवा, उंदीर फार झाले ।

अकल्प कल्पितांचा, हा खेळ सारा
डाव जपून ठेवा, उंदीर फार झाले।

स्तुतीसुमनांचा, सुकाळ फार झाला
सांत्वन जपून ठेवा, उंदीर फार झाले।

पंक्तीत पंत सारे, संगतीस नसे कोणी
आसन जपून ठेवा, उंदीर फार झाले।

कालचे ते आज, उद्याचे कोण जाणे?
घड्याळ जपून ठेवा, उंदीर फार झाले

अटकेपार भरारी, तरी पेशवाई बुडाली
नगारे जपून ठेवा, उंदीर फार झाले।

सत्तेच्या गलबतांना, बुडीचाच शाप आहे
वल्हे जपून ठेवा, उंदीर फार झाले।

सूर्याआड ढगांची, दाटी फार झाली
किरणे जपून ठेवा, उंदीर फार झाले ।

- नंदकिशोर पाटील

(nandu.patil@lokmat.com)

Web Title: Keep the city safe, the rats are very much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.