जळगावात ‘बदल’ घडतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:27 PM2019-01-02T13:27:50+5:302019-01-02T13:27:59+5:30

बदल अनपेक्षित

Jalgaon 'change' is happening! | जळगावात ‘बदल’ घडतोय!

जळगावात ‘बदल’ घडतोय!

Next
ठळक मुद्देकालमर्यादेत प्रश्न सुटणार का?
िलिंद कुलकर्णी्र्र्रजळगाव: केंद्र, राज्य आणि आता जळगावातही भाजपाकडे सत्ता देऊन जळगावकरांनी ‘बदल’ घडविला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ‘बदला’च्या बाजूने कौल दिला. बदल, परिवर्तन घडले असले तरी ते त्याचे परिणाम, दृष्यफळ दिसायला काही कालावधी द्यावा लागेल, हेदेखील जळगावकरांना माहित आहे. त्यामुळे वर्षभरात बंद पडलेली विमानसेवा, ठप्प झालेले फागणे ते तरसोद, जळगाव ते औरंगाबाद, बोदवड ते औरंगाबाद चौपदरीकरण, रखडलेला शिवाजीनगर, भोईटेनगर, दूध संघाचा रेल्वे उड्डाणपूल, महापालिका व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्न, हुडको आणि जिल्हा बँकेचा कर्जाचा प्रश्न या विषयाला वेळ लागणार याची कल्पना आहे. पुन्हा गिरीश महाजन यांनी दिलेल्या कालमर्यादेत हे प्रश्न सुटणार असा संपूर्ण विश्वास जळगावकरांना आहे. (कालमर्यादा : जळगावचे प्रश्न न सुटल्यास विधानसभेत मत मागायला येणार नाही) पण अलीकडे वेगळाच बदल जळगावात दिसून येत आहे. हा ‘बदल’ मात्र जळगावकरांना अनपेक्षित आहे, पण हळूहळू त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. 1) भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक ललित कोल्हे यांच्या मालकीच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर रंगलेली नववर्ष स्वागताची दारुपार्टी आणि त्यात बºहाणपूरच्या नर्तकींच्या नृत्यावर बेभाव होऊन नाचणारे प्रतिष्ठीत, श्रीमंत राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक...आता आनंद साजरा करण्याची ही पध्दत जळगावात रुढ होतेय, त्यात काय वावगे. पण त्याचीही चर्चा रंगली. उगाच लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलावर आरोप झाले. ते जाऊद्या. एक नवा बदल बघा. पूर्वी आंबटशौकीन बºहाणपूर आणि मुंबईला जात असत. अलिकडे बºहाणपूरकर जळगावात येऊन करिष्मा दाखवू लागले आहेत. 2) २०१८ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी भाजपा नगरसेविकेचे पती संतोष पाटील यांच्यावर गोळीबार झाला. पाटील यांच्याकडे रिव्हॉल्वर होते आणि त्यांनी स्वरंरक्षणासाठी ते बाहेर काढल्याने बचावले. मुंबई, पुणे, नागपुरात राजकीय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले ऐकले होते; आता हे जळगावातही असे हल्ले होऊ लागले. हा ‘बदल’ नाही काय? रिव्हॉल्वर असल्याने पाटील बचावले, सुदैव त्यांचे. सामान्य माणसानेदेखील आता स्वसंरक्षणासाठी ‘रिव्हॉल्वर’साठी अर्ज करावा. प्रत्येकाला ‘रिव्हॉल्वर‘ मिळेल, त्याचे संरक्षण होईल. पुन्हा रिव्हॉल्वर विक्रीचा व्यवसाय करुन एका बेरोजगाराला काम मिळेल आणि ‘मेक इन इंडिया’त आणखी एक उद्योग उभारला जाईल. 3) जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अनेक शासकीय कार्यालये आहेत. जिल्हाभरातून लोक रोज जळगावात येत असतात. बाजारपेठ मध्यवर्ती भागात केंद्रित आहे. त्यामुळे नागरीकरणाचा दुष्परिणाम अतिक्रमणांच्या निमित्ताने दिसून येतो. महापालिका प्रशासन आणि पोलीस दलाने संयुक्त मोहीम राबवित अतिक्रमण निर्मूलन सुरु करताच जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी या मोहिमेला विरोध केला. विरोधाचे कारण म्हणजे त्यांच्या नातेवाईकाच्या शोरुमचे काढलेले अतिक्रमण हे उघड असताना त्यांनी मात्र साळसूदपणे व्यापारी मंडळींची बाजू घेत आयुक्तांवर निशाणा साधला. बदली करुन घेण्यासाठी आयुक्तांनी ही मोहीम राबवली आहे. हिंमत असेल तर सतरा मजलीचे अतिक्रमित मजले पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. आता राज्यात भाजपाचे सरकार आहे, नगरविकास विभाग भाजपाच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे, आमदार भाजपाचे आहेत, त्यांनी आयुक्तांना आव्हान देण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांकडून मजले पाडण्याचे आदेश का आणू नये. पण...तसे होणार नाही. कारण जळगावात ‘बदल’ घडतोय. 4) जळगावात ‘बदल’ सर्वच क्षेत्रात होतोय. गतिमान आणि पारदर्शक कारभाराचे बिरुद मिरवणाºया प्रशासनामध्ये तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे बदल्यांचे विषय जाहीरपणे मांडत आहे. विमानतळावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे झालेला ‘बदलीहट्ट’ आणि शिवाजी दिवेकर यांची झालेली बदली हा त्याचाच परिपाक आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांना जळगावच्या जिल्हाधिकारीपदात रस असल्याच्या बातम्या झळकल्या. तर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांचे नव्या जिल्हाधिकारी नियुक्तीच्या मागणीचे पत्र स्वत: व्हायरल केले. बघा जळगावकरांनो, किती बदल घडतोय. प्रशासन किती पारदर्शकपणे काम करते आहे. यालाच म्हणतात ‘सब का साथ, सबका विकास’.

Web Title: Jalgaon 'change' is happening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव