Indian Air Strike on Pakistan: भारताच्या शाब्दिक डावपेचांनीही पाकिस्तानची पंचाईत; अवस्था झाली वाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 07:33 PM2019-02-26T19:33:05+5:302019-02-26T19:38:52+5:30

हवाई दलाच्या धाडसी आणि आक्रमक कारवाईचं वर्णन भारतानं वेगळ्या पद्धतीनं केलं

Indian Air Strike on Pakistan terms used by india creates trouble for pakistan | Indian Air Strike on Pakistan: भारताच्या शाब्दिक डावपेचांनीही पाकिस्तानची पंचाईत; अवस्था झाली वाईट

Indian Air Strike on Pakistan: भारताच्या शाब्दिक डावपेचांनीही पाकिस्तानची पंचाईत; अवस्था झाली वाईट

Next

- प्रशांत दीक्षित

बालाकोटमध्ये भारताने पाकिस्तानची सीमा ओलांडली आहे. मात्र त्याला आक्रमणाचे स्वरूप येणार नाही याची दक्षता भारताने घेतली. बालाकोट हल्ल्याची माहिती परराष्ट्र सचिवांतर्फे जगाला देण्यात आली. भारत स्वस्थ बसणार नाही हे जगातील प्रमुख देशांच्या आधी लक्षात आणून देण्यात आले. भारत काहीतरी मोठे धाडस करण्याच्या विचारात आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी दोनच दिवसांपूर्वी केले. जैशच्या विरोधात फ्रान्सने युनोत ठराव आणला. जैशचे समर्थन करण्याचा आपला उद्योग चीनने सुरू ठेवला असला तरी भाषा सौम्य केली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताने या हल्ल्याचे वर्णन वेगळ्या पद्धतीने केले. त्याबद्दल आपल्या व्यूहरचनाकारांचे कौतुक केले पाहिजे. नॉन मिलिटरी, नॉन सिव्हिलियन, अ‍ॅन्टी टेरिरिस्ट प्रिव्हेंटीव्ह स्ट्राईक असे बालाकोट येथील हल्ल्याचे वर्णन भारताने जगासमोर ठेवले आहे. म्हणजे आम्ही पाकिस्तानी लष्करावर हल्ला केला नाही, आम्ही पाकिस्तानी जनतेवरही हल्ला केला नाही, फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि तोही भारताच्या विरोधात होणाऱ्या संभाव्य कारवायांची ठोस माहिती हाती आल्यावर हल्ला केला असे भारताने जगाला सांगितले आहे. भारतीय नागरिकांना संरक्षण करण्याचा हक्क बजावण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, हे पाकिस्तान विरोधातील युद्ध नव्हे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याने पाकिस्तान भूमीवर जाऊन हल्ला करावा लागला, अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसण्याची गरजच नव्हती असे भारताने जगाला सांगितले आहे.

हे शाब्दिक डावपेच पाकिस्तानची पंचाईत करणारे आहेत. पाकिस्तान प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत आहे यात शंकाच नाही. म्हणूनच भारताने अतिदक्षतेचा इशारा देशात सर्वत्र दिला आहे. पण अशा प्रतिहल्ल्याचे समर्थन कसे करायचे हा प्रश्न इम्रान खान यांच्यासमोर असेल. समर्थनाचे सबळ कारण मिळेपर्यत पाकिस्तानला उघड युद्ध पुकारता येणार नाही.

पाकची दुसरी अडचण ही आर्थिक आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. परकीय चलनाची गंगाजळी जवळपास समाप्त झाली आहे. पाकिस्तानात गुंतवणूक करण्यास कोणी तयार नाही. सौदी अरेबिया व चीनकडून होणाऱ्या मदतीवर पाकिस्तानचा गाडा सुरू आहे. ही मदत मोठी असली तरी युद्ध करण्याइतकी मोठी नाही.

मात्र दहशतवाद्यांच्या मार्फत घातपाती कारवाया करून भारतीय नागरिकांचा बळी घेण्याचे पाकचे उद्योग थांबणार नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतावर अधिक छुपे हल्ले होतील. जवान, नागरिक यांचे बळी जातील. भारतीय नागरिक वा जवान यांचे कमीत कमी बळी देऊन पाकिस्तानला नमविता येईल का ही धडपड वाजपेयी व मनमोहनसिंग सरकारने गेली कित्येक वर्षे केली. त्याला अजिबात यश आलेले नाही. भारताने करावे तरी काय असा प्रश्न पुलवामा हल्ल्यानंतर विचारण्यात आला होता. सर्जिकल स्ट्राईकने काहीही साध्य झाले नाही असे पुलवामा हल्ल्यानंतर काहीजण सांगत होते.

एखाद-दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकने काहीच साध्य होणार नाही हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. नेत्यांनीही याबाबत जबाबदारीने बोलले पाहिजे. पाकिस्तानमधून होणारे हल्ले थांबवायचे असतील तर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे व प्रसंगी पाक लष्कराचे नुकसान केले पाहिजे, त्यांची जबर मनुष्य व सामग्रीची हानी केली पाहिजे असे इस्त्रायलच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांनी सुचविले होते. इस्त्रायल दरवेळी असेच करते. भारताने आता तोच मार्ग अवलंबिला आहे.

मात्र अशा स्ट्राईकमध्ये सातत्य असण्याची अतोनात गरज असते. पाकिस्तानाच्या आश्रयाने राहणारे दहशतवादी जसे वारंवार हल्ला करतात तसेच हल्ल्याचे सातत्य ठेवावे लागते. इथे भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये फरक आहे. भारताच्या लष्कराला राजकीय आदेशाशिवाय हल्ला करता येत नाही. पाकिस्तान लष्कर तुलनेने बरेच स्वतंत्र आहे. दहशतवाद्यांना पुढे करून या स्वातंत्र्याचा फायदा ते उठवितात. मोदींनी प्रथमच भारतीय सैन्य दलाला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले व राजकीय पाठबळाचे आश्वासन दिले.

हा फरक महत्त्वाचा आहे. तथापि, अशा प्रतिहल्ल्याचे संहारक प्रत्युत्तर पाकिस्तान वा दहशतवाद्यांकडून होऊ शकते. त्यामध्ये आपलीही मोठी हानी होऊ शकते. इस्रायल आजही असे हल्ले सहन करीत असते. इस्रायलप्रमाणे भारतीय नागरिकांनी असा प्रतिहल्ला सहन करण्याच्या तयारीत राहिले पाहिजे. विजयी मिरवणुका काढण्याची घाई करू नये. विजय अजून खूपच दूर आहे.
 

Web Title: Indian Air Strike on Pakistan terms used by india creates trouble for pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.