मानवी शक्ती हे आपले भांडवल अधिक समृद्ध करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:21 AM2018-01-26T00:21:02+5:302018-01-26T00:23:57+5:30

६८ वर्षांपूर्वी भारतीय जनतेने स्वत:साठी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव देणारे संविधान निर्माण केले आणि आपण सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण केले. या गणराज्यात जनताच सार्वभौम असते.

 Human power will enrich your capital | मानवी शक्ती हे आपले भांडवल अधिक समृद्ध करू

मानवी शक्ती हे आपले भांडवल अधिक समृद्ध करू

Next

६८ वर्षांपूर्वी भारतीय जनतेने स्वत:साठी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव देणारे संविधान निर्माण केले आणि आपण सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण केले. या गणराज्यात जनताच सार्वभौम असते. हे राज्य कुणा एकाची खासगी मक्तेदारी नसते. गणराज्यात मूलभूत अधिकाराची पदे वंशपरंपरेने चालत येत नसतात तर निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या व्यक्ती सरकारची स्थापना करीत असतात.
भारतीय घटना समितीची बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. या समितीने विविध समित्यांची निर्मिती करून त्यांना घटनेचे प्रारूप निश्चित करण्यास सांगितले. अशातºहेने ३९५ कलमे आणि ८ शेड्यूल असलेले संविधान निर्माण झाले. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने मंजूर केले. लोकसभेने ते त्याच दिवशी मंजूर केले. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान अमलात आले, तेव्हापासून २६ जानेवारी हा दिवस आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करू लागलो. प्रशासनाचा आराखडा म्हणून आपण ३९५ कलमे आणि ८ शेड्यूल्स असलेल्या संविधानाचा स्वीकार केला. आज ६९ वा गणराज्य दिन साजरा करीत असताना आपले विचार या संविधानाची निर्मिती करणाºया द्रष्ट्या नेत्यांपर्यंत आपण पोचवीत असतो.
घटना समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीसमोर केलेल्या भाषणातील शब्द आठवतात, ‘‘संविधान हे एखाद्या मशीनप्रमाणे प्राणहीन वस्तू असते. त्यावर नियंत्रण ठेवणा-या आणि त्याचे संचालन करणाºया व्यक्तींमुळे त्याला जीवन प्राप्त होत असते. आपल्यासमोर देशहिताला प्राधान्य देणा-या प्रामाणिक माणसांची भारताला गरज आहे.’’
गेल्या ७० वर्षांचे अवलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की, आपल्या देशाने घटनेतील लोकशाही तत्त्वांना चिकटून वाटचाल करीत प्रचंड प्रगती केली आहे. अशात-हेने या संविधानात चैतन्य निर्माण करून लोकशाही मूल्ये पक्केपणी रुजविली आहेत. आपण आपल्या गणराज्याच्या केंद्रस्थानी सामान्य जनतेला ठेवले आहे. त्यातून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची उभारणी झाली असून ते राष्ट्र चैतन्यमयी अशा विविधांगी परंपरांचे प्रतीक बनले आहे. मुक्त समाजाचे हक्क जतन करण्याचे काम आपले संविधान करीत असूून त्यातूनच संसदीय लोकशाहीची पाळेमुळे या देशाच्या मातीत घट्ट रुजविली गेली आहे.
कोणतेही राष्ट्र स्वत:च्या इतिहासाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या देशातील जनतेत एकतेची भावना नसल्याने या देशावर परकीय राजवटींनी शेकडो वर्षे राज्य केले. या देशाचे महान नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या राष्ट्राची वेगळी राष्ट्रीय  ओळख निर्माण केली आणि या देशातील ५०० हून अधिक संस्थाने भारतात विलीन करून घेतली. या संदर्भात सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, ‘‘शतकापासून अस्तित्वात असलेली जुनी संस्थाने अत्यंत वेगाने, शांततापूर्ण पद्धतीने भारतात विलीन होणे ही अभूतपूर्व घटना होती. त्यातूनच सार्वभौम गणराज्याची निर्मिती झाली.’’ त्यानंतर आपण सामूहिकरीत्या लोकशाही पद्धतीने गेली ७० वर्षे राष्ट्र उभारणीचे काम करीत आलो आहोत. या ७० वर्षात देशाने अनेक गोष्टी कमावल्या आणि राष्ट्राला वैभवाकडे नेले. यात काही यातनापूर्ण काळही पहावा लागला, जसे आणीबाणीचे काळेकुट्ट दिवस. पण एक राष्ट्र या नात्याने आपण लोकशाही मूल्यांविषयी असलेली बांधिलकी सातत्याने जपली.
गणराज्य दिन हा पूर्वावलोकन करण्याची आणि मागोवा घेण्याची संधी मिळवून देत असतो. आपले अंतर्गत सामर्थ्य समजून घेऊन त्यांच्या आधारे मोठी झेप घेण्याची संधी त्यातून मिळत असते. क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा हा अत्यंत योग्य काळ आहे. आपले राष्ट्र तरुण आहे. कारण या देशातील दोन तृतीयांश लोक ३५ वर्षाखालील वयाचे आहेत. या मानवी भांडवलाला आपण समृद्ध केले पाहिजे. त्यासाठी त्यांच्यात साक्षरता, कौशल्य, ज्ञान आणि देशाला प्रगतीपथावर नेणारी प्रवृत्ती रुजविण्याची गरज आहे. आपण आपले सामाजिक भांडवल विस्तारायला हवे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील सामाजिक लोकशाही मजबूत केली पाहिजे. त्यासाठी मुळांचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे. वसुधैव कुटुंबकम् (सारे जग एक कुटुंब आहे) या विचारापासून प्रेरणा घेत सर्वसमावेशक जागतिक भूमिकेचा स्वीकार करायला हवा. आपल्यातील भेदांवर आपण मात करायला हवी आणि प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा विकास करण्याची संधी देत देशाच्या विकासात त्यांचेही योगदान संपादन केले पाहिजे.
काही दिवसांपूर्वी आपण आपल्या देशाचे एक महान नेते सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन साजरा केला. ते करिष्मा असलेले राष्ट्रीय नेता होते. ते आजही लाखो तरुणांना प्रेरणा देत असतात. ब्रिटिशांच्या वसाहतीतून राष्टाची सुटका करण्याचे त्यांचे मार्ग हे महात्मा गांधींच्या मार्गापेक्षा वेगळे होते. तसेच मतभेद सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातही होते. पण या महान नेत्यांचे वेगळेपण त्या नेत्यांनी समर्पण भावनेतून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला त्यात होते. लोकांच्या स्वतंत्र जगण्याच्या हक्कासाठी ते लढले. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्रत्येक सरकारांनी याच जाणिवेतून राज्यकारभार चालविला.
आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. दारिद्र्याचे निर्मूलन, निरक्षरता निर्मूलन, शहरी, ग्रामीण भेद कमी करणे, लिंग आणि जातीभेद आणि अन्य सामाजिक वाईट गोष्टींचे निर्मूलन आपल्याला साध्य करायचे आहे. ही सर्व आव्हाने कठीण वाटत असली तरी ती अशक्य मात्र नक्कीच नाहीत. त्यासाठी आपण टीम इंडिया या नात्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी, असे जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात त्याचे आपण पालन करायला हवे.
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यासाठी मूलभूत सेवा परिणामकारक आणि कुशलतेने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला मध्यवर्ती भूमिका पार पाडावी लागेल. याबाबतीत समाजाला खासगी क्षेत्राला, मीडियाला, तसेच न्यायव्यवस्थेलाही हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी मुख्य भूमिका बजावावी लागेल. प्रसिद्ध तेलुगु कवी गुरजादा अप्पाराव म्हणाले होते, ‘‘राष्ट्र म्हणजे जमीन नसते तर त्यातील लोकांचे राष्ट्र असते’’ (देशामांते मट्टी कडोई, देशामांते मानुषुलोई) म्हणून आपण तोंड पाटीलकी न करता चांगले काम केले पाहिजे. समाज कल्याणाप्रती हा समर्पित भाव बाळगला आणि त्यादृष्टीने प्रत्येकाने आपण जे करण्याची गरज आहे ते आपापल्या क्षेत्रात जरी केले तर आपण परिवर्तन घडवून आणण्याच्या केंद्रस्थानी राहू शकू.
आपल्या सामाजिक जीवनाला ग्रहण लावणा-या भ्रष्टाचार, जातीवाद, धर्माभिमान, धार्मिक मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद या रोगांचा मुकाबला करून त्यांचा आपण समूळ नाश केला पाहिजे. सीमेपलीकडून होणा-या दहशतवादापासून देशाचे रक्षण केले पाहिजे. मतदान प्रभावी आणि प्रशासकीय सुधारणा यांच्या माध्यमातून आपण आपल्या राज्यसंस्था मजबूत केल्या पाहिजेत. त्यासाठी स्वत:चे चारित्र्य, क्षमता आणि वर्तन यांच्या माध्यमातून प्रभाव गाजवू शकणा-या नेतृत्वाची आपल्याला गरज राहील. राजकीय बांधिलकीचा विचार न करता विकासाच्या दृष्टीने आपण राजकीय मतैक्य साध्य केले पाहिजे. राष्ट्राचे हित हे आपल्या कृतींचा उद्देश असला पाहिजे. राष्टाच्या ओळखीला प्राधान्य देत आपण स्वत:चे भाषिक, धार्मिक आणि प्रादेशिक वेगळेपण विसर्जित करायला हवे.
आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेत असताना हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाची सोडवणूक केली पाहिजे. आपल्या राष्टाच्या संस्कृतीने नैसर्गिक संपत्तीलाच खरी संपत्ती मानली आहे. त्याचेच उत्सव आपण साजरे करून निसर्गाचे जतन करीत असतो. आपल्या प्राचीन ऋषींनी ‘‘धनम् अग्नी, धनम् वायु:, धनम् सूर्यों, धनम् वसू’’ हे मान्य केले होते. रामायण या आपल्या प्राचीन महाकाव्यात सर्वात लहान प्राणी अशी ओळख असलेल्या खारीने समुद्रावर पूल बांधण्यात योगदान दिल्याचा प्रसंग कथन केला आहे. सामूहिक प्रयत्न केल्यास कोणतेही काम कठीण नाही हाच संकेत या कथेतून मिळतो. आपले प्रजासत्ताक पुढील वर्षात पदार्पण करीत असताना व्यक्तीचा सहभाग, सर्वसमावेशकता, आचरण आणि उपक्रमशीलता हेच आपले आपले परवलीचे शब्द असतील.
आपले लोकशाही प्रजासत्ताक अधिक सामर्थ्यशाली करू!
-एम.व्यंकय्या नायडू
भारताचे उपराष्ट्रपती

Web Title:  Human power will enrich your capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.