संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

By किरण अग्रवाल | Published: December 9, 2017 05:07 AM2017-12-09T05:07:19+5:302017-12-09T05:07:54+5:30

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत

Hope to preserve the life of culture! | संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

googlenewsNext

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत, अखंडित राहण्याबरोबरच संस्कृतीचा प्राण जपला जाण्याची अपेक्षाही बळावून गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
देशातील अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन व नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्री दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा दिवसेंदिवस ‘हायटेक’ होत चालल्याने तशीही त्याची कीर्ती जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेच. ‘विरक्ती’चा उपदेश करीत अत्याधुनिक सुख-सुविधांत रमणाºया आणि तीर्थाची थोरवी सांगत असतानाच स्वत: मात्र बाटलीबंद पाण्याचा वापर करणाºया बाबा आणि त्यांच्या चेल्यांच्या अनेकविध कथांनी कुंभमेळ्याच्या कीर्तीत अधिकचीच भर घातली आहे. कुंभमेळ्यातील साधू-महंतांचे वर्तन व व्यवहार चर्चित ठरत असतानाच त्यांच्या असण्यापेक्षा ‘दिसण्या’चीही चर्चा मोठ्या प्रमाणात झडत असते. त्यामुळेही अलीकडच्या काळात कुंभमेळ्याला गर्दी उलटून ‘जत्रे’चे स्वरूप प्राप्त होत गेले. तो केवळ आध्यात्मिक सोहळा न राहता शासकीय यंत्रणांच्या व भाविकांच्या दृष्टीनेही ‘इव्हेंट’ ठरू लागला आहे. अशा या सोहळ्याला आता ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाल्याने कुंभमेळ्याला अधिकृतरीत्या जागतिक परिमाण लाभणार आहे. कुंभस्थळांच्या पर्यटन विकास व वृद्धीच्या दृष्टीने तर ही बाब महत्त्वाची ठरावीच; पण त्याशिवाय सिंहस्थ कुंभपर्वाच्या योजनेमागे अभिप्रेत असलेल्या संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने उपायात्मक गोष्टी घडून येण्याचीही अपेक्षा यानिमित्ताने पुन्हा बळावून जाणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
कुंभमेळ्याला आज भलेही काहीसे वेगळे रूप व स्वरूप आलेले दिसत असले तरी, समाजाच्या सर्वांगीण उन्नयनाच्या सम्यक कृतीचा एक प्रवाह म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. मनुष्याला अशाश्वताकडून शाश्वताकडे, सांताकडून अनंताकडे व ध्येयशून्यतेकडून ध्येयवादाकडे नेणाºया संस्कृतीचे विचारमंथन होणे, त्यातून अध्यात्माधिष्ठित समाजाच्या धारणा अधिक दृढ होणे व पर्यायाने संस्कृती संवर्धनाचे मूळ प्राणतत्त्व जपले जाणे अभिप्रेत आहे. आज हे तसे अपवादानेच घडते. बुवा-बाबांच्या चमत्कृतींपुढे साधू-सन्याशांचे अध्यात्म मागे पडते. आजचे भक्त दिखाऊपणाला भुलतात त्यामुळे परंपरांमागील हेतंूचाच संकोच झाल्याखेरीज राहात नाही. साधूंचे ‘जलवे’ पाहून झाले व गंगा-गोदास्नानाची तिसरी पर्वणी आटोपली की सारेच कसे एकदम रिते झाल्यासारखे भासते, यामागील कारणही हेच की कुंभमेळ्याच्या आयोजनामागील अध्यात्माची बैठक मोडताना दिसून येते आहे. या लयास जाऊ पाहणाºया अगर क्षीण होऊ पाहणाºया ‘नाळे’ला बळकटी देण्याचे काम ‘युनेस्को’च्या सहभागामुळे घडून येत असते. भारतातील वैदिक मंत्रोच्चार परंपरा, मणिपूर नृत्य, छाऊ नृत्य आदींच्या यापूर्वीच्या समावेशाने ते दिसूनही येते. त्यामुळेच ‘ग्लॅमर’च्या डोळे दिपवून सोडणाºया वावटळीत अंग चोरून तग धरू पाहणारा मूळ संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रवाह कुंभमेळ्याचाही ‘युनेस्को’च्या ऐतिहासिक वारसा यादीतील समावेशाने अधिक प्रशस्त होण्याची आशा जागली आहे.
 

Web Title: Hope to preserve the life of culture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक