श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 09:44 AM2023-02-11T09:44:52+5:302023-02-11T09:45:34+5:30

जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांची पाळेमुळे घट्ट होण्यासाठी बेरोजगारी हा घटकदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. बेरोजगारी कमी झाली तर आपोआपच फुटीरतावादी चळवळही कमजोर होईल. थोडक्यात, श्रीनगरमधून खूप दिवसांनी शुभ वर्तमान आले आहे.

Happy present from Srinagar | श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

googlenewsNext

‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है।’ अशी म्हण हिंदी भाषेत आहे. प्रत्यक्षात देवाने कुणाला ‘छप्पर फाड के’ काही दिले की नाही, हे एक तर देवाला किंवा मग ज्याला मिळाले असेल त्यालाच माहीत! निसर्गाने मात्र भारताला नुकताच एक दुर्मीळ धातू ‘छप्पर फाड के’ दिला आहे. ज्या धातूसाठी आज अवघ्या जगाची तगमग सुरू आहे आणि ज्यासाठी भारताला आजवर सर्वस्वी आयातीवर विसंबून राहावे लागत होते, त्या लिथियमचा मोठा साठा जम्मू- काश्मीरमध्ये आढळल्याची घोषणा, शुक्रवारी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे करण्यात आली. लिथियमचा तब्बल ५.९ दशलक्ष टन एवढा अनुमानित साठा जम्मू- काश्मीरमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेच्या २०२१ मधील अंदाजानुसार, जगभरात लिथियमचे २१ दशलक्ष टन एवढे साठे आहेत. 

भारत प्रामुख्याने ज्या देशातून लिथियमची आयात करतो, त्या ऑस्ट्रेलियात २.७ दशलक्ष टन एवढा साठा आहे. भारतात लागलेला लिथियमचा शोध किती महत्त्वाचा आहे, याचा ढोबळ अंदाज या आकडेवारीवरून बांधता येतो. जगभरातील खनिज तेलाचे साठे आगामी काही दशकात संपुष्टात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी पर्यायी इंधनांचा शोध घेण्यात येत आहे. बॅटरीवर चालणारी वाहने, ज्यांना इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) म्हणून ओळखले जाते, पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून झपाट्याने समोर येत आहेत. तसे हे तंत्रज्ञान नवे नाही. जवळपास एक शतकापासून ते अस्तित्वात आहे; पण तेव्हा अस्तित्वात असलेले बॅटरी तंत्रज्ञान वाहनांची गरज भागविण्यास अपुरे पडत असल्याने, बॅटरीवर चालणारी वाहने लवकरच काळाच्या उदरात गडप झाली होती. 

पुढे १९७० मध्ये एम. स्टॅनले व्हिटिंगहॅम या संशोधकाने लिथियम- आयन बॅटरी तयार केली आणि ईव्ही नव्याने रस्त्यावर येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. केवळ ईव्हीच नव्हे, तर आज प्रत्येकाच्या हातात पोहाेचलेला मोबाइल फोन, लॅपटॉप, तसेच सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी लागणाऱ्या बॅटरीदेखील लिथियमपासूनच तयार होतात. त्यामुळेच अगदी अलीकडील काळापर्यंत दुर्लक्षित असलेल्या लिथियम या क्षारीय धातूला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजकाल तर या धातूला ‘व्हाइट गोल्ड’ संबोधले जात आहे, एवढे त्याचे भाव वाढले आहेत. मागणी जास्त आणि दुर्मीळ मूलद्रव्य असल्याने पुरवठा कमी, अशी स्थिती असल्यामुळे लिथियमसाठी सर्वच आघाडीच्या देशांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. 

आतापर्यंत केवळ २३ देशांमध्येच लिथियम साठ्यांचा शोध लागला होता. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. अर्जेन्टिना, बोलिव्हिया व चिली या तीनच देशांमध्ये जगभरातील अनुमानित साठ्यांपैकी ५० टक्के साठे आहेत. दुसरीकडे विस्तारवादी चीनने जागतिक लिथियम बॅटरी उत्पादन क्षेत्रात दादागिरी निर्माण केली आहे. या क्षेत्राचा तब्बल ६० टक्के हिस्सा एकट्या चीनच्या ताब्यात आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने तयार केलेल्या एका अहवालानुसार, २०२५ मध्ये जगभरात लिथियमचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे. 

अलीकडे भारतानेही पेट्रोलियम इंधनांना पर्याय शोधण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभाविकच भारतातही ईव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती विचारात घेतल्यास भारतात लागलेला लिथियम साठ्यांचा शोध किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येते. त्यातही हे साठे जम्मू- काश्मीरमध्ये आढळणे, याला एक वेगळेच महत्त्व आहे. त्या राज्याला वेगळा दर्जा देणारे राज्य घटनेचे कलम ३७० हटविल्यानंतर, आता त्या राज्यात उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन आदी क्षेत्रांचा विकास करून नागरिकांना मोठ्या आर्थिक संधी उपलब्ध करून देण्याचा आणि त्यायोगे सापत्नपणाची भावना संपविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना लिथियम साठ्यांच्या शोधाने बळ मिळणार आहे. 

खाणीतून काढलेल्या लिथियमवर प्रक्रिया, तसेच लिथियमवर आधारित बॅटरी उत्पादनाच्या उद्योगाला जम्मू- काश्मीरमध्येच चालना दिल्यास, त्या राज्याच्या अर्थकारणाला गती मिळण्यासोबतच, स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होऊ शकतो. जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांची पाळेमुळे घट्ट होण्यासाठी बेरोजगारी हा घटकदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. बेरोजगारी कमी झाली तर आपोआपच फुटीरतावादी चळवळही कमजोर होईल. थोडक्यात, श्रीनगरमधून खूप दिवसांनी शुभ वर्तमान आले आहे.

Web Title: Happy present from Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.