भव्य पांढरी म्हातारी

By Admin | Published: February 16, 2017 11:54 PM2017-02-16T23:54:56+5:302017-02-16T23:54:56+5:30

भारतीय रस्त्यांवरची अ‍ॅम्बी असं तिचं भारतातल्या ‘एलीट’ क्लासमधलं एकेकाळचं नाव. ती फक्त कार नव्हती तर व्हीआयपी असण्याची,

The grand white elderly | भव्य पांढरी म्हातारी

भव्य पांढरी म्हातारी

googlenewsNext

भारतीय रस्त्यांवरची अ‍ॅम्बी असं तिचं भारतातल्या ‘एलीट’ क्लासमधलं एकेकाळचं नाव. ती फक्त कार नव्हती तर व्हीआयपी असण्याची, सत्तेची, सत्ताकेंद्राजवळच्या वऱ्हांड्यातल्या लगबगीची आणि एकेकाळच्या भारतीय महत्त्वाकांक्षांची सर्वंकष ओळख होती. पंतप्रधान, मंत्री, व्हीआयपी राजकारणी ते बडे शासकीय अधिकारी या साऱ्यांच्या लाल/नारंगी दिव्याच्या आकांक्षेचं एक रूप म्हणून ती मिरवली. अनेकांनी आपल्या दारासमोर ही पांढरी कार उभी करण्याची स्वप्नंही खरी करून दाखवली. ग्रॅण्ड ओल्ड लेडी आॅफ इंडियन रोड्स म्हणून तिचा गौरव अजूनही होतोच. देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९४८मध्ये अ‍ॅम्बेसेडरचं उत्पादन सुरू झालं. ब्रिटिश मोरीस आॅक्सफोर्ड थ्री वरून बेतलेलं हे मॉडेल. तिनं स्वत:च्या दारात चारचाकी उभं करण्याचं स्वप्न ज्या काळात भारतीयांना दिलं तेव्हा ते या देशात बहुसंख्यांच्या आवाक्यात नव्हतं. ६० ते ८०च्या लालफितीत करकचून गेलेल्या दशकांत अ‍ॅम्बेसेडरची मागणी मोठी होती. मात्र ऐंशीच्या दशकाच्या मध्यात मारुती सुझुकी ८०० रस्त्यावर आली आणि चारचाकीचं स्वप्न अनेकांच्या आवाक्यात आलं. ९०च्या, उदारीकरणाचं वारं शिरल्यानंतर तर चारचाक्यांच्या बाजारपेठेचं समीकरणं वेगानं बदललं. इतकं वेगानं की २००० नंतरच्या गेल्या सुमारे दीड दशकांत चारचाकी वाहनं घेणारे, त्यांचं वय, मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गाच्या हाती आलेली नवीन क्रयशक्ती हे सारं बदलत्या भारताची कहाणीच सांगू लागलं. मात्र या साऱ्यातही पांढऱ्या अ‍ॅम्बेसेडरनं आपला रुतबा कायम ठेवला होता. पण तीन वर्षांपूर्वी या गाडीचं उत्पादन बंद झालं. आणि आता तर हिंदुस्थान मोटर्सनं तो ब्रॅण्डही फक्त ८० कोटी रुपयांना ट्रेडमार्कसह फ्यूजो नावाच्या फ्रेंच कंपनीला विकून टाकला. अ‍ॅम्बेसेडरच्या आठवणीत गतकाळाचे उमाळे अनेकांना आता दाटूनही येतील. ते येण्यात गैरही काही नाही. कारण अनेकांनी आपल्या सुबत्तेचं आणि सत्तेचं प्रतीक म्हणून ही कार अनेक वर्षे मिरवली आहे. मात्र एक नक्की, देश किती वेगानं बदलला, महत्त्वाकांक्षांची प्रतीकं, तिचे रंग, आकार-उकार आणि त्या महत्त्वाकांक्षांसाठी राबणारे हात, त्या वर्गाच्या हातातला पैसा हे सारं सन ४८पासून कसं बदलत गेलं याची कहाणी कुणी सांगावी तर ती या अ‍ॅम्बेसेडरच्या प्रवासानं. त्या कहाणीत अजून एक घटक आहे, काळानुरूप बदलण्याचा. तो बदल स्वीकारला नाही तर जुन्या सत्तेच्या खुणाही कशा मोडीत निघतात, त्याची ही एक शोकात्म कथा आहे.

Web Title: The grand white elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.