मोर्चे, मिरवणुका आणि शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 03:50 AM2018-02-04T03:50:06+5:302018-02-04T03:50:16+5:30

सन १९६० साली मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आधीच्या काही दशकांतील स्वातंत्र्य लढे आणि पन्नाशीच्या दशकातील मुंबईसाठी झालेली चळवळ इतिहासजमा झाली. राज्य काहीसे स्थिरस्थावर झाले तरी मुंबई मात्र शांत झाली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातल्या नागरिकांच्या अपेक्षांना धुमारे फुटायला लागले.

The front, the procession and the showbiz | मोर्चे, मिरवणुका आणि शोभायात्रा

मोर्चे, मिरवणुका आणि शोभायात्रा

Next

-सुलक्षणा महाजन

सन १९६० साली मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आधीच्या काही दशकांतील स्वातंत्र्य लढे आणि पन्नाशीच्या दशकातील मुंबईसाठी झालेली चळवळ इतिहासजमा झाली. राज्य काहीसे स्थिरस्थावर झाले तरी मुंबई मात्र शांत झाली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातल्या नागरिकांच्या अपेक्षांना धुमारे फुटायला लागले. सरकारदरबारी नानाविध कामांसाठी, गाºहाणी मांडण्यासाठी, संघटित होऊन मागण्या करण्यासाठी मुंबईला येऊन धडकू लागले. राजधानी मुंबई म्हणजे मोठा राजकीय मंच झाला. प्रेक्षकांची कमतरता येथे कधीच नव्हती. साठ-सत्तरच्या दशकात जवळजवळ रोज कोणाचे ना कोणाचे मोर्चे सचिवालयावर, म्हणजेच आताच्या मंत्रालयावर येऊन धडकत. मोर्चातील बाया-माणसांची गर्दी, त्यांच्या हातातील लाल, निळे, भगवे झेंडे, फलक, मेगाफोन आणि त्यातून दिल्या जाणाºया घोषणा, त्याला मिळणारे प्रतिसाद, आजूबाजूचा पोलिसांचा बंदोबस्त या सर्व गोष्टी सरकारपेक्षा नागरिकांचेच लक्ष वेधून घेत असत. प्रेक्षक म्हणून आणि पुढे क्वचित प्रसंगी मोर्चात सामील झाल्यावर त्यातील वणवण, तयारी, मोर्चेबांधणी किती कष्टाची असते हे लक्षात आले. त्याचे फलित किती आणि कोणाला मिळे कोणास ठाऊक. काही काळानंतर त्यातील उत्स्फूर्तता बहुतेक कमी कमी होत गेली आणि आता असे मोर्चे दक्षिण मुंबईमध्ये क्वचितच बघायला मिळतात.
मुंबई आता इतकी अस्ताव्यस्त पसरली आहे की दक्षिण मुंबईत मंत्रालयावर मोर्चे नेणे व्यावहारिक राहिले नसावे. त्यातच ध्वनिप्रदूषणाच्या याचिकेचे निमित्त होऊन उच्च न्यायालयाने मेगाफोनबंदी अमलात आणली. रोजच्या आवाजी मोर्चांमुळे न्यायाधीशांना कोणाचे काही ऐकून घेणे, काम करणे अशक्य झाले होते, हे खरे त्यामागचे कारण होते. नंतर आझाद मैदानापुढे मिरवणूक नेण्यास शासनाने मज्जाव केला. मुंबईचे व्यवस्थापन करणे शासनाला जसे अवघड झाले आहे तसेच विरोधकांना मोर्चेबांधणी करणेही अवघड झाले आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे साठ सालातील संघटित स्वरूप आता विस्कळीत झाले आहे. त्यामुळेच वेगळे होण्याची मनीषा केवळ राज्यातच नाही तर मुंबईतही व्यक्त होत असावी. पन्नास वर्षांपूर्वी लोकांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्यासाठी लढे दिले होते याचा विसर मराठी समाजाला पडलेला दिसतो.
रस्त्यावरच्या मिरवणुका हा दुसरा महत्त्वाचा लक्षवेधक प्रकार मुंबईमध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नित्यनेमाने बघायला मिळत असे. शिवाय त्या काळात प्रभातफेºया हे समाज शिक्षणाचे साधन म्हणून विकसित झाले होते. उठा, जागे व्हा, पारंपरिक समाज बदला, सुधारणा करा असे महत्त्वाचे संदेश देणाºया या प्रभातफेºया आता क्वचितच दिसतात. काही ठिकाणी विविध धर्म-पंथाचे लोक अशा प्रभातफेºया काही विभागांत काढताना दिसतात. परंतु राजकारणी नेत्यांना अलीकडे रात्र-रात्र जागून कामे करावी लागत असल्यामुळे त्यांनी प्रभातफेºयांचा त्याग केला असावा.
गेल्या काही वर्षांत गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचे प्रस्थ बरेच वाढले आहे. डोंबिवली-ठाणे-पुणे आणि इतर काही शहरांत त्याचे लोण पसरलेले दिसते. त्यातून नवमध्यम, सुस्थित वर्गाला धार्मिक, सांस्कृतिक वैभवाचे सार्वजनिक प्रदर्शन करता येते. भरजरी पैठण्या, पारंपरिक दागदागिने, जरतारी उपरणी, पगड्या यांना हवा दाखविण्याचे ते निमित्त होते. अनेक नटलेल्या ललना तर पायी न चालता स्कूटरवरून त्यात सामील होतात. जोडीला लेझीम, ढोल, ताशे, तुताºया यांची साथही असते. त्याद्वारे एका समाजात वर्चस्वाची तर दुसºया समाजात भयाची भावना वाढताना दिसते.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकांना एकत्र आणण्यासाठी, सर्व धर्म, जाती, पंथ यांना एकत्र एकाच ध्येयाच्या दिशेने नेण्यासाठी, तिरंगी झेंड्याखाली संघटित करून संघभावना जोपासली जात असे. प्रभातफेºयांमध्ये खादीच्या, सुती साड्या नेसून महिला सामील होत तर खादीचे सदरे-धोतर हा पुरुषांचा गणवेश असे. सुरेल आवाजात गाणी गाऊन लोकांना उठवण्याचा, जागे करण्याचा विचार त्यामागे असे. शिवाय वर्चस्ववादी, श्रीमंत, परदेशी सत्तेला साध्यासुध्या लोकांनी शांतपणे पण निग्रहाने आव्हान देण्यासाठी निर्माण केलेला मिरवणुकीचा हा प्रकार काही कमी आकर्षक नव्हता. शिवाय तो अतिशय प्रभावी होता. स्वातंत्र्य चळवळीच्या यशातील ते एक प्रभावी साधन होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यापूर्वी जोमदार असलेली सामाजिक संघभावना आज हरवली आहे. बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि स्वतंत्र मुंबईच त्यामुळे हरवून गेली आहे.

Web Title: The front, the procession and the showbiz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई