बहुजनांच्या नेत्यांकडूनही त्यागाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:00 AM2019-02-15T01:00:44+5:302019-02-15T01:01:23+5:30

‘बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान ठेवत निवडणुकीत त्यांना मदत करणार असाल, तर आम्ही आमचे एक पाऊल मागे घेतो’, अशी मोठी प्रभावी भूमिका एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेससमोर ठेवली आहे.

 Expectations from the leaders of the Bahujan community | बहुजनांच्या नेत्यांकडूनही त्यागाची अपेक्षा

बहुजनांच्या नेत्यांकडूनही त्यागाची अपेक्षा

Next

- डॉ. रविनंद होवाळ

(अध्यक्ष, भारतीय बंधुता पक्ष)

‘बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान ठेवत निवडणुकीत त्यांना मदत करणार असाल, तर आम्ही आमचे एक पाऊल मागे घेतो’, अशी मोठी प्रभावी भूमिका एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेससमोर ठेवली आहे. सध्याच्या स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणात वंचित-बहुजनांच्या व्यापक हितासाठी इतका मोठा त्याग करण्याची तयारी ठेवल्याबद्दल ओवेसी यांचे अभिनंदन. मात्र, हे अभिनंदन करताना सर्व आंबेडकरी-बहुजन नेत्यांनीही एकमेकांबाबत अशीच त्यागपूर्ण भूमिका घ्यावी, असे कळकळीचे आवाहन आम्ही करत आहोत.
काँग्रेसने ओवेसी यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे व ओवेसी यांनीही माघार घेण्याचे खरे तर काहीच कारण नाही. ओवेसी हे एक भारतीय नागरिक आहेत व भारतीय राज्यघटनेच्या चौकटीअंतर्गत आपला पक्ष सनदशीरपणे चालवण्याचा व वाढवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. एकीकडे कट्टर धार्मिक भूमिका घेणारे पक्ष भारतात
आक्रमक व मोठे होत असताना तसेच दुसरे मोठे पक्षही सौम्य धार्मिकतेचा स्वीकार करत असताना ओवेसी यांच्यासारख्या व्यक्तींनी गप्प तरी कसे राहावे, असा प्रश्न कोणत्याही शहाण्या माणसाला पडल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत न्याय आपल्या बाजूला असतानाही गोरगरीब, वंचित-बहुजनांच्या व्यापक हितासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी ओवेसी यांनी दाखवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आपण केलेच पाहिजे. पण केवळ त्यांचे अभिनंदन करून भागणार नाही. आपल्यालाही व्यापक हितासाठी अशा भूमिका घेता आल्या पाहिजेत, हे आपण पाहिले पाहिजे. त्यामुळेच ओवेसी यांच्या त्यागपूर्ण भूमिकेचे स्वागत करत असताना अशाच प्रकारच्या मोठेपणाची अपेक्षा रामदास आठवले, रामविलास पासवान आणि दस्तुरखुद्द बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते बसपाप्रमुख मायावती यांच्यापर्यंत सर्व समतावादी, मानवतावादी, प्रजासत्ताकवादी पुरोगामी नेते आणि पक्षांकडून आम्ही करत आहोत.
सर्वच जाती-जमाती आणि धर्मांतील प्रगतिशील प्रवृत्तीच्या पुरोगामी लोकांना समतेसह मैत्रीच्या आणि बंधुतेच्या नात्याने एकत्र आणत त्यांनी आपली ताकद वाढवावी, असे आवाहन त्यांना करत आहोत. त्यासाठीच ‘जोडा आणि राज्य करा!’ हा मूलमंत्रही आम्ही त्यांना देऊ करत आहोत. भारतातील विषमतावादी शक्तींनी सध्या चालवलेल्या ‘फोडा आणि राज्य करा!’ या कु-नीतीला याहून अधिक समर्थ असे दुसरे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे भारतीय वंचित बहुजन व उर्वरित सर्व भारतीयांनीही या मूलमंत्राचा स्वीकार करून जातीय व धार्मिक विद्वेषाचा नायनाट केला पाहिजे.
व्यापक हितासाठी एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याइतकाच त्याग मागील अनेक वर्षांपासून आम्हीही करत आहोत. कोणीही कितीही हानिकारक भूमिका स्वीकारली, तरी त्याच्याबद्दल कडवटपणा न पसरवता समजुतीने सर्वांना एकत्र आणत आहोत. इतरांच्या चुकांवर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न आम्ही आजवर कधीही केलेला नाही. त्यामुळे एकमेकांसाठी त्याग करा, असे आपल्या सर्वजातीय व सर्वधर्मीय बंधूंना छातीठोकपणे सांगण्याचा आम्हाला पूर्ण हक्क आहे, असे आम्ही समजतो. जोपर्यंत परस्परांशी सन्मानजनक तडजोडी आपण करत नाही, तोवर इतर लोक आपल्याशी सन्मानजनक तडजोडी करणार नाहीत, या मुद्द्यावर आम्ही पुन्हा एकदा जाणीवपूर्वक बोट ठेवत आहोत.

Web Title:  Expectations from the leaders of the Bahujan community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.