निवडणूक प्रचारातील चिखलफेक बंद व्हायला हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:54 AM2018-05-14T02:54:36+5:302018-05-14T02:55:07+5:30

यूं पगड़ियां न उछालो दूसरों की कभी वक्त उनका भी आएगा.

Election campaign should stop clutches! | निवडणूक प्रचारातील चिखलफेक बंद व्हायला हवी!

निवडणूक प्रचारातील चिखलफेक बंद व्हायला हवी!

Next

विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

यूं पगड़ियां न उछालो
दूसरों की
कभी वक्त उनका
भी आएगा.
बात करो मुद्दों की ऐ दोस्त
जमाना पलटते देर नहीं लगती...!

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल ईव्हीएममध्ये बंद झाला असून मंगळवारी त्याचा निकाल जाहीर होईल. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वात मोठी शक्ती असून कर्नाटकच्या जनतेने निकाल दिला आहे. निकाल जाहीर होताच जय आणि पराजयाची कारणमीमांसा सुरू होईल! एक पक्ष जल्लोष करेल तर दुसरा गप्प बसेल. प्रत्येक निवडणुकीनंतर असेच होते, कर्नाटकातही तेच होईल!
पण महत्त्वाची गोष्ट अशी की ज्याप्रकारे निवडणुकीचा प्रचार झाला त्यावर क्वचितच कुणी चर्चा करताना दिसेल. पण यावर चर्चा व्हायला हवी. कारण निवडणूक प्रचारात जे काही झाले त्यावर चर्चा न करण्याचा परिणाम थेट आपल्या लोकशाहीवर होणार आहे. आज झालेल्या चुका भविष्यात सुधारल्या नाहीत तर उज्ज्वल भवितव्याची शक्यताही उरणार नाही. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांचे बडे नेते हिरीरीने उतरल्याने त्या प्रचाराकडे माझे बारकाईने लक्ष होते.
काँग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान होते तर भाजपा आणखी एक मैदान मारण्याच्या ईर्षेने पेटली होती. या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत होणे स्वाभाविक होते व जनतेला आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोघांकडूनही निकराचे प्रयत्न केले गेले. यात काही गैर नाही. परंतु यासाठी नेत्यांनी जे मार्ग अनुसरले ते पाहून लोकशाहीच्या पावित्र्यावर विश्वास असणारे घोर चिंतेत पडले. केवळ कर्नाटकच नव्हे तर अन्य राज्यातील लोकांचीही अपेक्षा होती की, सरकारी पक्ष आपल्या कामगिरीवर मते मागेल व विरोधक सरकारच्या चुका आणि उणिवांवर बोट ठेवेल. दोन्ही पक्ष कर्नाटकसाठी एक स्वप्न पुढे मांडतील व जनतेला त्यापैकी जे आवडेल त्यांना ती मते देईल. परंतु कर्नाटकचा निवडणूक प्रचार दिवसेंदिवस अधिक कटु होत गेला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप सुरू झाले की, सद्विवेकी नागरिकांना देशातील लोकशाहीची चिंता वाटू लागली. इतिहासाची तर अशी काही मोडतोड केली गेली की, अशाप्रकारे चुकीचे अर्थ लावण्याचे कारण काय, असा प्रश्न थोडाबहुत इतिहास जाणणाऱ्यांना पडला. इतिहासही बदलण्याचा प्रयत्न होतोय असे वाटू लागले. जुन्या प्रतिकांना निवडणुकीत निष्कारण ओढले गेले आणि सत्याचा विपर्यास करून भाषणबाजी केली गेली. शेवटी असा खोटेपणा करून काय साध्य होणार? हल्लीचे युग माहिती क्रांतीचे आहे व कोणताही खोटेपणा लगेच पकडला जाऊ शकतो याचे तरी भान बोलणाºयांनी ठेवायला हवे होते.
यापेक्षा कर्नाटकच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढविणे अधिक चांगले झाले नसते? कर्नाटकला दुष्काळाचे संकट सारखे भेडसावत असते. राज्यातील ७२ टक्के तळी व तलाव आटून गेले आहेत. ग्रामीण भागांमध्ये बेकारीची गंभीर समस्या आहे. कावेरी व म्हादयी नद्यांच्या पाणी वाटपाचे तंटे सुटत नसल्याने कर्नाटकची अडचण होत आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये रस्ते जीर्ण झाले आहेत. पण या सर्व विषयांना प्रचारात अगदीच किरकोळ स्थान मिळाले. भविष्यातील कर्नाटक कसे असेल याच्या निश्चित योजना दोन्ही पक्षांनी जनतेसमोर ठेवल्या असत्या तर देशभर एक चांगला संदेश गेला असता. पण याऐवजी जात आणि धर्माच्या आधारे जनतेचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न झाले. कर्नाटकात विविध संप्रदायांचे अनेक मठ आहेत. एकट्या लिंगायतांचे ४०० हून अधिक व वोक्कालिगांचे सुमारे १५०. हे मठ खूप प्रभावशाली असल्याचे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक पक्षाच्या नेत्याने या मठांवर लक्ष केंद्रित करून धर्माच्या नावे मते मिळविण्याचे प्रयत्न झाले. निवडणुकीच्या राजकारणात धर्माचा वापर करणे कोणत्याही स्थितीत लोकशाहीला हितावह नाही.
देशाच्या इतर राज्यांप्रमाणे शेतकºयांच्या आत्महत्या हा कर्नाटकमधील एक गंभीर प्रश्न आहे. पण कोणत्याही नेत्याने या विषयाला हात लावला नाही. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला यावरून कोंडित पकडण्याचे धार्ष्ट्य भाजपाने दाखविले नाही कारण भाजपाशासित राज्यांमध्येही शेतकरी आत्महत्या सुरू आहेत! विज्ञान आणि विकासाच्या आजच्या युगात सामान्य माणसाचे अधिक कल्याण कसे करता येईल याची चर्चा व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने कर्नाटकात असे होताना दिसले नाही. खरे तर सामान्य माणसाशी संबंधित प्रश्नांवर समाधानकारक असे बोलायला काही नसते तेव्हाच तर हे राजकीय नेते इतरांची उणी-दुणी काढून आपली कॉलर ताठ करून घेत असतात. कर्नाटकात तेच झाले व यानंतर होणाºया निवडणुकांमध्येही नेतेमंडळी याहून अधिक घाणेरडी चिखलफेक करतील. परस्परांच्या टोप्या उडवायचा हा खेळ थांबणार कसा? मला वाटते की, राजकीय पक्षांनी लोकशाहीच्या शालीन मर्यादा आधी समजून घ्यायला हव्यात व तोंडाला कसा लगाम घालायचा हे आपसात बसून ठरवावे लागेल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या सीमेवरील शौर्यगाथा आपण नेहमीच ऐकत असतो. पण तेव्हा ते गणवेश उतरवून सामान्य नागरिक म्हणून वावरत असतात तेव्हाही ते बहादुरी दाखवतच असतात. लेफ्टनंट आशिष गेल्या आठवड्यात अमृतसर-दादर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. हजरत निजामु्द्दीन स्टेशनवर पहाटे ३ वाजता दोन लुटारू प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटत होते. ते पाहून लेप्टनंट आशिष वरच्या बर्थवरून उडी मारून लगेच खाली आले. झटापटीत लुटारूंनी त्यांच्यावर चाकूने वार केला. पण लेफ्टनंट आशिष यांच्यापुढे डाळ शिजत नाही हे पाहून धावत्या गाडीतून उड्या मारण्याखेरीज लुटारूंना गत्यंतर उरले नाही. लेफ्टनंट आशिष यांना माझा सलाम!

Web Title: Election campaign should stop clutches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.