अधिका-यांच्या अस्थिरतेने शिस्तपर्वात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:49 AM2018-03-03T04:49:08+5:302018-03-03T04:49:08+5:30

कर्तव्यदक्षता व शिस्तप्रियता या तशा हातात हात घालून येणा-या बाबी. या दोन्हींच्या जोडीला राजकारण्यांशी भिडण्याचीही तयारी ज्याच्या ठायी असते, असा अधिकारी आपसूकच लोकप्रियही ठरतो आणि म्हणूनच अशा अधिका-यांची जेव्हा अकाली वा अचानक बदली घडून येते तेव्हा त्यातून ओढवणारी अस्थिरता ही प्रशासनातील शिस्तपर्वात अडसर ठरल्याशिवाय राहत नाही.

Disability disciplined by the officials in disarray | अधिका-यांच्या अस्थिरतेने शिस्तपर्वात अडसर

अधिका-यांच्या अस्थिरतेने शिस्तपर्वात अडसर

Next

- किरण अग्रवाल
कर्तव्यदक्षता व शिस्तप्रियता या तशा हातात हात घालून येणा-या बाबी. या दोन्हींच्या जोडीला राजकारण्यांशी भिडण्याचीही तयारी ज्याच्या ठायी असते, असा अधिकारी आपसूकच लोकप्रियही ठरतो आणि म्हणूनच अशा अधिका-यांची जेव्हा अकाली वा अचानक बदली घडून येते तेव्हा त्यातून ओढवणारी अस्थिरता ही प्रशासनातील शिस्तपर्वात अडसर ठरल्याशिवाय राहत नाही. नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारून नऊच महिने झाले असताना व सेवानिवृत्तीलाही अवघे तीनच महिने शेष असताना महेश झगडे यांची बदली झाल्याकडेही याचसंदर्भाने बघता येणारे आहे.
नाशिकला मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर येथील महापालिकेचे कामकाज प्रभावी करण्यासाठी तुकाराम मुंढे यांना आयुक्तपदी धाडण्यात आल्याची चर्चा अजून शमलेली नसतानाच महसूल आयुक्त झगडे यांची बदली घडून आली आहे. झगडे हेदेखील महसूल आयुक्तालयाचे कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीनेच कामाला लागलेले होते. महापालिकेचे कामकाज सुधारणे जसे वा जितके गरजेचे आहे तसे वा तितकेच ते महसुली कामकाजाच्या बाबतीतही आवश्यक आहे. झगडे यांनी अल्पावधीतच त्यासंबंधीची साफसफाई आरंभलेली दिसून आली होती. पण अवघ्या नऊ महिन्यांतच त्यांना मुंबईत बोलावून घेतले गेले. त्यामुळे पारंपरिक व्यवस्थेत प्रवाहपतीत न होता सेवा बजावून लोकाभिमुखता सिद्ध करणाºया अधिकाºयांना स्थिरता न लाभू देण्याचेच सरकारी धोरण ठरले आहे की काय, अशीच शंका उत्पन्न व्हावी.
महसूल यंत्रणेची आपली एक गती असते ती सहसा बदलत नाही. झगडे यांनी महसूल आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारल्यावर यंत्रणेला शिस्त लावून कामकाजात होणारे प्रशासकीय दुर्लक्ष दूर करण्यावर भर दिल्याचे दिसून आले होते. दफ्तरदिरंगाई व ‘फाईल पेंडन्सी’ दूर करून यंत्रणेची गती वाढविण्यासाठी त्यांनी झगडा चालविला होता. यातून नाशिक महसूल विभागात शिस्तपर्व साकारल्याचे चित्र आकारास आले होते. यंत्रणेला कार्यप्रवृत्त करतानाच झगडे यांनी विविध घोटाळ्यांतील संबंधित अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची कणखर भूमिकाही घेतली होती. त्यामुळे वरिष्ठाधिकारी म्हणून हाताखालील यंत्रणेला पाठीशी घालण्याऐवजी चुकणाºयांना व कामचुकारांना वठणीवर आणणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. यंत्रणेतील अनागोंदी दूर करण्यासाठी असा कणखरपणा आवश्यकच असतो, जो झगडे यांनी दाखवून दिला होता; पण त्यांचीही अल्पावधीत बदली झाली.
महत्त्वाचे म्हणजे, झगडे यांच्या पूर्वीचे महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदी अधिकाºयांच्या बाबतीतही तोच अनुभव येऊन गेला आहे. यातील कुणालाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला गेला नाही. गतिमान प्रशासनाची हाकाटी पिटणाºया विद्यमान शासनाच्या काळात तर शिस्तप्रिय अधिकाºयांच्या अस्थिरतेचे प्रमाण आणखीनच वाढीस लागले. त्याचा परिणाम शिस्तीवर तर झालाच, शिवाय प्रशासनाच्या गतीवरही झाला. झगडे यांच्या बदलीतूनही याच अस्थिरतेला जणू दुजोरा लाभून गेला आहे.
>महेश झगडे यांचीही अल्पावधीत बदली झाल्याने प्रशासनात शिस्तपर्व साकारणा-या अधिका-यांची अस्थिरता अधोरेखित होऊन गेली आहे.

Web Title: Disability disciplined by the officials in disarray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.