भगिरथाचे वंशज

By Admin | Published: June 10, 2015 12:30 AM2015-06-10T00:30:34+5:302015-06-10T00:30:34+5:30

भगिरथाने गंगा पृथ्वीवर आणली पण भगीरथ पुत्र सगराने गंगेच्या पाण्याचे नियोजन केले. मराठवाड्यातील गावोगावच्या गंगा प्रवाहीत करण्याचे काम हे भगिरथाचे वंशज करीत आहेत.

Descendants of the satyagraha | भगिरथाचे वंशज

भगिरथाचे वंशज

googlenewsNext

सुधीर महाजन
भगिरथाने गंगा पृथ्वीवर आणली पण भगीरथ पुत्र सगराने गंगेच्या पाण्याचे नियोजन केले. मराठवाड्यातील गावोगावच्या गंगा प्रवाहीत करण्याचे काम हे भगिरथाचे वंशज करीत आहेत.
-------------
पाणीटंचाईपायी मराठवाड्याची नवी ओळख आता टँकरवाडा अशी झाली आहे. या परिस्थितीत जुन्या जलस्त्रोतांचा शोध घेऊन त्यांचे पुनरूज्जीवन करण्याचे काम काही ध्येयवेड्या लोकांनी हाती घेतले आहे. लष्कराच्या भाकरी भाजण्याचा प्रकार करणारी मंडळी समाजात असतात. या समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात कायम प्रबळ असते. अशाच मंडळींनी मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्या पुन्हा जिवंत करण्याचा उपक्रम हाती घेतला. गावोगावातून नामशेष झालेल्या किंवा गटारगंगा बनलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे हा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
आनंद असोलकर, निश्चल शेंडे आणि राहुल कुुलकर्णी हे तीन मित्र आपल्या व्यवसायात यशस्वी, पण समाजासाठी काही तरी वेगळे करावे ही आतून असलेली उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी वेरूळच्या येळगंगा नदीचा शोध घेतला आणि ती स्वच्छ करण्याचा चंग बांधला. नदी खोल करणे, रुंद करणे आणि स्वच्छ करणे. यामुळे पाणी प्रवाहीत होईल. पाणी जमिनीत मुरून पाण्याची पातळी वाढेल हे काम करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते पण जिद्द होती. गावातून प्रतिसाद नव्हता. पदरमोड करून काम सुरू केले. त्यांची तळमळ पाहून जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी ५६ हजार रुपये दिले. हे लोक खरेच प्रामाणिकपणे काम करीत आहेत हे लक्षात येताच वेरूळच्या घृष्णेश्वर ट्रस्टने त्यांना दहा दिवस जेसीबी मशीन उपलब्ध करुन दिले. त्यांच्या कामाची चर्चा झाली. महाराष्ट्र बँकेने पुढाकार घेत पाच लाख दिले तर केअरिंग फ्रेंडस् ही संस्था आणि अ‍ॅक्सीस बँक यांनी प्रत्येकी पाच आणि चार लाख दिले. येळगंगा नदीचे रूंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सात आठवडे चालले. साडे सहा कि.मी. लांबीचे पात्र रूंद झाले. या पात्रामध्ये दोन जुन्या विहिरी सापडल्या. भर उन्हाळ्यात त्यातून हाताने पाणी घेता येते, एवढे काम आपल्या गावात होत असताना गावकऱ्यांचा त्यात सहभाग नगण्य होता. खरे तर या तिघांचे हे गाव नाही, तेथे शेतीवाडी नाही.
येळगंगा नदीच्या या पुनरूज्जीवनातून तेथे दहा ते बारा हजार हेक्टर्स जमिनीचे कायम सिंचन होणार तर किमान दीड हजार विहिरींची पाण्याची पातळी वाढणार. येळगंगेचे काम चालू असतानाच त्यांनी वैजापूर या कायम दुष्काळी तालुक्यातील धोंदलगाव आणि अमानतपूर या गावात असाच प्रकल्प हाती घेतला. मात्र तिथे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि खर्चाचा अर्धा वाटाही त्यांनी उचलला. धोंदलगाव येथे ३०० मीटर तर अमानतपूर येथे २०० मीटर पात्र रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम झाले. या दोन्ही ठिकाणी ८० आणि ६० लाख लिटर पाणी मुरणार.
लातूर जिल्ह्यातही असे काम ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षापासून हाती घेतले. अ‍ॅड. महादेव गोमारे, मकरंद जाधव, कैलास जगताप, बालाजी साळुंखे, संतोष गिरवलकर ही मंडळी यासाठी जिल्हाभर काम करतात. गेल्या वर्षी त्यांनी २६ गावांमध्ये काम केले. दुष्काळ असूनही पाण्याची पातळी तीन ते चार मीटर्सनीे वाढली. यावर्षी २५ गावांमध्ये काम झाले व येथे लोकसहभाग आहे आणि गावांनीही ५० टक्के खर्चाचा वाटा उचलला. सुमारे १५ हजार तास काम चालले. रेणापूर हे दुष्काळी गाव पण त्या गावातून प्रतिसाद मिळाला. लोकानी एक कोटी जमा केले आणि त्या प्रयोगातून तेथे बदल दिसला. लोकांमध्यील नकारात्मकता दूर करण्यासाठी कामातील पारदर्शकता उपयोगी पडली. मराठवाड्याच्या पाणीटंचाईवर तोडगा निघाला आहे. आता प्रत्येक गावाने हा कित्ता गिरवला तर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही.
इंग्रजांनी तयार केलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ४५ छोट्या-मोठ्या नद्यांची नोंद आहे. ती सुद्धा गोदावरी आणि तापी खोऱ्याच्या तपशिलासह. यातील किमान दहा-पंधरा नद्या अस्तित्वात नाहीत. काही नावे सुद्धा विस्मृतीत गेली आहेत. या छोट्या नद्या बुजल्या, काहींच्या गटारगंगा झाल्या. पाण्याचे हे स्त्रोत आपण स्वत:हून नष्ट केले. भगिरथाने गंगा पृथ्वीवर आणली पण भगीरथ पुत्र सगराने गंगेच्या पाण्याचे नियोजन केले. मराठवाड्यातील गावोगावच्या गंगा प्रवाहीत करण्याचे काम हे भगीरथाचे वंशज करीत आहेत.

 

Web Title: Descendants of the satyagraha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.