जनमत कौलाच्या मागण्या वादाच्या भोव-यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 08:45 PM2019-01-22T20:45:36+5:302019-01-22T20:46:35+5:30

जनमत कौलाविषयीच्या वादाने आता धार्मिक वळण घेतल्याने त्यातून उपजलेल्या दोन प्रमुख मागण्या मान्य होण्याची शक्यता धूसर बनली आहे. 

The demands of the opinion polls are in the middle of the conflict! | जनमत कौलाच्या मागण्या वादाच्या भोव-यात!

जनमत कौलाच्या मागण्या वादाच्या भोव-यात!

Next

- राजू नायक

जनमत कौलाविषयीच्या वादाने आता धार्मिक वळण घेतल्याने त्यातून उपजलेल्या दोन प्रमुख मागण्या मान्य होण्याची शक्यता धूसर बनली आहे. विधानसभा संकुलात जॅक सिकैरांचा पुतळा उभारावा व पाठय़पुस्तकात या चळवळीविषयीचा धडा समाविष्ट करावा, अशा मागण्या ख्रिस्ती लोकानुरंजनातून गोवा फॉरवर्ड पक्षाने पुढे केल्या होत्या. गोव्याने एका वर्षापूर्वीच जनमत कौलाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला व त्यानिमित्त मडगाव शहरातील एका रस्त्याचे या चळवळीच्या नावे नामकरण केले व त्यात भाग घेतलेल्यांचा उचित सन्मान केला.

परंतु जनमत कौलातून निर्माण झालेल्या वादामुळे दोन प्रमुख धर्मात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त झाली आहे. डॉ. जॅक सिकैरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभा करण्यास हिंदू संघटनांचा विरोध आहे. सरकारात सामील असणा-या मगो पक्षाला भाऊसाहेब बांदोडकरांच्या बरोबरीने तो पुतळा उभारलेला नकोय, तर रा.स्व. संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी जनमत कौल हा गोवा मुक्तीपेक्षा मोठा असल्याच्या विधानाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

डॉ. जॅक सिकैरांचा पुतळा विधानसभा संकुलात असावा व राज्याच्या जनमत कौलाचे पितामह म्हणून त्यांना योग्य सन्मान मिळावा अशी येथील ख्रिस्ती समाजाची मागणी आहे. ख्रिस्ती पुनरुज्जीवनवादी चळवळ गेल्या १० वर्षात तीव्रतेने चालली आहे. रोमन कोकणी भाषेला मान्यता, गोव्याचे अस्तित्व राखणे, विकासकामांना विरोध आदी त्याच्या चळवळी या काळात जोरात सुरू आहेत. त्यात भर म्हणून त्यांचे वृत्तपत्र ‘वावराडय़ांचो इश्ट’ने या काळात अनेक प्रक्षोभक लेख छापले. हेराल्ड या इंग्रजी दैनिकातही अनेक प्रक्षोभक लेख प्रसिद्ध होतात. त्यात गोवा सैन्य पाठवून पादाक्रांत केला, भारताचे आक्रमण वगैरे भाषा वापरली जाते. पोतरुगालचे गोव्यातील अस्तित्व आम्ही अमान्य करू शकत नाही आणि सध्या उत्तर भारताने गोव्यात वसाहतवादच चालविला आहे, असे तेथे ठासून मांडले जाते.

डॉ. जॅक सिकैरा यांना ‘जनमत कौलाचे पितामह’ मानणे त्या धर्मातील अनेक विचारवंतांना मान्य नाही. सिकैरा यांचा प्रभाव केवळ उत्तर गोव्यात होता; परंतु दक्षिण गोव्यात ख्रिस्ती समाजातील अनेक बुद्धिवादी नेते या चळवळीत पुढे होते. त्यांच्याबरोबर हिंदू नेत्यांचे कर्तृत्वही असामान्य असे होते. कोकणी भाषा, अस्मिता यांचे अत्यंत समर्पक मुद्दे त्यांनी सामोरे आणले. उलट अनेक ज्येष्ठ ख्रिस्ती नेत्यांना त्या काळात कोकणी व्यवस्थित बोलताही येत नसे. ते घरी पोर्तुगीज बोलत. जॅक सिकैरा विधानसभेत इंग्रजीतून बोलत असत. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या तीन विधानसभा व गोव्याचे राजकारण सिकैरा कुटुंबाने गाजविले असले तरी त्यानंतर ख्रिस्ती मतदारसंघांनीच त्यांचा पराभव केला व या घराण्याचे राजकारण संपविले. राज्याच्या बदलणा-या राजकारणाची एक झलक त्या पराभवातून सामोरे आली होती. कालांतराने युनायटेड गोवन्स पक्ष काँग्रेसमध्ये सामील झाला व त्यानंतर मगोपचे राजकारण पातळ होत भाजपाचा उदय झाला. गोव्याची लोकसंख्या जी मुक्तीच्यावेळी १९६१ मध्ये सात लाख होती ती आज १६ लाखांवर पोहोचली. या काळात ख्रिस्ती लोकसंख्या कमी होत आज ती केवळ २२ टक्के आहे. त्यामुळे आपला प्रभाव संपत असल्याचे वाटून ख्रिस्ती चर्चने गोवा वाचविण्याची हाक सतत दिली व पुनरुज्जीवनवादाच्या चळवळीचा भाग म्हणून ख्रिस्ती ऐक्य बळकट करण्यावर भर दिला. त्यातून समाजाचा एक मोठा नेता म्हणून जॅक सिकैरांचे उदात्तीकरण त्यांनी चालविले आहे.

वास्तविक हिंदू बहुजन समाजाला सिकैरांचा पुतळा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या निकट उभारायला विरोध आहे. सिकैरा ज्या उच्चभ्रू समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी पोर्तुगीज आमदनीत हिंदू उच्चभ्रू समाजाच्या बरोबरीने बहुजन समाजाचे खच्चीकरण केले. त्यामुळे हा समाज जनमत कौलात महाराष्ट्राबरोबर जाण्याच्या मताचा होता, असे मत ख्रिस्ती समाजातील एक विचारवंत डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी व्यक्त केले आहे. सध्या संवेदनशील बनलेला ख्रिस्ती समाज जनमत कौलाचा धडा पाठय़पुस्तकात समाविष्ट करायला जरूर पाठिंबा देईल; परंतु तो कशा पद्धतीने लिहिला जाईल याबद्दल बहुजन समाजाच्या मनात संशय असण्याची शक्यता आहे. त्यामुळेही हा धडा वादात सापडून ती मागणी पूर्णत्वास येईल का, याबद्दल परस्परविरोधी मते व्यक्त होताना दिसतात.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

Web Title: The demands of the opinion polls are in the middle of the conflict!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा