गाय झाली ‘राजकीय प्राणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 07:04 AM2017-07-21T07:04:53+5:302017-07-21T07:04:53+5:30

तीन वर्षांपूर्वी अख्ख्या भारतवंशात ‘चाय पे चर्चा’ला ऊत आला होता. केवळ टपऱ्यांवरच नव्हे तर कॉर्पोरेटमधेही कधी नव्हे त्या चाय पे चर्चा रंगू लागल्या होत्या.

The cow became a 'political animal' | गाय झाली ‘राजकीय प्राणी’

गाय झाली ‘राजकीय प्राणी’

googlenewsNext

तीन वर्षांपूर्वी अख्ख्या भारतवंशात ‘चाय पे चर्चा’ला ऊत आला होता. केवळ टपऱ्यांवरच नव्हे तर कॉर्पोरेटमधेही कधी नव्हे त्या चाय पे चर्चा रंगू लागल्या होत्या. अलीकडच्या वर्षात मात्र या ‘चाय’ची जागा ‘गाय’ने घेतली आहे, बरे का! देशात गाय हा एवढा कळीचा आणि देशभक्तीचा मुद्दा होईल, याचा विचारही बहुदा कुणी केला नसावा. दस्तुरखुद्द गार्इंनासुद्धा आपले ‘अच्छे दिन’ येणार हे कुठे माहिती होते? आश्चर्य म्हणजे, टीआरपीत जंगलचा राजा वाघोबालाही तिने मागे टाकले आहे म्हणे! अशात देशवासीयांचे हे असीम प्रेम बघून गाईचा ऊर भरून येणारच! नव्हे त्या चौखूर उधळणारच! आणि हे स्वाभाविकच म्हणायचे. कुठल्याही सुरक्षेची मागणी न करता स्वयंघोषित सुरक्षा फौज त्यांच्यासाठी तैनात होत असेल तर ही या गरीब कपिलांसाठी अभिमानाचीच बाब असणार ना! अर्थात तिच्या या सुरक्षा फौजेचा भावनांक इतका अतिरेकी आणि नकारात्मक आहे की गाईला माणूस बनविण्याच्या प्रयत्नात तीच पशू बनते आहे, ते अलाहिदा! एकंदरीत काय तर वाघ, सिंह या राष्ट्रीय प्राण्यांच्या तुलनेत गाईचे वाढते ‘वजन’ बघितल्यावर तिला ‘राजकीय प्राणी’ जाहीर करण्यास कुणाची काही हरकत नसावी. तसे एखाद्याला राजकीय कवचकुंडले प्राप्त झाली की त्याचा कसा उद्धार होतो आणि ती निघाली की बडेबडे असामी कसे जाळ्यात अडकतात याची कल्पना तुम्हा आम्हा सर्वांना आहेच. गायही काही ‘दूध’खुळी नाही. म्हणूनच कदाचित आधार कार्ड मिळणार ही आनंदवार्ता कळल्यावर एकदम ‘रिअ‍ॅक्ट’ न होण्याचेच तिने ठरविले. पण तिच्या या उदोउदोने वाघाचा मात्र प्रचंड जळफळाट होत असल्याचे कानी आले. वर्षानुवर्षे गणना आमची करायची आणि आधारकार्ड मात्र गार्इंना द्यायचे हे काही त्याला पटलेले नाही. भरीसभर म्हणजे हरियाणाचा लुवास येथील लाला लजपतराय पशुचिकित्सा व पशुविज्ञान विद्यापीठाने गार्इंसाठी हायटेक मसाज केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजले तेव्हा तर काही विचारायलाच नको. एका अर्थी ही मसाज केंद्रे सर्वांच्याच फायद्याची असणार आहेत. देशभरात अशी मसाज केंद्रे उघडली की गार्इंना रस्त्यांच्या मधे, चौकात आराम करण्याची गरजच भासणार नाही आणि वाहतुकीतील अडथळा आपसूकच दूर होईल. राज्याराज्यांमध्ये गो अभयारण्ये निर्माण करण्याचाही काही राजकीय नेत्यांचा मानस आहे. याशिवाय ‘घर तिथे गाय’ या योजनेचा घाट घातला जातोय. ही योजना अमलात आली तर भविष्यात प्रत्येक इमारतीत गार्इंसाठी राखीव जागा असेल. याला म्हणतात नशीब. गार्इंची तर मज्जाच मज्जा आहे बुवा! फक्त चिंता एकच वाटते, ती ही की पोस्ट-ट्रूथच्या या जमान्यात गाईवरील हे प्रेम आभासी ठरु नये म्हणजे झाले!

Web Title: The cow became a 'political animal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.