कोसळलेली सुरक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:48 AM2018-07-04T00:48:44+5:302018-07-04T00:49:17+5:30

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुस-याच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले.

 Collapsed Security! | कोसळलेली सुरक्षा!

कोसळलेली सुरक्षा!

Next

रेल्वेला श्रीमंती चोचले पुरवणाऱ्या प्रकल्पांपेक्षा सुरक्षित, सुसह्य प्रवासाची गरज आहे, या मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांच्या सल्ल्याचे महत्त्व किती आहे, हे दुसºयाच दिवशी अंधेरीत रेल्वेमार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेने दाखवून दिले. त्याचवेळी पुलाखालून एखादी लोकल जात असती, तर अनर्थ ओढवला असता. दहा महिन्यांपूर्वी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर पायाभूत सुविधांवर भर दिल्याचा दावा रेल्वेने केला. स्ट्रक्चरल आॅडिट करत सारे पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला. तो किती तकलादू होता, याची प्रचिती या दुर्घटनेमुळे आली. सुरक्षेचा अधिभार वसूल करूनही मुंबईच्या ७५ लाख उपनगरी प्रवाशांची सुरक्षा कशी वाºयावर आहे, हे नव्याने समोर आले. यापूर्वी ठाण्यात लोकलवर जलवाहिनी पडली होती. डोंबिवलीत काम सुरू असलेला पादचारी पूल कोसळला होता. असह्य गर्दीमुळे गाडीतून पडून प्रवासी मरण पावतात. दरवर्षी रेल्वे दुर्घटनांत सरासरी दोन हजार प्रवाशांचा बळी जातो. असे काही घडले, की लगोलग सुरक्षा बळकटीच्या घोषणा होतात, पण आपल्या हक्कासाठी प्रवाशांना वेठीला धरणाºया संघटना असोत, की तोट्याचे कारण दाखवून भाडेवाढ लादणारे प्रशासन, ज्या रेल्वे प्रवाशांच्या जिवावर हा कारभार सुरू आहे त्यांच्या जिवाची त्यांना किती फिकीर आहे, हेच या घटनेने दाखवून दिले. दुरुस्तीच्या कामांना पुरेसा वेळ मिळत नाही, म्हणून दर आठवड्याला मेगाब्लॉक घेतला जातो, त्याला दोन दशकांहून अधिक काळ उलटला. रोजची उपनगरी वाहतूक बंद असण्याचा काळ पावणेतीन तासांवरून साडेतीन तासांवर नेण्यात आला. तरीही रेल्वेचे रडगाणे सुरूच आहे. गाडी किती काळात फलाटावर येईल, ती वेळ दाखवून कधी पाळली जात नाही; पण ती इंडिकेटर बदलण्याचा खर्च वारंवार केला जातो, या वृत्तीतून रेल्वेची कार्यक्षमता चव्हाट्यावर येते. आताही दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी सुरक्षेवर ६५ हजार कोटी खर्च करणार असल्याचा आकडा जाहीर केला. तोवर सारे पूल सुरक्षित असल्याची ग्वाही देणाºया रेल्वे आणि पालिकेने जबाबदारी परस्परांवर ढकलण्याचा पोरखेळ पार पाडला. आजवरच्या कोणत्याही रेल्वे दुर्घटनांत कधी कुणावर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. व्यवस्थेतील, यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवून कधी तांत्रिक; तर कधी मानवी चुकांवर बोट ठेवून चौकशीचा सोपस्कार उरकला जातो. त्यामुळे आताच्या घटनेनंतरही जर जबाबदारी निश्चित झाली नाही, तर चौकशीच्या नावावर वेळ काढला जाईल. पुन्हा नवी दुर्घटना घडेपर्यंत साºया यंत्रणा सुस्त राहतील आणि प्रवासी मात्र तसाच घुसमटत राहील.

Web Title:  Collapsed Security!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.