भावा, सांभाळ रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:38 PM2019-01-31T17:38:09+5:302019-01-31T17:39:28+5:30

कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात.

Brother, take care! | भावा, सांभाळ रे !

भावा, सांभाळ रे !

Next

मिलिंद कुलकर्णी

लोकसभा व विधान सभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्याने सर्वत्र निवडणूक ज्वर पसरला आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत राजकारणाचीच चर्चा सुरु आहे. लग्नकार्य असो की, अंत्ययात्रा...दोन्ही ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा आहे. समाजमाध्यमांवर तर निवडणूक विषयी चर्चेला महापूर आला आहे. मोदीभक्त आणि विरोधक अशी सरळ विभागणी झालेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने, त्यांनी आधार कार्डविषयी केलेले वक्तव्य व्हीडिओद्वारे पुन्हा प्रसारीत करुन त्यातील फोलपणा लक्षात आणून दिला जात आहे. जनरल थिमय्या, संत रविदास, संत कबीर आणि अन्य संतांचा कालावधी यात मोदी यांनी भाषणात केलेली गफलत आवर्जून लक्षात आणून दिली जात आहे. अर्थात भक्तदेखील प्रत्युत्तरादाखल राहुल गांधी, नवज्योतसिंग सिध्दू यांचे व्हीडिओ प्रसारीत करीत आहे. विश्वैश्वरैया यांचा नामोच्चार करताना राहुल गांधी यांची उडालेली भंबेरी, बटाट्याविषयीचे कथित वक्तव्य हे व्हीडिओ सर्वाधिक प्रसारीत होत आहे. व्हॉटस अ‍ॅप मेसेजद्वारे मोदी यांचे महिमामंडन केले जात आहे. त्यात मोदी यांच्या परिवारातील कुणीही सत्तेत नाही. आईसोबत घराच्या ओट्यावर प्लॅस्टिक खुर्चीवर बसलेल्या मोदी यांचा फोटो आवर्जून प्रसारीत केला जातो. हिमालयात तपस्या करायला गेलेल्या मोदी यांचे छायाचित्र सर्वाधिक प्रसारीत होत आहे. परदेशी निधी मिळणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर निर्बंध, पॉस व आधारमुळे स्वस्त धान्य दुकानांमधील गैरव्यवहार रोखणे, सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीने काळाबाजाराला चाप असे महत्त्वपूर्ण निर्णय भाजपा आणि भक्तांकडून प्रसारीत होत आहेत. तर काँग्रेस आणि मोदी विरोधक हे असहिष्णुता, दलित-मुस्लिमांवरील अन्याय, राममंदिराचा अनुत्तरीत विषय, १५ लाख रुपये बँक खात्यात न येणे, मल्या, नीरव मोदी, चोकसी यांचे देशातून पलायन या मुद्यांवर जोर देत आहेत.
प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याने समाजमाध्यमांवरील युध्दाला आणखी धार चढली आहे. भाजपा आणि मोदीभक्त प्रियंका यांच्यावर अक्षरश: वैयक्तीक टीका करीत आहेत. दिल्लीतील रात्रीच्या रॅलीत धक्काबुक्की करणाºया नागरिकांना रागावणाºया प्रियंकाविषयी अपप्रचार करणे, भावाच्या मदतीला धावून आलेल्या इतिहासातील बहिणींचे उल्लेख करुन खिल्ली उडविणे, मोदींच्या कुटुंबातील कुणीच राजकारणात नसताना गांधी घराण्यातील तिसरी व्यक्ती आता राजकारणात आल्याचे अधोरेखित करणे, असे प्रकार सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर दोन छायाचित्रे सर्वाधिक चर्चेत राहिली. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या विशेष शोसाठी राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपस्थिती आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत खूप चर्चेत राहिले. दुसरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुपूत्राच्या विवाह सोहळ्याला उपस्थित काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, राष्टÑवादीच्या सुप्रिया सुळे, सुनेत्रा अजित पवार, स्मिता ठाकरे, रश्मी उध्दव ठाकरे यांचे समूह छायाचित्रदेखील लोकप्रिय झाले. दोन्ही प्रसंग वेगळे आहेत. बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तीमत्व असे आहे की, सर्वच पक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर मन:पूर्वक प्रेम करीत असत. त्यांच्यावरील चित्रपटाला त्यामुळे सर्वपक्षीयांनी हजेरी लावली आणि मोकळेपणाने मनोगते व्यक्त केली. तर राज ठाकरे यांच्याकडील पहिल्या शुभकार्याला सगळे जमणे ओघाने आलेच. लग्नकार्य, सुखद प्रसंगात एकत्र येणे ही तर भारतीय संस्कृती झाली. त्याला अनुरुप हे सगळे झाले. पण निवडणुकीचे राजकारण इतके हातघाईला आलेले आहे की, कार्यकर्त्यांना ही गोष्ट कल्पनेपलिकडील वाटते. त्यातून मग संदेशांचा भडीमार सुरु झाला. भावा, सांभाळ रे. गावा गावात आपण पक्ष आणि नेत्याच्या नावाने भांडत बसतो आणि तिकडे नेते एकत्र येतात आणि हास्यविनोद करतात. मात्र या संदेशात अर्धसत्य आहे. कोणताही पक्ष आणि नेता हा कार्यकर्त्यांना द्वेशबुध्दीने वागा, प्रतिस्पर्धी पक्ष व कार्यकर्त्याचा मत्सर करा असे कधीही सांगत नाही. खाली कार्यकर्तेच एकमेकांना कट्टर शत्रू समजून वागत, बोलत असतात. नेत्यांच्या पातळीवर असलेले समंजसपण, तारतम्य, परिपक्वता ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली तर लोकशाहीच्यादृष्टीने ते सुचिन्ह म्हणावे लागेल.

Web Title: Brother, take care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव