मराठवाड्यात भाजपची जमवाजमव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:33 AM2017-12-06T03:33:22+5:302017-12-06T03:33:31+5:30

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची जमवाजमव भाजपने मराठवाड्यात सुरू केलेली दिसते आणि त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.

BJP's mobilization in Marathwada | मराठवाड्यात भाजपची जमवाजमव

मराठवाड्यात भाजपची जमवाजमव

Next

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची जमवाजमव भाजपने मराठवाड्यात सुरू केलेली दिसते आणि त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये आले होते, तर त्यांनी राष्टÑवादीचे नेते आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी पायधूळ झाडली. त्यापाठोपाठ महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी औरंगाबादमध्ये चार ठिकाणी भेटीगाठी घेतल्या. त्यात चर्चा झाली ती वेरूळची. ते शांतिगिरी महाराजांच्या भेटीला गेले होते.
महाराज गेल्या ४० वर्षांपासून सेवेकरी. जनार्दन स्वामींच्या निर्वाणानंतर ते मठाचे प्रमुख बनले. स्वामींची मूळ समाधी कोपरगावला; पण त्या मठात त्यांना स्थान नाही. शांतिगिरी महाराजांचा माजी खा. रामकृष्ण बाबा पाटील, अशोक पाटील डोणगावकर यांच्याशी घनिष्ठ मेळ होता. पुढे ते खा. चंद्रकांत खैरेंच्या संगतीतही होते.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांच्या भक्तांची मोठी मांदियाळी असल्याने राजकारण्यांसाठी बाबांचे महत्त्व आजही आहे. महाराज मूळचे निफाड तालुक्यातील लाखलगावचे. बाबूराव यशवंत कांडेकर हे त्यांचे मूळ नाव; पण बालपणापासून अध्यात्माची आवड असल्याने ते जनार्दन स्वामींचे सेवेकरी झाले आणि पुढे उत्तराधिकारी. राजकारण्यांच्या सहवासामुळे २००९ मध्ये त्यांच्याही राजकीय महत्त्वकांक्षेने उचल खाल्ली होती आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली; पण पराभूत झाले तरी त्यांना मिळालेली मते दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. चंद्रकांत पाटलांनी जरी सांगितले की, तेथील हरिनाम सप्ताहामध्ये भेट देण्यासाठी आलो होतो; पण यांच्या पारमार्थिक गप्पा झाल्या असतील याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. या दीड तासाच्या भेटीने चर्चेला उधाण आले, औरंगाबाद मतदारसंघात भाजप आपला उमेदवार शोधत असल्याची आवई अगोदरपासूनच उठल्याने भरथंडीत गरमागरम चर्चा रंगली. भाजप असलेल्या जुन्या, नव्या चेहºयांचा विचार केला, तर भाजपचा हा ‘कात्रज घाटा’चा प्रयोग असावा. माजी खा. जयसिंगराव गायकवाड जिल्हाभर शेतकºयांच्या भेटीघाटी घेत फिरत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाही म्हणत विचार करताना दिसतात. त्याचवेळी ही हरिनाम सप्ताहातील गाठभेट रसद जमवाजमवीचा भाग असावा. यावेळी त्यांनी येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत अदवंतांच्या घरी उद्योजकांच्या नव्या पिढीशी चर्चा केली. अदवंत हे अभ्यासू वकील म्हणून ओळखले जातात. किशोर शितोळे, सतीश वेताळ आणि वास्तुविशारद सुशील देशमुख यांच्याही घरी ते गेले. ही सर्वच मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत; पण राजकारणात नाही.
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर राष्टÑवादीचे नेते असले तरी भाऊबंदकीने त्रस्त झाले. येथेही पुतण्याचा त्रास वाढला तो पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादाने. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांशी त्यांचे गूळपीठ जमलेले दिसते. गेल्या आठवड्यात त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार आलेच नाहीत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची भेट ही राजकीय फोडणीच समजली जाते, तर अशी बांधाबांध मराठवाड्यात चालू आहे. ढोल कसे वाजणार हे गुजरातच्या निकालावरच अवलंबून आहे.
- सुधीर महाजन

sudhir.mahajan@lokmat.com

Web Title: BJP's mobilization in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा