वाढदिवस की घटदिवस ?, कधी तिथीने तर दुस-यांदा काय तर दिनांकानं करतात वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 05:38 AM2017-10-22T05:38:42+5:302017-10-22T05:38:45+5:30

वाढदिवस साजरा करायला कोणाला आवडत नाही बरे? सा-यांनाच आवडते. काही काही तर वर्षातून दोन-दोन वेळा अधिकृतपणे वाढदिवस साजरा करणारे उत्साही महाभाग भेटतात.

Birthdays of birthdays, occasional dates, birthday celebrations, etc. | वाढदिवस की घटदिवस ?, कधी तिथीने तर दुस-यांदा काय तर दिनांकानं करतात वाढदिवस साजरा

वाढदिवस की घटदिवस ?, कधी तिथीने तर दुस-यांदा काय तर दिनांकानं करतात वाढदिवस साजरा

Next

- डॉ. नीरज देव
वाढदिवस साजरा करायला कोणाला आवडत नाही बरे? सा-यांनाच आवडते. काही काही तर वर्षातून दोन-दोन वेळा अधिकृतपणे वाढदिवस साजरा करणारे उत्साही महाभाग भेटतात. एकदा काय तर तिथीने तर दुस-यांदा काय तर दिनांकाने. प्रत्येक संस्कृतीत, समाजात या ना त्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची प्रथा असते; कधी मेणबत्ती विझवून तर कधी दिवा लावून!
माझ्या मनात प्रश्न डोकावतो; वाढदिवसाला वाढदिवस का म्हणतात हो? खरे तर आपण रोजच वाढत असतो. येणारा व जाणारा प्रत्येक दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वाढ करणारा वाढदिवसच असतो. मग जन्मदिवसालाच वाढदिवस का म्हणावे? इंग्रजीत तर वाढदिवसाला बर्थ डे अर्थात जन्मदिवसच म्हणतात. पण खरंच तो जन्मदिवस असतो का? नाही ! आपल्याला जन्म देणारा दिवस तर दूर कोठेतरी फेकला गेलेला असतो; वीस, पंचवीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ वर्षे मागे !
काळाने फेकलेला हा गतकाळाचा चेंडू दूर दूरच जाणारा असतो. तो कधीही आपल्या टापूत न येणारा असतो. मग तो गेलेला क्षण असो वा वर्षे; युगे असोत. खरे तर आपल्याला जन्म दिलेला दिवस काळाच्या गर्तेत केव्हाच गडप झालेला असतो. गेलेले वर्ष पुन्हा येणारे नसते. त्यामुळे ते आ-यासारखे जन्मवर्ष म्हणून आपल्या जीवनात घट्ट बसते. महिन्यात तीस-एकतीस दिवस असतात. त्याला पकडणे आपणास शक्य नसते व उपयोगाचेही नसते. म्हणून आपण दरवर्षी येणारा आपला जन्मदिवस दाखवणा-या दिनांक वा तिथीलाच वेठीस धरतो. आपली पाळेमुळे जोडलेली असतात ३६६ दिवसातील त्या एखाद्या दिनांकाशी वा एखाद्या तिथीशी. वर्षामागून वर्षे उलटतात. पण आपले त्या दिनांकाशी जडलेले नाते सरत नाही. सरावे असेही वाटत नाही. त्यामुळेच वाढवर्ष न म्हणता वाढदिवस म्हणत असावेत.
गंमत अशी ज्या दिनांकावर आपण जन्मलेलो असतो तो दिवस, तो दिनांक पहिली चार-पाच वर्षे तरी आपल्याला कळतही नसतो. कारण कालगणनेची धारणा अद्याप विकसित झालेली नसते. मग तो आठवणे तर दूरच राहिले. बालपणी त्या दिवसाचे स्मरण केवळ केक कापायचा दिवस इतकेच असते. अन एकदा केक कापला की, त्यानंतर निदान सात-आठ दिवस तरी मला केक कापायचा, असा हट्ट बालपणी सर्वच करीत असतात.
तर सांगत काय होतो, त्या दिवसाशी असलेले आपले नाते त्या दिनांकाला आपल्याला व आपल्या आप्तस्वकीयांना प्रकर्षाने जाणवते. तो दिनांक आपण पकडून ठेवलेला असतो मैलाचा दगड म्हणून. जसजसे संवत्सररूपी मैलाचे दगड मागे जाऊ लागतात तसतसा मी वाढतच जात असतो म्हणून तो वाढदिवस - पृथ्वीवरील माझ्या मुक्कामाचा !
हा मुक्काम स्थायी नसतो. सरतोच एक ना एक दिवस! मजेची गोष्ट हीच की, मी येतो तो दिवस अन् जातो तो दिवस माझा मलाच अंकित करता नाही येत. काय गंमत बघा, माझा श्रीगणेशा अन् माझी इतिश्री मलाच नाही पाहता येत. आपण मोजतो केवळ मधलेच वाढदिवसरूपी मैलाचे दगड!
मला हाही प्रश्न पडतो; याला वाढदिवस म्हणावे की घटदिवस? खरं तर तो घटदिवसच असतो. तो आठवण करून देतो, झाले तुझे एक वर्ष सरले, इथल्या मुक्कामाचा आणखी एक टप्पा सरला. ज्या देहाचा तू एवढा मोह करतोस; वाढदिवस करतोस तोच सोडण्याची घटिका जवळजवळ येतेय। आता तरी अंतर्मुख हो! विचार कर ! अरे वेड्या,
वाढदिवस जसा तुझा असतो,
तसाच माझाही असतो।
तिचा, त्याचा, हिचा, याचा
एक दिवस साºयांचाच असतो ।
खरे तर वाढ कसला
घटदिवस तो;
एक दिवस घटवून
येतो तसा जातो ।
आपण मात्र त्याला
मैलाचा दगड मानतो
पंचविशी, गद्धे पंचविशी,
तिशी अन् पन्नाशी मिरवित मिरवित फिरतो ।
ज्यांना येत नाही गणित
त्यांचे बरे असते
आयुष्याची बेरीज
अठरावरच अडते.
असो; जरी देह सोडण्याची वेळ जवळ येत चाललेली असली तरी अडचण ही असते की, त्याचा नक्की दिनांक कोणालाच ठाऊक नसतो. त्यामुळे किती घटलेत ते तर कळते पण किती मधून घटलेत ते सांगता येत नाही, ढोबळ अंदाज बांधता येतो शंभरातून सरल्याचा, पण तोही अंदाजच. निश्चित काही नाही, म्हणून तर आपल्या आयुष्यातून दरवर्षी घटणाºया वर्षाला आपण घटदिवस नाही तर वाढदिवस म्हणत असतो.
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)

Web Title: Birthdays of birthdays, occasional dates, birthday celebrations, etc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.