‘बेवॉच’ आणि स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:46 AM2018-08-31T06:46:30+5:302018-08-31T06:48:28+5:30

तिरकस

'Beloved' and dream breaks | ‘बेवॉच’ आणि स्वप्नभंग

‘बेवॉच’ आणि स्वप्नभंग

Next

मंग्या बेंबाळे हा अल्पशिक्षित, बेरोजगार तरुण. घरातून ओवाळून टाकलेला. मात्र, गणेशोत्सव जवळ आला की, सोसायटीतील सर्वांना मंग्याची आठवण यायची. मंडळाच्या अध्यक्षांचा तर मंग्या गळ्यातील ताईत होऊन जायचा. मंग्या डेकोरेशन करायचंय, मंग्या म्युनिसिपालिटीत पत्र द्यायचंय, मंग्या लायटिंग करणारा दुपारी येईल, मंग्या मिरवणुकीच्या ट्रकचे सांग... अशी एक ना अनेक कामे करण्याकरिता मंग्या तत्पर असायचा. हडकुळा, धुण्याच्या काठीसारखा उंचचउंच, पोक काढून चालणारा, पुढचे दोन दात ओठावर पाय खाली सोडून बसल्यासारखे, सिगारेटची पुटं चढून काळे झालेले, ढगळ पॅण्ट दीर्घकाळ न धुतल्यानं कुबट वास सोडणारी, कॉलरला फाटलेला शर्ट काठीवर चढवल्यासारखा. मंग्या गणेशोत्सव काळात मंडपात झोपायचा. प्रसादाचे तोबरे भरून पोट भरायचा. दिवसातून दोनवेळा अध्यक्ष त्याच्याकरिता जेवण मागवायचे, तेव्हा अधाशासारखा तुटून पडायचा. जेवताना कुणी हाक मारली, तरी मंग्या कानाडोळा करायचा. मागंपुढं झुलत वाघ पाठी लागल्यासारखे अन्नाचे घास पोटात ढकलायचा.

मंग्या राहायचा त्याच चाळीत राधिका राहायची. नाकीडोळी नीटस, साधी चारचौघींसारखी पोरगी. एकदा कुणीतरी मंग्याला हॅण्डल दिले की, राधिकाला तू आवडतोस. बस्स. मंग्या तिच्या मागं लागला. तिच्या कॉलेजबाहेर उभा राहू लागला. तिचा पाठलाग करू लागला. राधिकाचा मोबाईल नंबर मिळवून मंग्यानं तिला व्हॉट्सअ‍ॅपवर प्रेमसंदेश पाठवला. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमुळे राधिकानं मंग्याचं प्रोफाईल पाहिलं आणि तिचा पाराच चढला. तिनं ही बाब तिच्या वडिलांना सांगितली. लागलीच त्यांनी मंग्याला मानगुटीला धरून खेचत चाळीतील अंधाऱ्या जिन्यात नेलं आणि सणकन् कानशिलाखाली लगावली. भेलकांडलेला मंग्या खाली कोसळला. कुणीतरी भिंतीवर शिंकरलेला शेंबूड त्याच्या हाताला लागला. तेवढ्यात, राधिकाच्या बापानं त्याच्या पेकाटात लाथ घातली आणि तो कळवळला. गणपतीच्या मंडपात पडलेला पेपर वाचताना मंग्यानं बातमी वाचली की, बेवॉच मालिकेतील आपत्कालीन व्यवस्था यंदा विसर्जनाला करा. त्याकरिता ती मालिका पाहा, असे आदेश कोर्टाने दिले होते. मंग्यानं ही मालिका पाहिली होती. त्या मालिकेतील बिकिनीतील त्या गोºया पोरी आठवूनही मंग्याची कानशिलं तापली. कोर्टानं त्यांच्या एरियातील नगरसेवकाचं पद रद्द केल्यावर त्याची पालेभाजीच्या जुडीसारखी झालेली अवस्था मंग्यानं पाहिली होती. कोर्टाचा शब्द शेवटचा, हे त्यानं अनेकांच्या तोंडातून ऐकलं होतं. मंग्या विसर्जनाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. कंबर मोडून नाचत मंग्या चौपाटीवर पोहोचला. त्यानं चौफेर पाहिलं, पण त्याला बेवॉचमधील बिकिनी परिधान केलेल्या जीवरक्षिका काही दिसल्या नाहीत. कदाचित, बुडू लागल्यावर त्या प्रकट होत असतील, अशी त्यानं मनाची समजूत करून घेतली. गणेशमूर्ती घेऊन मंग्या छातीभर पाण्यात गेला.
अचानक मंग्याच्या पायाला जेली फिशने दंश केला. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला शुद्ध आली, तेव्हा राधिकाचा ड्युटीवरील बाप मंग्याच्या पोटातील पाणी काढताना लाखोली वाहत होता...
- संदीप प्रधान
 

Web Title: 'Beloved' and dream breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई