आदर्श शिक्षक नाहीत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:34 AM2018-07-27T06:34:34+5:302018-07-27T06:35:22+5:30

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केली आहे

Are not the ideal teachers? | आदर्श शिक्षक नाहीत का?

आदर्श शिक्षक नाहीत का?

Next

समाजातील सर्वच क्षेत्रातील आदर्श माणसांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. समाजात आज तसे आदर्श नाहीत, मग कुणाच्या पायावर डोके टेकवावे, असा प्रश्न सतत भेडसावत असतो. त्यामुळे आदर्श माणसे शोधायची कुठे, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. समाजाला अस्वस्थ करीत असलेला हा प्रश्न आता सरकारलाही भेडसावू लागला आहे. त्यामुळेच की काय, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केली आहे. पूर्वी पावणेचारशे शिक्षक या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जायचे. आता ही संख्या दीडशे पेक्षाही कमी होणार आहे. पूर्वी महाराष्ट्रातून २९ राष्ट्रीय शिक्षक निवडले जायचे. आता फक्त सहा शिक्षकांनाच हा पुरस्कार दिला जाईल. मानव संसाधन विकास खाते महाराष्ट्राच्याच प्रकाश जावडेकर यांच्याकडे असताना ‘महाराष्ट्रा’च्या वाट्याला इतके कमी सन्मान यावेत, याबाबत शिक्षक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. खरे तर आदर्श शिक्षकांची संख्या सरकारने वाढवायला हवी. कारण नवी पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात. कुठल्याही क्षेत्राच्या तुलनेत हे कार्य अधिक पवित्र आहे. परंतु शिक्षकांच्या बाबतीत राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन नेहमी उदासीन राहिलेला आहे. अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त त्याच्याकडे इतरही अवाजवी कामे सोपविली जातात आणि त्या कामांना राष्ट्रीय कार्याचा मुलामा दिल्याने ते करण्यावाचून त्यांना गत्यंतरही नसते. शिक्षण हे सेवेचे क्षेत्र आहे. परंतु शिक्षण सम्राटांनी व सरकारने त्याला उद्योगधंद्याचे स्वरूप दिल्याने या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाºया शिक्षकांकडेही पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित झाला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत घट केल्याने प्रामाणिकपणे काम करणाºया शिक्षकांचे कार्य थांबणार नाही. जे खरे शिक्षक आहेत, त्यांना अशा पुरस्काराची अपेक्षाही नसते. पण इथे प्रश्न आहे केंद्र सरकारचा. यातून त्यांचा या पवित्र क्षेत्राबद्दल असलेला नकारात्मक दृष्टिकोन समाजासमोर आला आहे. राज्यात जवळपास तीन लाख शिक्षक संख्या आहे. यापैकी हजारो शिक्षक प्रयोगशिल आहेत. समाजनिष्ठ कार्यातून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. पण, चांगले कार्य करूनही अनेकांच्या वाट्याला हे सन्मान आले नाहीत. त्यांना तसे पाठबळही मिळालेले नाही. राज्य सरकारच्या वतीनेही शिक्षकदिनी राज्य शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव केला जातो. पण ही संख्याही मागील अनेक वर्षांपासून वाढलेली नाही. खरे तर शिक्षकांच्या सहवासातून, संवादातून, आचरणातून आणि चारित्र्यातूनच मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडत असतो. देश घडविणाºया या शिक्षकांबद्दल आजही समाजामध्ये कायम आदराचे स्थान आहे. हा मान सरकारने घटवून शिक्षकांच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची भावना उमटते आहे. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांच्या आदर्श कार्याचे स्मरण सरकारला यानिमित्ताने तरी व्हावे, हीच अपेक्षा.

Web Title: Are not the ideal teachers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.