‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ - लढवय्या मावळ्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 08:55 AM2024-01-29T08:55:45+5:302024-01-29T08:56:25+5:30

'Angria - The Historical Odyssey' : ‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ या सोहेल रेखी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ‘जयपूर लिट-फेस्ट’मध्ये होत आहे. त्यानिमित्ताने रेखी यांच्याशी साधलेला संवाद...

'Angria - The Historical Odyssey' - The story of the warrior Mawla | ‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ - लढवय्या मावळ्याची कहाणी

‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ - लढवय्या मावळ्याची कहाणी

- सोहेल रेखी

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार दलप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर ‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. एका लढवय्या मावळ्याच्या खाणाखुणा मिटविण्याचे काम इंग्रजांनी केल्याने कान्होजी आंग्रेंसारखे व्यक्तिमत्त्व जगापर्यंत पोहोचू शकले नाही. कान्होजी आंग्रे हे ‘कोकणचा राजा’ आणि ‘समुद्रातला शिवाजी’ म्हणूनही ओळखले जात. हिंदवी स्वराज्याच्या काळात त्यांनी आरमारात खूप मोठी क्रांती घडवली होती. संपूर्ण कोकण किनाऱ्यावर त्यांचे राज्य होते. शेखूजी आणि संभाजी आंग्रे ही त्यांची दोन मुले. संरक्षणापासून करवसुलीपर्यंत सर्व जबाबदारी यांच्यावर होती. इंग्रजांनी तुळाजी आंग्रेंविरुद्ध विजयदुर्गवर आक्रमण केल्यानंतर कान्होजींचे साम्राज्य अस्ताला गेले.

भूतानमध्ये वास्तव्याला असलेले सोहेल रेखी हे ख्यातनाम अभिनेत्री वहिदा रहमान यांचे सुपुत्र. त्यांना बालपणापासून भारतीय इतिहासाबाबत रूची होती. ही रूची पुढे छंदात आणि नंतर अभ्यास-व्यासंगात परावर्तित होत गेली. ‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ हे त्यांचे ताजे पुस्तक. त्याबाबत सोहेल यांच्याशी झालेल्या संवादातील काही अंश...

- या पुस्तकाची संकल्पना कशी सुचली? 
 लहान मुलांच्या पुस्तकासाठी समुद्री चाच्यांवर संशोधन करताना कान्होजी आंग्रेंचे नाव माझ्यासमोर आले. ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’मध्येही भारतीय पायरेट्सचे नाव संभाजी आहे, जे कान्होजींचे पुत्र होते. पाश्चिमात्त्य माध्यमांनुसार अंदाजे ३०० वर्षांपासून कान्होजी हे पायरेट्स होते; पण वास्तवात ते कोकणचे सुभेदार होते, हिंदवी साम्राज्याचे आरमार प्रमुख होते. कान्होजींच्या मृत्यूपश्चात इंग्रजांनी त्यांचे नावच नव्हे, तर त्यांच्या खाणाखुणाही मिटवल्या. १९५१ मध्ये वेस्टर्न नेव्हल कमांडला ‘आयएनएस आंग्रे’ नाव देण्यात आले. त्याखेरीज एक लाइटहाऊस आणि आंग्रिया बँक वगळता आंग्रेंचे नाव आज कुठेही नाही. अशा आंग्रेंचा इतिहास संपूर्ण जगभर पोहोचावा, या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.- -

- या पुस्तकासाठी संदर्भ शोधणे हे किती अवघड होते?
कान्होजींशी निगडीत संदर्भ शोधण्यासाठी, संशोधन करण्यासाठी  पाच वर्षे लागली. जास्तीत जास्त संदर्भ मी त्या काळातील उपलब्ध पत्रांवरून घेतले आहेत. कान्होजींनी पोर्तुगीजांना लिहिलेली पत्रे ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयात आजही उपलब्ध आहेत. कान्होजी आंग्रे यांचे वंशज असलेल्या रघूजी आंग्रे यांची मी अलिबागमध्ये  भेट घेतली. त्यांचे मला खूप सहकार्य मिळाले. 
बखरीतील कान्होजींच्या उल्लेखासोबत हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यातून जे संदर्भ मिळाले ते या पुस्तकात आहेत. तरीही कान्होजींबाबतची उपलब्ध माहिती खूपच कमी आहे. शाळेतही अत्यंत त्रोटक माहिती दिली जात असली, तरी महाराष्ट्रात कमीत कमी त्यांचे नाव तरी माहीत आहे; पण महाराष्ट्राबाहेर त्यांना फार कोणी ओळखतही नाही.

- ‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय सांगाल?
 वाचकांची रूची वाढावी यासाठी यात ‘हिस्टाॅरिकल फिक्शन’चा प्रयोग केला आहे. शिवकालीन इतिहासातील या हिरोचे व्यक्तिमत्त्व सर्वदूर पोहोचावे, ही भावना या लेखनामागे आहे. एक उत्तम चित्रपट बनवता येऊ शकेल, असे त्यांच्या जीवनात सारे काही असल्याने भविष्यात कोणी चित्रपटासाठी विचार केला तर अर्थातच माझे सहकार्य असेल. आपल्या देशात संस्कृतीचा इतका मोठा खजिना आहे की, एका राज्याचा इतिहास मांडण्यासाठी एक अख्खे जीवन अपुरे पडेल. देशाचा इतिहास समुद्रासारखा अथांग आहे. इतिहासाची पाने पलटल्यास कान्होजींसारखी असंख्य प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे समोर येतात, जी पुढील पिढीला प्रेरणा देत राहतात. 
(मुलाखत : प्रतिनिधी)

Web Title: 'Angria - The Historical Odyssey' - The story of the warrior Mawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास