Afghan Jalebi .....! | अफगान जलेबी.....!
अफगान जलेबी.....!

- दिलीप तिखिले

शेवटी ठरले तर...करून टाका ‘जिलेबी’वर शिक्कामोर्तब. काँग्रेसने बोलाविलेल्या मित्रपक्षांच्या बैठकीत तब्बल सहा-सात तासांच्या घनघोर चर्चेनंतर भाजपाच्या ‘पकोड्या’ला जिलेबीने उत्तर द्यायचे सर्वानुमते ठरले.
चहा, पकोडा, ढोकळा हे कसे मोदीसाहेबांचे आवडते विषय आहेत. ‘हां मै चायवाला हूं’ असे ते नेहमीच अभिमानाने सांगत असतात. येणाºया विदेशी पाहुण्यांना ते आवर्जून गुजरातचा ढोकळाही खाऊ घालतात. परवा त्यांचे पकोडाप्रेमही असेच उतू आले आणि त्यांनी या चमचमीत पदार्थाला चक्क रोजगार श्रेणीत टाकले. बरं टाकले तर टाकू द्या, काँग्रेसने का बरं विरोध करावा. त्याने टीका केली. मग इतर विरोधी पक्षांनाही चेव आला. त्यांनीही हात धुवून घेतले. हा विरोध पाहून मग मोदींनी ठरवून टाकले...२०१९ ची निवडणूक पकोड्याच्या मुद्यावरच लढू.
आता भाजपाने ‘पकोडा’ हायजॅक केल्यावर काँग्रेसलाही ‘जशाच तसे’ उत्तर देणे भागच होते. मग तातडीची बैठक बोलावली. राष्टÑवादी, राजद, तृणमूल आणि इतर मित्रपक्षांचे प्रतिनिधी हजर झाले. पकोड्याविरुद्ध कोणता पदार्थ निवडणूक आखाड्यात उतरवावा यावर खल सुरू झाला. शिववडा, झुणका भाकर, कांदा पोहे हे याआधी रजिस्टर्ड होऊन गेलेले सोडून इतर पदार्थ सुचवावे असे ठरले. प्रत्येकजण आपापली डिश पेश करू लागले. साऊथवाल्यांनी डोसा व इडलीचा आग्रह धरला पण इतरांनी तोंड आंबट करून या आंबवलेल्या पदार्थांना थारा दिला नाही. प्रफुल्ल भार्इंनी ढोकळ्याचे नाव पुढे केले तेव्हा मात्र भाजपातून अलीकडेच काँग्रेसमध्ये आलेले नानाभाऊ संतापून उभे राहिले. ढोकळा हा शुद्ध भाजपाई पदार्थ आहे. शिवाय मोदींच्या गृहराज्यातला आहे. राष्टÑवादी ढोकळ्याच्या आडून जर आपला अंतस्थ हेतू साध्य करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असे बरेच काही नाना बोलले. वातावरण थोडे गरम झाले. पण तेवढ्यात कुणीतरी मॅगी व बर्गरचे नाव पुढे केले. आता संतापण्याची पाळी राष्टÑवादीची होती. भाई म्हणाले, हे दोन्ही पदार्थ शुद्ध विदेशी आहेत आणि ‘विदेशी मूल’बाबत आमच्या साहेबांची भूमिका तुम्हा सर्वांनाच ठाऊक आहे. तेव्हा बर्गर वा मॅगी आम्हाला चालणार नाही. त्यांचे हे भाष्य गर्भित इशारा समजून दोन्ही पदार्थ सूचीतून हद्दपार करण्यात आले.
शेवटी खमंग पकोड्याची तोड गरमागरम जिलेबीच होऊ शकते असा सूर बहुतेकांनी लावल्यावर जिलेबीचा प्रस्ताव पुढे आला. जिलेबीही मूळ भारतीय नाही पण मध्यपूर्व देशांतून पाच-साडेपाचशे वर्षांपूर्वीच ती भारतात आल्यामुळे राष्टÑवादीनेही फारसे ताणून न घेता सहमती दर्शविली.
निर्णय झाल्यानंतर जिलेबीला निवडणूक काळात प्रमोट करण्यासाठी काही सूचना आल्या त्या अशा...
१) जिलेबी हा राष्टÑीय पदार्थ घोषित व्हावा
म्हणून देशव्यापी आंदोलन करण्यात यावे.
२) निवडणूक काळात ‘फॅण्टम’मधील
‘अफगान जलेबी...माशूक फरेबी’ या
गाण्यावरील कॅटरिना कैफच्या डान्सचे
राईट्स संपुआने आपल्याकडे घ्यावे.
३) सेफ संजीव कपूरला करारबद्ध करून
टीव्हीवरील रेसिपी कार्यक्रमात केवळ
संपुआचीच जिलेबी प्रमोट करावी.
सूचना पारित झाल्यावर बैठक संपली. अर्थात ‘फॉलोड बाय’ गरमागरम जिलेबी होतीच.


Web Title: Afghan Jalebi .....!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.