अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:59 AM2023-09-30T05:59:36+5:302023-09-30T06:00:36+5:30

भूकंपरोधक इमारती बांधता येतात; पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र लोकांचे जीव वाचू शकतात.

30 years ago; A devastating earthquake in Killary's memory ol latur | अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

अन्वयार्थ: ३० वर्षांपूर्वीचा; किल्लारीचा आठवणीतला विनाशकारी भूकंप!

googlenewsNext

३० सप्टेंबर, १९९३चा दिवस आठवतो. गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. सकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक हादरे जाणवत होते, काय अघटीत घडले ते कळत नव्हते, लोक भयभीत झाले होते. मी त्या वेळेस भगवती कॉलनी, औरंगाबाद (आजचे छ. संभाजीनगर) येथे राहत होतो. नंतर कळले की हा भूकंप आहे. महाराष्ट्राने असा मोठा भूकंप पहिल्यांदाच अनुभवला असावा. हा भूकंप ६.३ रिक्टरचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू ७० कि.मी. सोलापूरच्या ईशान्येला होता. सुमारे ९७०० लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले व तीस हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. 

भूकंपाबद्दल सांगायचे झाले तर भारताचा प्रभाग हा चार भूकंपप्रवण विभागात विभागला गेला आहे. झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५ अशा भूकंपप्रवण क्षेत्रात आपला देश विभागला आहे . झोन २ हा कमी तीव्रतेचा, तर झोन ५ हा सर्वांत जास्त तीव्रतेचा प्रभाग असतो. भूकंपप्रवण क्षेत्र ५ मध्ये भूकंप आल्यास तिथे जास्त हानी पोहोचते. साधारणतः भूकंपाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डीप फोकस अर्थक्वेक आणि दुसरा शॅलो फोकस अर्थक्वेक. डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे जमिनीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही ३० किलोमीटरपेक्षा जास्त खोलवरून येते व जमिनीला जबरदस्त हादरे बसतात, तर शॅलो फोकस अर्थक्वेक यामध्ये जमिनीतून येणारी ऊर्जा ३० किलोमीटर पेक्षा कमी खोलवरून येते. जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेमुळे अतिवेगवान लहरी निर्माण होतात व जमिनीची जोरदार हालचाल होते. भूकंपाचे भाकीत करता येत नाही. जर्मन शास्त्रज्ञ वेगेनर यांनी भूकंपाबद्दल निश्चित सांगता यावे म्हणून सुमारे ३० वर्षे सतत भूकंपाचा अभ्यास केला व त्यानीही सांगितले की भूकंप अनिश्चित असतो. म्हणूनच भूकंपप्रवण क्षेत्रात इमारतीची संरचना संकल्प चित्र तयार करताना भूकंपशास्त्राचा अभ्यास अत्यावश्यक 
आहे. भूकंपरोधक इमारती बांधता येतात, पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही, कारण भूकंपाबद्दल किती मॅग्निट्यूडचा भूकंप येईल हे भाकीत करता येत नाही. परंतु, ‘अर्ली वॉर्निंग सिस्टम’मुळे वेळीच लोकांना सूचित केले जाते. त्यामुळे लोकांचा जीव वाचू शकतो. ३ ते ५ रिश्टरचा भूकंप असेल तर फारशी हानी होत नाही व घरेही पडत नाहीत. ५ ते ६ रिश्टरचा भूकंप असेल तर लोड बेअरिंग घरे पडायला लागतात. ६ ते ८ रिश्टरचा भूकंप असेल तर आरसीसी/काँक्रीटची घरे पडायला लागतात. ८ ते ९ रिश्टर भूकंप जास्त विनाशकारी असतो.
भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपाची मानके गृहीत धरूनच इमारतीची संरचना, संकल्पचित्रे केली पाहिजेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमारतीचे सर्व ओझे हे कॉलमवर येत असल्यामुळे ते त्या-त्या प्रमाणात व आवश्यकतेनुसार जाड असावेत. कॉलम हे इमारतीचे पाय असतात, ते मजबूत हवेत हाच भूकंप रोधक संरचना संकल्प चित्राचा मुख्य गाभा असतो. 

किल्लारीच्या भूकंपात मुख्यत्वे दगडांनी, विटांनी बांधलेली घरेच पडली, तुटली पण आरसीसीचे एकही घर या भूकंपात पडले नाही. विशेष म्हणजे खुद्द किल्लारीत असलेले नीळकंठेश्वराचे व दगडांनी बांधलेल्या इतर दोन-तीन मंदिरांना काहीही झाले नाही. कारण त्यामध्ये त्यावेळचे मिस्त्री यांनी भूकंप रोधक मंदिर बांधल्याचे दिसते. कारण त्यामध्ये बॉंड स्टोन, थ्रू स्टोन, कॉर्नर स्टोन, ओव्हर लॅप हे व्यवस्थित असल्याचे आताही दिसून येते. किल्लारीच्या भूकंपाच्या घटनेला आज ३० सप्टेंबर, २०२३ला बरोबर ३० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा भूकंप अनुभवला तो कोणताही माणूस या भूकंपाची आठवण कदापि विसरू शकणार नाही.

- प्रा. डॉ. राजाराम दमगीर, 
भूकंपशास्त्राचे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर 

Web Title: 30 years ago; A devastating earthquake in Killary's memory ol latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.