कर्नाटकातील ऊसतोड मुकादमाने महिलेला ठेवले ओलीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:57 PM2018-10-31T16:57:37+5:302018-10-31T16:59:11+5:30

कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले. 

women kidnap from Amrawati | कर्नाटकातील ऊसतोड मुकादमाने महिलेला ठेवले ओलीस

कर्नाटकातील ऊसतोड मुकादमाने महिलेला ठेवले ओलीस

googlenewsNext

अमरावती - कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले.  दरम्यान धारणी पोलिसांनी कारवाई करीत तिची सुटका केली. 

पोलीस सूत्रांनुसार, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ साखर कारखान्याचा मजूर कंत्राटदार लकप्पा बिरादार याने धारणी तालुक्यातील राणीगाव येथील खानावळ चालविणारी महिला मुद्रिकाबाई गंगाराम तिडके (५८) हिच्या माध्यमातून ऊसतोडणीसाठी कामगारांचा शोध घेतला. करार करून त्यांना सहा लाख रुपये दिले. कामगारांनी मात्र जाण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या लकप्पाने साथीदारांसह २५ आॅक्टोबर रोजी थेट राणीगाव गाठले. मुद्रिकाबाईची मुलगी त्रिवेणी वैजनाथ नागरगोजे (३५) हिला चारचाकीत टाकून थेट कर्नाटकातील जंगलात घेऊन गेले. तेथ एका घरात डांबून ठेवण्यात आले. मुद्रिकाबाईने २८ आॅक्टोबर रोजी धारणी पोलिसांत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी तात्काळ बागलकोट जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व्ही.व्ही. ऋषांत यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याप्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

धारणीचे पोलीस उपनिरीक्षक राजू चव्हाण, नायक पोलीस कॉन्स्टेबल शंकर तायडे, शिपाई आशिष भावे, वैभव जायले यांचे पथक २८ रोजी रात्रीच कर्नाटकासाठी रवाना करण्यात आले. ९०० किमी अखंड प्रवास त्यांनी दोन रात्री व एका दिवसात पूर्ण करून मंगळवारी पहाटे तेथे दाखल झाले. 

दरम्यान, मोबाइल लोकेशनच्या आधारे अपहृत महिलेला बुधनी गावाच्या परिसरात कोंडून ठेवल्याचे समजले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधनी येथील व्यंकप्पा यांच्या शेतातील घरावर छापा घालण्यात आला. यादरम्यान तेथे उपस्थित इसमाने पलायन केले. त्रिवेणी नागरगोजे हिला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्रिवेणीला घेऊन धारणी पोलीस बुधवारी रात्रीच्या सुमारास धारणी ठाण्यात पोहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: women kidnap from Amrawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.