गॅंगरेपची तक्रार करण्यास गेलेल्या पीडितेने पोलिसावर केला बलात्काराचा आरोप
By पूनम अपराज | Published: December 25, 2020 09:24 PM2020-12-25T21:24:18+5:302020-12-25T21:25:33+5:30
Gangrape : जलालाबादची रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेकडून पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या पीडितेने पोलिसावरचबलात्काराचा आरोप केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परंतु, या घटनेला महिना उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. जलालाबादची रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेकडून पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करण्यात आला.
पीडित महिलेच्या आरोपात काही तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासोबतच दोषी पोलिसावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी ब्रह्मपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर रोजी मदनपूरकडे निघालेली असताना तिची रिक्षा अचानक रस्त्यात बंद पडली. त्यामुळे ती पायीपीट मदनपूरकडे निघाली होती. पाठीमागून कारमधून आलेल्या चार जणांनी शेतात नेऊन तिच्यावर गँगरेप केला, अशी या पीडितेची तक्रार होती.
त्यानंतर गॅंगरेपची तक्रार नोंदवण्यासाठी ती जलालाबाद पोलीस ठाण्यात गेली असता तिथे उपस्थित असणाऱ्या विनोद कुमार या पोलिसाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा दावा पीडितेने केला आहे. यानंतर त्या पीडितेने बरेलीचे एडीजी अविनाश चंद्र यांची भेट घेतली आणि आपली तक्रार त्यांच्यासमोर मांडली. वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.