माजी गृहमंत्र्याचा बंगला फोडणारा चोरटा अटकेत; घरफोडीचे ठोकले आहे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 07:35 PM2020-01-28T19:35:22+5:302020-01-28T19:38:45+5:30

आरोपी सय्यद सिकंदरने १० वर्षांपूर्वी फोडला होता माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांचा बंगला

robber arrested who robbed Former home minister's bungalow; Home burglary has hit half a century | माजी गृहमंत्र्याचा बंगला फोडणारा चोरटा अटकेत; घरफोडीचे ठोकले आहे अर्धशतक

माजी गृहमंत्र्याचा बंगला फोडणारा चोरटा अटकेत; घरफोडीचे ठोकले आहे अर्धशतक

googlenewsNext
ठळक मुद्दे४०० ग्रॅम सोने जप्त १३ लाखांची रोकड गोठविली 

औरंगाबाद : सिडको एन-४ मधील निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. नामदेव कलवले यांचा बंगला फोडून सुवर्णालंकार आणि रोकड पळविल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी दोन चोरट्यांसह सोने खरेदी करणाऱ्या दुकानदाराला अटक केली. या आरोपींकडून ४०० ग्रॅम सोन्याची लगड आणि कार जप्त केली असून, आरोपीने पत्नीच्या नावे बँकेत ठेवलेली १३ लाखांची रोकड गोठविल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही चोरी करणाऱ्या सय्यद सिकंदरला १० वर्षांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्यातून सोन्याचे दागिने पळविल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती.

पोलीस आयुक्त म्हणाले की, डॉ. कलवले कुटुंबासह मुंबईला गेले असता त्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. ७७ तोळ्याचे दागिने आणि पावणेपाच लाख रुपये रोख चोरीला गेल्याचा गुन्हा पुंडलिकनगर ठाण्यात ३० डिसेंबर रोजी दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवी जाधव, नितेश जाधव, निखिल खराडकर, प्रवीण मुळे, नंदा गरड यांच्या पथकाने तपास करून खिडकी गँगचा म्होरक्या संशयित आरोपी सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३६, रा. बीड, ह.मु. चेतना कॉलनी, अहमदनगर) याला अटक केली.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शंकर जाधव याच्या मदतीने बंगल्याची रेकी करून चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शंकर जाधवला अटक केली. जालना येथील सोन्या-चांदीचा दुकानदार अनिल शालीग्राम शेळके याला चोरीचे दागिने विक्री केल्याचे चौकशीत त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपी अनिलकडे चौकशी केली असता त्याने दागिने खरेदी केल्याची कबुली देत  ते दागिने वितळविल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ४०० ग्रॅमची सोन्याची लगड जप्त केली, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी टॉमी, मोबाईलही जप्त केला.

आरोपी सिकंदरने गुन्ह्याचे ठोकले अर्धशतक
आरोपी सिकंदर साथीदारांच्या मदतीने आंतरजिल्हा खिडकी गँग चालवितो. उच्चभ्रू वसाहतीमधील बंगल्यांच्या खिडक्या काढून चोऱ्या करण्याची या टोळीची पद्धत आहे. या टोळीने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून १० वर्षांपूर्वी चोरी केली होती. अहमदनगर, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड आदी ठिकाणी त्याच्याविरोधात ५० हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. खाडे यांनी दिली. आरोपी सिकंदर वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या महिलांसोबत राहतो. त्याची एक पत्नी औरंगाबादेतील पिसादेवी परिसरात राहते. शिवाय त्याने बीड आणि अहमदनगर येथे एका महिलेसोबत घरोबा केल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमदनगर येथील एका मैत्रिणीच्या माध्यमातून पोलिसांनी सिकंदरला पकडले. तर पत्नीला अटक करतो, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्याने तोंड उघडले.

सिकंदरच्या मैत्रिणीचे खाते सील
आरोपी सिकंदरने मैत्रीण रेश्माच्या बँक खात्यात १५ लाख ३९ हजार रुपये १ आणि २ जानेवारी रोजी जालना येथील खाजगी मनी ट्रान्स्फर एजन्सीमधून जमा केले होते. यापैकी पावणेचार लाख रुपये काही दिवसांत खात्यातून काढले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी बँकेला पत्र देऊन बँक खात्यातील रक्कम गोठविली.

Web Title: robber arrested who robbed Former home minister's bungalow; Home burglary has hit half a century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.