मराठवाड्याच्या संतभूमीला एक‘नाथ’ पावणार का? विकासाचा कालबद्ध कार्यक्रम ठरला ‘कालबाह्य’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:23 PM2022-07-30T12:23:52+5:302022-07-30T12:25:14+5:30
मराठवाड्याच्या विकासाचा ५० हजार कोटींच्या तरतुदींचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरला आहे.
- नंदकिशोर पाटील
औरंगाबाद : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असून नावातच ‘नाथ’ असलेल्या या एकनाथांकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसह अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
राज्यातील सत्तांतरात मराठवाड्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसह नऊ आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमपत्रिकेवर नजर टाकली तर बंडखोर आमदारांना पाठबळ देण्यासाठीच या दौऱ्याची आखणी करण्यात आल्याचे दिसून येते; परंतु, मुख्यमंत्र्यांनी या भागातील विकासविषयक प्रश्न मार्गी लावावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कालबद्ध कार्यक्रम ठरला ‘कालबाह्य’
संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला. मात्र नागपूर करारातील अटींची पूर्तता राज्य सरकारने न केल्यामुळे या प्रदेशाचे मागासलेपण दूर झालेले नाही. मराठवाड्यात दरवर्षी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणे अपेक्षित असताना गेल्या पाच वर्षांत या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही. मागील १३ वर्षांत फक्त दोन बैठका झाल्या. ४ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलेला मराठवाड्याच्या विकासाचा ५० हजार कोटींच्या तरतुदींचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरला आहे.
तरतूद मोठी, गंगाजळी छोटी-
मराठवाड्यातील अनेक सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. ३८ छोट्या-छोट्या प्रकल्पांसाठी १०४८ कोटी देण्याची घोषणा झाली होती पैकी छदामही मिळाला नाही. लोअर दुधना प्रकल्प निधीसाठी ३८ वर्षे रखडला. ३६ हजार ५०० विंधन विहिरींपैकी फक्त सध्या ७ हजार विहिरींची कामे झाली. कृष्णा खोऱ्यात सध्या जे पाणी उपलब्ध आहे, ते मराठवाड्याला मिळण्यासाठी ४ हजार ८०० कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. परंतु अजूनही २१ टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने मराठवाड्याला मिळत नाही.
बीड-परळी रेल्वेमार्गाची कासवगती -
नगर-परळी व वर्धा-नांदेड या दोन रेल्वेमार्गांसाठी ५ हजार ३२६ कोटींची तरतुदीची घोषणा केली. त्यातील नगर-बीड- परळी हा मार्ग मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल असे जाहीर केले होते. अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.
विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार
-औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे हे विमानतळ आंतरराष्ट्रीय होईल व येथे कुठलेही विमान उतरू शकेल. त्याचप्रमाणे नांदेड विमानतळासाठी अर्थसाहाय्य करण्याची घोषणा हवेत विरली आहे.
या प्रकल्पांकडे लक्ष द्या
-डीएमआयसीत भांडवली गुंतवणुकीचे उद्योग
- जालना येथील फूड पार्कला कधी मुहूर्त लागणार?
- परभणी, बीड, नांदेड येथे टेक्स्टाईल पार्क
-जालना येथे सीड पार्क स्थापन करणे
- शेळीगट व संकरित गायी पायलट प्रोजेक्ट
-मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ठप्प
-जलसंधारण आयुक्तालय नावालाच