पाणी प्रश्नाचा ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:43 AM2018-04-17T01:43:43+5:302018-04-17T01:44:37+5:30

शहरातील पाणी प्रश्नाने सोमवारी सर्वसाधारण सभेत पेट घेतला. तब्बल पाच तास वादळी चर्चा नगरसेवकांकडून करण्यात आली

Water Question becomes hot in general meeting | पाणी प्रश्नाचा ‘कचरा’

पाणी प्रश्नाचा ‘कचरा’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नाने सोमवारी सर्वसाधारण सभेत पेट घेतला. तब्बल पाच तास वादळी चर्चा नगरसेवकांकडून करण्यात आली. दूषित पाणी, वेळेवर पाणीपुरवठा नाही, अल्प दाबाने पाणीपुरवठा, मध्यरात्री होणारी पाण्याची पळवापळवी आदी अनेक मुद्यांचा ऊहापोह झाला. समांतर जलवाहिनीसाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याचा आरोपही अधिकाऱ्यांवर करण्यात आला. शेवटी महापौर नंदकुमार घोडेले यांनी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला. तीन दिवसांमध्ये सुधारणा न झाल्यास दोषी अधिका-यांवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. ढीम्म प्रशासनामुळे कचराकोंडीप्रमाणे आणखी दोन महिने पाण्याचा प्रश्नही तापत राहणार हे निश्चित.
सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू होताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर हल्लाबोल केला. यामध्ये सिडको-हडको, चिकलठाणा आदी भागांतील नगरसेवक सर्वाधिक आघाडीवर होते. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांनी त्यांनाही जुमानले नाही. गोंधळ वाढत गेल्याने दुपारी १२.३० वाजता सभा तहकूब करावी लागली. दुपारी १.५० वाजता परत सभेला सुरुवात झाली. पुन्हा नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाची जोरदार कोंडी केली. शोभा बुरांडे, जयश्री कुलकर्णी, सीमा खरात, मनीषा मुंढे, ज्योती पिंजरकर, माधुरी अदवंत, संगीता वाघुले यांनी दूषित पाणी, अल्पवेळ पाणीपुरवठा आदी मुद्दे मांडले. सुरेखा सानप, मीना गायके, गजानन मनगटे, सीताराम सुरे यांनीही पाणी प्रश्नावर टीका केली. बापू घडामोडे यांनी या प्रश्नात मार्ग काढण्याचे आवाहन सभागृहाला केले. त्र्यंबक तुपे यांनी मनपाच्या टँकरमधून पाण्याची विक्री सुरू असल्याचा आरोप केला. पाच तासांच्या चर्चेनंतर शहरवासीयांना दिलासा देणारा कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
सेना-भाजपमध्ये वाद
नगरसेवक नितीन चित्ते यांनी सिडको-हडकोसाठी असलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवरील क्रॉस कनेक्शनचा मुद्दा उकरून काढला. राजेंद्र जंजाळ यांनी त्वरित प्रत्युत्तर देऊन दहा वर्षांपासून हे क्रॉस कनेक्शन असल्याचे सांगून पाणी प्रश्नाला वेगळे वळण दिले.
भाजपनेही याच मुद्यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी वेळीच हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकला. पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीतून ५०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या मुद्यावर माधुरी अदवंत यांनी भाष्य केले. त्यावरून मनगटे, मीना गायके यांनी कडाडून विरोध दर्शविला.

Web Title: Water Question becomes hot in general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.