‘चहाडीची गोडी नाकारणारी वसेकरांची कलमी कविता’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 08:05 PM2018-01-01T20:05:12+5:302018-01-01T20:05:50+5:30

रसगंध : विश्वास वसेकरांचा ‘कलमी कविता’ हा अलीकडेच प्रसिद्ध झालेला विडंबन काव्यसंग्रह नुकताच वाचला आणि विडंबन काव्याची/व्यंग कवितांची एक समृद्ध परंपरा मराठी कवितेला लाभली. त्याचा मिश्किल इतिहास मनात जागा झाला. तिरकस शैलीचे कवी/ लेखक/ व्यंगचित्रकार आणि त्यांना दाद देणारे खट्याळ इरसाल वाचक. हे जणू एकमेकांना खतपाणी पुरवीत, साद-प्रतिसाद देत, आनंद घेत, एक दुस-याची खेचत, खिल्ल्या उडवत, डोळ्याच्या कडा ओल्या होई तो हसत, चिमटे काढून टाळ्या देत-घेत. एक जिवंत खळखळणारं आयुष्य जगणारा समाज डोळ्यासमोर उभा राहिला.

'Vasekar's poem' | ‘चहाडीची गोडी नाकारणारी वसेकरांची कलमी कविता’

‘चहाडीची गोडी नाकारणारी वसेकरांची कलमी कविता’

googlenewsNext

- डॉ. संजीवनी तडेगावकर

रविकिरण मंडळाच्या अतिरेकी काळात प्र. के. अत्रेंची ‘झेंडूची फुले’ फुलून आली. अनेक कवींच्या कवितांवर झेंडूची फुलेतून त्यांनी खुमासदार शैलीतून व्यंग निर्माण केले. कवींनी जणू अत्रेंचा धसका घ्यावा, अशी काहींशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळी मूळ कलाकृतीपेक्षाही अत्रेंचे ‘झेंडूची फुले’तील विडंबनेच जास्त गाजले.

सामाजिक दंभावर नेमकेपणाने व्यंगात्मक भाष्य करून चिं. वि. जोशी, ज. के. उपाध्ये, अनंत काणेकर, गं. ना. जोगळेकर, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर आणि विश्वास वसेकर यांनी (विनोदी लेखनाचा) हा वाङ्मय प्रकार समृद्ध आणि लोकप्रिय केला. मात्र, गीतकाव्यासारखीच याची नोंद मराठी समीक्षेत दिसत नाही. विनोदी साहित्याची समीक्षा न करता येणे हा मराठी समीक्षेचा आणि समीक्षकांचा पराभव समजावा काय? कारण मागील वर्षी जागतिक पातळीवर गीतकाव्य प्रकाराला बॉब डिलन यांना नोबेल पारितोषिकाने गौरविले गेले आणि भारतीय (मराठी) साहित्यात मात्र ‘उथळ’ म्हणून सतत त्याची हेटाळणी केली जाते. असो.

कलमी कवितांच्या माध्यमातून वसेकरांनी अनेक दिग्गज कवींच्या कवितांचे विडंबन करून खळबळ उडवून दिली आहे. पु. शि. रेगे, बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, यशवंत मनोहर, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, ग्रेस आदींच्या कविता तर भन्नाट जमल्या आहेत.
ग्रेस यांच्या एका कवितेचे विडंबन करताना ते म्हणतात,

तो दीड वाजला होता
मी सव्वा कैसे म्हटले
की राधेच्या चुनाचे
सीतेने केले पिठले
...
मी कथेस गेलो नाही
हा पाऊस असला पडतो
शाळेस वेध जरी नाही
अंदाजामागून गळतो.

निखळ हास्यनिर्मिती हीच विडंबनाची प्राथमिक अट असते. ही फलश्रुती नसेल तर विडंबन बटबटीत होऊन अभिरुचीहीन होते. उपहास- उपरोधामधून वाचकाला अंतर्मुख करणारा हा काव्य प्रकार असून कवितेचे अस्सल रूप निस्तेज होऊ लागले की, विडंबने प्रभावी ठरू लागतात. विपरीत  कल्पनांचा अतिरेक, सांकेतिकतेचा बुजबुजाट, अनुकरणाचा थाट, बाह्यांगाला अतिमहत्त्व, साहित्य- संस्कृती-राजकारणाचे हिणकस रूप विडंबनाच्या निर्मितीला कारणीभूत ठरते. त्याचे मासलेवाईक उदा. नारायण सुर्वे यांच्या ‘पत्रात लिवा’ या कवितेचे वसेकरांनी केलेल्या विडंबनातून पाहता येईल. अर्थात ‘अटलजींचे’ जयललितास पत्र या मथळ्याखाली ते केले आहे.

मव्हा पाठिंबा असाच ठिवा, असं पत्रात लिवा
नाना नमुने गोळा करून, म्या धकवतोय कसा तरी
परतेका लूट पाह्यजे.  पुढारी का पेंढारी?
लुटू देऊ का खुर्चीहून हटू... काय ते पत्रात लिवा.

आता कुठं आम्ही सत्तेत आलो, संपल कशी वखवखी अतीच खाल्ले तुम्ही म्हणून तर तुमची ही पोटदुखी ववा पाठवून देऊ का नकू, 
काय ते पत्रात लिवा...वाढती गटबाजी, ढोंग, भल्याभल्यांचा सुटत जाणारा विवेक पाहून मन खिन्न होते, तेव्हा हसण्याशिवाय हातात काहीच राहत नाही. त्या हसण्यातून विडंबनाचे बीज (व्यंगकाव्याचे) असते.

सत्यकथा या नियतकालिकात साहित्य छापून आल्यावर सत्यकथेचे लेखक म्हणून मिरवणाºयांच्या कंपूशाहीला कंटाळलेल्या विरोधी गटातील लेखकांनी ‘सत्यकथा’ बंद पडल्यावर ‘आता सत्यकथेचे लेखक विधवा झाले’ असे उपरोधाने म्हटले होते. त्याच धर्तीवर ‘सत्यकथा बंद पडली तेव्हाची गोष्ट’ अशा आशयाची एक मजेशीर कविता या संग्रहात वाचायला मिळते. त्याचप्रमाणे बा. सी. मर्ढेकरांच्या ‘दवात आलीस भल्या पहाटे’ या  लोकप्रिय कवितेचे विडंबन करताना ते लिहितात...

दवात आलीस भल्या पहाटे
भुतासारखी उठून एकदा
चिथवून गेलीस पेरीत आपुल्या
कुटुंबक्षोमामधील सुरुंगा
किंवा;

 ना. धों. महानोरांच्या ‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे’ या कवितेचे केलेले विडंबन असे;
ह्या मुलीने ह्या मुलाला पान द्यावे
आणि माझ्या मत्सराला पूर यावे
पाहता लिपस्टिक शर्टी लागलेली
कॉलरीला मीही त्याच्या आवळावे.

या आणि अशा अनेक कवींच्या कवितेवर वसेकरांनी ‘कलमी’ कविता’ मधून विडंबन काव्य केले आहे. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव, गंगाधर पानतावणे, प्रभाकर बागले, सरदेशमुख आदींनी गौरवलेली कविता वसेकरांनी ‘कोरस’, ‘काळा गुलाब’, ‘पैगाम’, ‘शरसंधान’, ‘मालविका’, ‘अंकोरवट’, ‘पोर्ट्रेट पोएम’, ‘तरी तुम्ही मतदार राजे’ या कविता संग्रहातून लिहिली असून ‘रेघोट्या’ ‘कु-हाडीचा दांडा’, ‘सुखाची दारं, आदी ललितलेखसुद्धा त्यांचे प्रकाशित आहेत. गंभीर लेखनासोबतच विनोदी शैली हा वसेकरांचा नैसर्गिक स्वभाव आहे. विनोदी लेखनासाठी जशी विनोदबुद्धी लागते, तसाच हजरजबाबीपणा व भाषेवर प्रभुत्वदेखील! शिवाय समकालीन राजकीय घडामोडींचा अभ्यास व साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे संदर्भसुद्धा माहीत असणे गरजेचे असते.विडंबन काव्यात मूळ कलाकृतीचा फक्त सांगाडा वापरला जातो. मूळ कवी किंवा कविता टीकेचे लक्ष नसते. ज्या कवितेचा ढाचा वापरून विडंबन काव्य केले जाते तिच्या माध्यमातून समाजातील सूक्ष्म घडामोडी, अंतर्गत ताणेबाणे, हितसंबंध, एखाद्याचे वेगळेपण, हेवेदावे, हिणकस व्यवहार, गोपनीय गोष्टी, असा विविधांगी मालमसाला ध्वनित होत राहतो. जसे कोणत्याही चांगल्या काव्यात ध्वनित बेन्साला महत्त्व आहे, तसेच विडंबनातदेखील आहे. या संग्रहाला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रदीर्घ प्रस्तावना असून वसंत सरवटे यांचे मुखपृष्ठ आणि साजेशा व्यंगचित्रांचा वापर हे या पुस्तकाला आणखी संदर्भ पुरवीत राहतात. गंभीर लेखनासोबतच वसेकरांनी स्वत:मधील खट्याळ लेखक जिवंत ठेवल्यामुळे विनोदी साहित्याची मेजवानी  वाचकांना मनमुराद आनंद देईल. 
(लेखिका जालना येथील कवयत्री आहेत.)

Web Title: 'Vasekar's poem'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.