औरंगाबाद जिल्ह्यात अघोषित संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:12 AM2019-04-27T00:12:43+5:302019-04-27T00:13:02+5:30

पारा वाढला : उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारपेठेवर परिणाम; ेदुपारनंतर सर्वत्र शुकशुकाट, पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पाठ

Undeclared curb in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात अघोषित संचारबंदी

औरंगाबाद जिल्ह्यात अघोषित संचारबंदी

googlenewsNext

औरंगाबाद : सूर्य आग ओकू लागल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढच होत असल्याने दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून, याचा बाजारपेठेलाही फटका बसला आहे. बहुतांश शेतकरी सकाळी ११ वाजेच्या आतच आपली कामे उरकत असून, ग्रामस्थही नियमित कामे याच वेळेत आटोपून दुपारी घरातच राहणे पसंत करीत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळांकडे उन्हामुळे पर्यटकांनी पाठ फिरविल्याने स्थानिक व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे.
खुलताबादेतील पर्यटनस्थळे ओस
खुलताबाद : तापमान जवळपास ४३ अंशांवर पोहोचल्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्यामुळे शुक्रवारी खुलताबादेतील पर्यटनस्थळांसह देवस्थान परिसरात शुकशुकाट दिसून आला. यामुळे व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात पर्यटक व भाविकांची नेहमी गर्दी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने पर्यटक, भाविकांची संख्या रोडावली आहे. परिणामी गर्दी नसल्याने हॉटेल व्यावसायिक, खेळणी व पुस्तक विके्र ते, फळविक्रेते यांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
देशात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झाल्याने देशी पर्यटक पर्यटनासाठी बाहेर निघत नसल्यामुळे एक महिना तरी अशीच परिस्थिती राहणार असून, जूननंतर पर्यटन हंगाम सुरू होईल, असे वेरूळ लेणी परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले. खुलताबाद, वेरूळ, दौलताबाद, म्हैसमाळ आदी पर्यटनस्थळे वाढत्या तापमानामुळे ओस पडली आहते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. सध्या वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरात व खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी आंंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांतून शिर्डी येथे जाणारे तुरळक भाविक दिसून येत आहेत.
-------------

Web Title: Undeclared curb in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.