शासकिय जागेवर अतिक्रमण करणारी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:25 PM2019-08-27T14:25:48+5:302019-08-27T14:27:52+5:30
सुनावणीअंती जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी केली कारवाई
खुलताबाद (औरंगाबाद ) : शासकिय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बु.येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील राहीवाशी बालाजी गयाप्रसाद दिक्षित यांनी देवळाणा बु. ग्रामपंचायतीचे सदस्य सलिमाबी मुक्तार पटेल, स्मिता भारत बनकर, संगिता मच्छींद्र गायकवाड यांच्या विरोधात सरकारी महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनयम 1958 चे 14(1) ( जे-3) नुसार सरकारी गायरान जमिनीवर व गावठाण जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले म्हणून ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यासाठी अँड. शरद भागडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली.
सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, गटविकासअधिकारी, वनविभाग खुलताबाद ,मंडळअधिकारी सुलतानपुर यांचा चौकशी अहवाल मागवून घेतला. सदरील प्रकरणात सुनावणीअंती जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी देवऴाणा बु. ग्रामपंचायत सदस्य सलिमाबी मुक्तार पटेल, स्मिता भारत बनकर, संगिता मच्छींद्र गायकवाड यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदी अन्वये अपात्र ठरवित त्यांचे सदस्यपद रद्द ठरविण्यात आले.