३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा

By मुजीब देवणीकर | Published: February 1, 2024 07:42 PM2024-02-01T19:42:36+5:302024-02-01T19:43:08+5:30

निव्वळ शहर स्मार्ट म्हणून चालणार नाही. त्यासाठी कामही करावे लागेल

The city has not had a development plan for 34 years; Ex-commissioner, ex-mayor's bombshell on the administration | ३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा

३४ वर्षांपासून शहराला विकास आराखडा नाही; माजी आयुक्त- महापौरांचा प्रशासनावर बॉम्बगोळा

छत्रपती संभाजीनगर : शहराचा आत्मा म्हणजे विकास आराखडा होय. मात्र, आपल्या शहरात ३४ वर्षांपासून नवीन विकास आराखडाच तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहराची चारही बाजूंनी वेडीवाकडी वाटचाल सुरू आहे. चौकाचौकातील ’लेफ्ट टर्न’ सुरळीत नाहीत. गुळगुळीत सिमेंट रस्त्यांवर दोन्ही बाजूने वाहने उभी असतात. यामुळे वाहतूककोंडी होते. अतिक्रमणांची संख्या वाढू लागली. हॉकर्स झोन निश्चित नाहीत. जुन्या शहरात पर्यटक वाहनाद्वारे येऊच शकत नाहीत. हे चित्र कुठे तरी बदलले पाहिजे. निव्वळ शहर स्मार्ट म्हणून चालणार नाही. त्यासाठी कामही करावे लागेल, अशा शब्दात माजी महापौर, माजी आयुक्तांनी प्रशासनावर बॉम्बगोळा टाकला.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट सिटी कार्यालयात विकास मंथन सभेचे आयोजन केले होते. यावेळी माजी आयुक्त कृष्णा भोगे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, डी. एस. मुगळीकर यांच्यासह माजी महापौर अशोक सायन्ना, मनमाेहनसिंग ओबेरॉय यांचे चिरंजीव नवीन ओबेरॉय, गजानन बारवाल, अ. रशीद मामू, शीला गुंजाळ, सुदाम सोनवणे, विमल राजपूत, रुख्मणबाई शिंदे, किशनचंद तनवाणी, अनिता घोडेले, नंदकुमार घोडेले, कला ओझा, विकास जैन, बापू घडमोडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रशासक जी. श्रीकांत यांनी बैठकीचा उद्देश विषद केला. शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी पीपीटीद्वारे विकास कामांवर प्रकाश टाकला.

काय म्हणाले माजी आयुक्त
कृष्णा भोगे - 

प्रत्येक चारचाकी वाहनधारकासाठी अगोदर पार्किंगची सोय करावी. उल्कानगरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी राहतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. मनपाला दरवर्षी पर्यावरण अहवाल प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. शिक्षणाचा दर्जा यासंदर्भात ‘असर’ संस्थेप्रमाणे अहवाल प्रसिद्ध करावा. प्राथमिक शिक्षण मनपाची जबाबदारी आहे. माध्यमिक शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. आपण का पैसा खर्च करतोय?

डॉ. पुरुषोत्तम भापकर - 
मनपात काम करताना नेहमीच पैशांची चणचण भासते. एक अर्थसंकल्प दोन वर्षे चालवावा लागतो. मनपात अधिकारी, कर्मचारी कमी असले तरी ताकदीचे आहेत. याच टीमने रस्ता रुंदीकरणात मोठी मदत केली. अडचणी असतात त्यातून मार्ग काढावा लागतो.

डी. एम. मुगळीकर -
दिल को संभलने के बहाने बहोत हुए, तेरे गम की आड मे नशे बहोत हुए,
तुने जो हमको छोड दिया और उसके बाद, लावारसी जमीन पर कब्जे बहोत हुए...
अशा शब्दात अतिक्रमणांवर बोट ठेवले. सिडको एक सुनियोजित शहर वाटते, दुसरीकडे जुन्या शहरात व इतर नवीन भागातही कुठेच ‘प्लॅन’ नाही. प्रत्येक मालमत्ता जीआयएस मॅपिंगमध्ये आलीच पाहिजे. शहराच्या आकारमानानुसार २० टक्केही रस्ते नाहीत. १२ टक्के रस्ते करणे अजून शिल्लक आहे. बॉन्डपेपरवर अर्ध्याहून अधिक शहर आहे. क्रीडांगण, दवाखाने, गार्डनसाठी जागा नाहीत. लोकसंख्येच्या अनुसार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावे. जालना रोडला पर्यायी रस्ता व्हावा.

काय म्हणाले माजी महापौर?
शीला गुंजाळ - विकास आराखडा लवकर मंजूर करा, २० बाय ३० प्लॉटिंग झपाट्याने वाढतेय. गुंठेवारी झालेल्या मालमत्तांना पीआर कार्ड द्या.

नवीन ओबेरॉय - मालमत्ता करावरील व्याज माफ करावे. सिमेंट रस्त्याच्या बाजूचे साईड पंखे भरायला कंत्राटदार १० हजार रुपये घेत आहेत.

सुदाम सोनवणे - सा. बां. विभागाकडून शहरात होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासून मनपाने हस्तांतरण करून घ्यावे.

किशनचंद तनवाणी - विकास आराखडा नाही, जुन्या शहरात हॉकर्समुळे व्यापारी त्रस्त आहेत. हॉकर्स पॉलिसी ठरवा. अपूर्ण रस्ते पूर्ण करा.

अ. रशीद मामू - रंगारगल्लीचे थांबलेले रुंदीकरण पूर्ण करा, टी. हॉस्पिटल ते जटवाडा डीपी रोड पूर्ण करा, रस्त्यांवर फुटपाथ करा.

विकास जैन - रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथे पूल उभारण्यात यावा, ड्रेनेजची कामे करावीत.

नंदकुमार घोडेले - १५ फेब्रुवारीपासून दोन दिवसांआड पाणी द्या, ३४ वर्षांपासून विकास आराखडा नाही.

बापू घडामोडे, कला ओझा, अशोक सायन्ना, अनिता घाेडेले, विमल राजपूत, रुख्मणबाई शिंदे, गजानन बारवाल यांनीही मते मांडली.

निधी कमी पडणार नाही
मंथन सभेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले की, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. ग्लो गार्डन, क्यूआर कोड बोर्ड इ. कामे सुरू हाेतील. विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही. एकाच मोठ्या उड्डाणपुलासाठी उद्याच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे.

टोलनाक्यांचा वाटा घ्यावा
आ. हरिभाऊ बागडे म्हणाले, शहराच्या आसपास तीन ठिकाणी टोल वसुली सुरू आहे. सा. बां. विभागाकडून मनपाने यात वाटा घ्यायला हवा. १८ खेडी मनपात आली, आजपर्यंत त्यांचा विकास झाला नाही.

वाहतूक प्रचंड वाढली
गृहनिर्माणमत्री अतुल सावे म्हणाले, वाहतूक प्रचंड वाढली आहे. लेफ्ट टर्न मोकळे करा, कैलासनगर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा, रस्त्याच्या बाजुला उभ्या राहणाऱ्या वाहनांवर मनपा, पोलिसांनी मिळून कारवाई करावी.

Web Title: The city has not had a development plan for 34 years; Ex-commissioner, ex-mayor's bombshell on the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.