धक्कादायक ! परीक्षा विभागाने दिले कनिष्ठ लिपिकाला पेपर तपासण्याचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:20 PM2018-04-05T19:20:38+5:302018-04-05T19:23:07+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Shocking The examination department has asked the junior clerk to check the paper | धक्कादायक ! परीक्षा विभागाने दिले कनिष्ठ लिपिकाला पेपर तपासण्याचे आमंत्रण

धक्कादायक ! परीक्षा विभागाने दिले कनिष्ठ लिपिकाला पेपर तपासण्याचे आमंत्रण

googlenewsNext
ठळक मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आहे. या लिपिकाने परीक्षा संचालकांना पत्र पाठवून आपले शिक्षण केवळ पदवीपर्यंतचे, इंग्रजीचे पेपर कसे तपासू? असा सवाल उपस्थित करणारे पत्र पाठविले. या प्रकरणात परीक्षा विभाग व महाविद्यालयाने आपली चूक झटकली आहे.

विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले आहे. यात वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले नीलेश गणेश घंटे यांना परीक्षा विभागाने २६ मार्च २०१८ रोजी पत्र पाठवले. त्यात प्रोफेसर नीलेश गणेश घंटे असा उल्लेख करीत विद्यापीठाचे कुलगुरू आपणाला पदवी अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. शिवछत्रपती महाविद्यालयात एक ते सहा सत्रांतील  आपणाला उत्तरपत्रिका तपासाव्या लागतील. यासाठी आपणाला टीए, डीएसह इतर वेतन, मानधन नियमाप्रमाणे जागेवरच देण्यात येईल. विद्यापीठ कायद्यानुसार उत्तरपत्रिका तपासणे आपणास बंधनकारक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र मंगळवारी (दि. ३) हाती पडल्यानंतर अवाक् झालेल्या नीलेश घंटे यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना तात्काळ मेलद्वारे पत्र पाठवले. यात त्यांनी ‘आपण कनिष्ठ लिपिकपदावर कार्यरत असून, माझे शिक्षण वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंत झालेले आहे. तरी आपल्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी पत्र प्राप्त झाले आहे. माझे शिक्षण बघता मी इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यास पात्र आहे का? मार्गदर्शन करावे,’ असा सवाल केला, कॉलेजने दिलेल्या माहितीनुसार नीलेश घंटे यांचा प्राध्यापक म्हणून उल्लेख  असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले.

परीक्षा विभागाला मेल केला आहे 
विद्यापीठाने इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी माझ्या नावाने पत्र पाठविले. या पत्रात जर आपण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी न आल्यास विद्यापीठ कायद्यानुसार आपणावर कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख आहे. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पात्र आहे का? असे मार्गदर्शन परीक्षा विभागाच्या मेलवर पत्र पाठवून विचारले.
- नीलेश घंटे, कनिष्ठ लिपिक, विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर

संबंधित महाविद्यालयाची चूक 
विद्यापीठाकडे संलग्नीकरण करताना महाविद्यालयाने प्राध्यापकांच्या जोडलेल्या यादीत नीलेश घंटे यांच्या नावाचा समावेश आहे. त्याच यादीनुसार परीक्षा विभागाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी पत्रे पाठवली आहेत. यात परीक्षा विभागाची नव्हे, तर संबंधित महाविद्यालयाची चूक आहे. तरीही अशी काही पत्रे गेली असतील तर तपासून ती रद्द करण्यात येतील.
- डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Web Title: Shocking The examination department has asked the junior clerk to check the paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.